Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 1 February 2009

गोव्यात प्रथमच शिर्डी साईबाबांच्या पादुका

पणजीत २२ रोजी भव्य दर्शनसोहळा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - तब्बल ९१ वर्षानंतर भक्तांना दर्शन घेण्यासाठी बाहेर काढल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा पहिला मान गोव्यातील भक्तांना प्राप्त झाला आहे, ही साईभक्तांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही संधी गोव्यातील "साईबाबा पादुका दर्शन सोहळा समिती'ने उपलब्ध केली असून दि. २२ फेब्रुवारी रोजी पणजीत हा पादुकादर्शन सोहळा होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अनिल खंवटे यांनी आज दिली.
पहाटे ४ वाजता साईंच्या आरत्या झाल्यानंतर रात्री १२ पर्यंत साईंच्या पादुका दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. या सोहळ्यात सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. कला अकादमी ते कांपाल मैदानापर्यंत शामियाना उभारण्यात येणार आहे. यासाठी खास कोल्हापूर येथून शामियाना उभारणाऱ्या एका आस्थापनाला हे काम सोपवण्यात आले आहे. या शामियानात दर्शन घेण्यासाठी रांगेत राहणाऱ्या भक्तांना पिण्याच्या पाण्याची तसेच दर्शन घेण्यास तसेच अपंग भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री. खंवटे यांनी यावेळी दिली.
"गोवा मुक्त झाल्यापासून साईंच्या पादुका गोव्यात आणण्याचा विचार अनेकांच्या मनात होता. परंतु, त्यावेळी साईंच्या मनात नसल्याने ते शक्य झाले नाही. आता कित्येक वर्षानंतर गोव्यातील भक्तांना ही संधी उपलब्ध होत असून हे गोव्यातील साई भक्तांचे भाग्य' असल्याचे श्री. खंवटे म्हणाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून देणगीच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन साईभक्तांना करण्यात आले आहे. त्याप्रमाणे गोव्यात असलेल्या ५१ साई मंदिराच्या समित्यांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पहाट ते रात्री या दरम्यान साईंच्या पारंपरिक चार आरत्या केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे साई भजनांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील कोणत्याही भजन मंडळांना याठिकाणी साईंचे भजन करण्याची इच्छा असल्यास त्यांनी या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. देणगी देण्यासाठी तसेच अन्य माहितीसाठी अध्यक्ष अनिल खंवटे(९६२३४४७४०१), सचिव प्रदीप पालेकर (९६२३४४७४१०) व खजिनदार विवेक पार्सेकर (९६२३४४७४०२) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे उपाध्यक्ष टोनी रोड्रिगीस, शेख मुस्ताफ कादर, रवी नायडू, सहसचिव गौरीश धोंड, सहखजिनदार संतोष नाईक, सदस्य दिनेश वाघेला, मार्क वाझ, सुरज लोटलीकर, धीरज नाईक गावकर, प्रसाद मांद्रेकर, प्रकाश कित्तूर, विजय भोसले व सुभाष नाईक उपस्थित होते.

No comments: