नवी दिल्ली, दि. १ - गोव्याहून निघालेले इंडिगो कंपनीचे ई-६६४ हे प्रवासी विमान आज अचानकपणे नवी दिल्ली विमानतळावर उतरविणे भाग पडले.गोव्याहून निघालेल्या विमानातील दोघा प्रवाशांनी अतिशय आक्रमणपणे वागून, विमानाचे अपहरण करण्याची धमकी दिली, त्यामुळे विमान तातडीने उतरावे लागले, असे स्पष्टीकरण रात्री उशिरा सरकारतर्फे करण्यात आले.
सर्व प्रकारची खबरदारी घेऊन विमान उतरविण्यात आले, असे नागरी विमान सचिव एम. माधवन यांनी पत्रकारांना सांगितले. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच दोन तासांनी प्रवाशांना विमानातून बाहेर जाण्यास संमती देण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. त्या दोघा प्रवाशांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि दिल्ली पोलिसांनी तातडीने धाव घेतली तसेच सीमा सुरक्षा दलाच्या विमानांनाही सतर्क करण्यात आले. या विमानातील दोन प्रवाशांनी हुल्लडबाजी करीत आपल्याकडे चाकू असल्याची धमकी दिल्याने हा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकाने हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बाजूला नेले, त्यावेळी कमांडोनी त्याला वेढा घातला. दोघा प्रवाशांनी अतिशय आक्रमकपणे शिवीगाळ करायला सुरवात केल्याने वैमानिकाने विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सर्वत्र विमानाचे अपहरण झाल्याची अफवा पसरली, तर एका दूरचित्रवाणी वाहिनीने अशा स्थितीत काय होऊ शकते ते पाहाण्यासाठी हा प्रयोग (मॉक ड्रिल) करण्यात आल्याची माहिती प्रसृत केली. तथापि सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट करीत धोका टळला असल्याची माहिती रात्री दिली.
Sunday, 1 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment