० धुमसणाऱ्या आगीवर १८२ ट्रक माती
० आज सायंकाळपर्यंत पूर्णतः नियंत्रण
मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : गेला आठवडाभर धुमसत असलेली सोनसोडो येथील कचरा यार्डातील आग नियंत्रणाखाली आणण्यात मडगाव नगरपालिकेला यश न आल्याने अखेर आजपासून येथील जिल्हा आपत्कालीन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन कार्यरत झाले व आज एकाच दिवशी तब्बल १८२ ट्रक माती धुमसणाऱ्या कचऱ्यावर पसरविली गेली. उरलेले काम उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.
काल मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सोनसोडोवर जाऊन तेथील ऑपरेशनचा आढावा घेतला असता नगरपालिकेच्या मोहिमेत नियोजन नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी जिल्हा आपत्कालीन यंत्रणेस पुढाकार घेण्यास सांगितले व त्यानुसार आजचे ऑपरेशन पार पडले.
आज स्वतः जिल्हाधिकारी सोनसोडोवर उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही तेथे भेट दिली. कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो यांनी आज बराच वेळ तेथे थांबून एकंदर ऑपरेशनवर लक्ष ठेवले . मुख्याधिकारी यशवंत तावडे व पालिकेचे अन्य अधिकारी तर सकाळी ८ वा. पासून सोनसोड्यावर ठाण मांडून राहिले ते सायंकाळी ७ वा. परतले.आजच्या मोहिमेमुळे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उरलेले उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असे तावडे यांनी सांगितले.
आजच्या ऑपरेशनसाठी विविध खाण कंपन्यांकडून तसेच बांधकाम ठेकेदार आर्थर डिसोजा व संतोष जॉर्ज यांच्या कडून टिपरी उपलब्ध करण्यात आल्या व दिवसभर त्यांनी एकूण १८२ टिपरी माती आणली व त्यामुळे सोनसोडो भागाला खाणसदृश रूप आज आले होते. इतक्या मोठ्या संख्येतील टिपरी तेथे वाहतूक करणार असल्याने कुडतरी रस्त्यावर कोणतीही वाहतूक समस्या उद्भवून लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तेथे खास वाहतूक पोलिस तैनात करण्याची तसेच आगीमुळे खंडित झालेला यार्डांतील वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काल आपल्या सोनसोडो भेटीच्यावेळी पोलिस व वीज खाते अभियंत्यांना दिल्या होत्या आज त्याची कार्यवाही झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज बव्हंशी आग विझली आहे व उद्या सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळेल अशी खात्री आहे.
Sunday, 1 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment