अडवाणी येणार; दहशतवाद, घुसखोरी, महागाई मुख्य मुद्दे
मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी) - आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचा गोव्यातील नारळ भाजप येत्या १ नोव्हेंबर रोजी फोडणार असून त्यासाठी राष्ट्रीय पक्षाध्यक्ष लालकृष्ण अडवाणी गोव्यात आवर्जून येणार आहेत. तसेच आगामी निवडणुकीसाठी दहशतवाद, घुसखोरी व महागाई हे भाजपचे मुख्य मुद्दे असतील, अशी माहिती भाजपचे गोवा प्रभारी खासदार राजीव प्रताप रुडी व प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व राज्य प्रवक्ते प्रा. गोविंद पर्वतकर याप्रसंगी उपस्थित होते.
येत्या १ नोव्हेंबर रोजी गोव्यात विजय संकल्प मेळावा घेतला जाईल व तो भाजपच्या आजवरच्या मेळाव्यातील सर्वांत मोठा असेल. सदर मेळावा ही निवडणुकीची नांदी असेल. मेळाव्याची जागा अजून ठरलेली नसली तरी तो पणजीत वा म्हापसा येथे घेतला जाईल, असे नाईक यांनी सांगितले.
श्री. रूडी म्हणाले, भारताने अमेरिकेशी केलेल्या अणुकराबाबत भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्रांचा खुलासा अजूनही अमेरिकेने केलेला नाही, त्या अर्थी या करारातून भारतावर अनेक बंधने आली आहेत. त्याला इतिहासच साक्षीदार असेल. लोकसभा निवडणुकांपूर्वी ५ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी मध्यप्रदेश,छत्तीसगड व राजस्थान येथे सध्या भाजपची सरकारे असून तेथे भाजप सत्ता राखेलच. शिवाय दिल्लीवरही कब्जा करेल व जम्मू काश्मीरमधील आपले स्थान अधिक बळकट करेल असा विश्वास आपणास वाटतो.
ते म्हणाले की, अमेरिकी सिनेट व बाहेर जे स्पष्टीकरण केले गेले आहे त्यावरून भारत या करारामुळे भविष्यात अणुचाचणी, अणुपुरवठा वा अणुसाठा करू शकणार नाही. म्हणजेच देशाच्या सार्वभौमत्वावरच या करारामुळे गदा आली आहे.यासंदर्भात पंतप्रधानांनी संसदेस दिलेल्या आश्र्वासनाचा भंग केला आहे. देशहिताकडे दुर्लक्ष केले आहे.देशाची खालावलेली आर्थिक स्थिती व त्यामुळे ढासळलेला शेअर बाजार याचे उदाहरण देऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे चित्र स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली. महागाईबाबत सरकार संदिग्ध आहे. दहशतवाद दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. सर्व थरांतून दहशतवादविरोधी कारवाईची होत असताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री वेगळीच भाषा करतात. केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान हे तर बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व देण्याची मागणी करत आहेत. मात्र भाजपचा या मागणीस तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Sunday, 12 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment