Saturday, 11 October 2008
शिक्षेच्या अंमलबजावणीस होणारा विलंब चिंताजनक: उज्ज्वल निकम
दै. गोवा दूतचे संपादक श्री. राजेंद्र देसाई, उद्योजक गुरुदास नाटेकर, गोवा दूतच्या सरव्यवस्थापक व संचालक सौ. ज्योती धोंड, प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल व पत्नी सौ. ज्योती निकम दिसत आहे. (छायाः प्रीतेश देसाई)
'गोवादूत'ला सदिच्छा भेट
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): 'टाडा' अथवा 'पोटा'सारख्या कायद्यांचा गैरवापर अधिक झाला, मात्र न्यायालयाने गुन्हेगाराला शिक्षा ठोठावल्यानंतरही शिक्षेच्या कार्यवाहीला होणारा विलंब अधिक चिंताजनक आहे, असे मनोगत नामवंत फौजदारी वकील ऍड.उज्ज्वल निकम यांनी "गोवादूत'कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी व्यक्त केले. राष्ट्रपतींकडे केले जाणारे दयेचे अनेक अर्ज निर्णयाविना अद्याप पडून असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयीन कामकाजावर प्रसारमाध्यमांनी अवश्य लक्ष ठेवावे, मात्र बातम्या देताना जबाबदारीनेलेखन करावे. असे केल्यास अवमानाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे ते म्हणाले.
चुकीच्या जागी चुकीची व्यक्ती न्यायदानास बसली तर अन्याय होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी वकिलांचे कौशल्यही असफल होते, असे सांगून त्यांनी आपण आतापर्यंत लढविलेल्या खटल्यात आलेले रोमांचकारी अनुभव कथन केले. वकिलाने खटल्यातील बारकावे लक्षात घेऊन तयारी केल्यास गुन्हेगारांना शिक्षा होतेच, असे सांगून मुंबई बॉम्बस्फोट खटला, संजय दत्त प्रकरण, खैरलांजी हत्या प्रकरण आदी देशात गाजलेल्या प्रकरणांत आपण नेहमीच सत्याची बाजू मांडली आणि त्यात संबंधितांना न्याय मिळवून दिला,असे ऍड. निकम म्हणाले. वकिलांना धमक्या मिळण्याचे प्रकार आपल्याला नवे नाहीत. तथापि, अशा प्रकारांचा गाजावाजा करणे योग्य नाही. आपले सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध असला तरी राजकारणात पडण्याचा विचार नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
"गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक ज्योती धोंड यांनी पुष्पगुच्छ देऊन ऍड.निकम यांचे स्वागत केले. विद्या नाईक यांनी सौ. निकम यांना पुष्पगुच्छ दिला. वृत्तसंपादक सुनील डोळे यांनी आभार मानले. यावेळी संचालक सागर अग्नी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. उद्योजक गुरुदास नाटेकर हेही यावेळी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment