प्राचार्य वेलिंगकर यांचा षष्ट्यब्दिपूर्ती सोहळा
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - गोव्याचे स्वत्व जपण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले योगदान अभूतपूर्व असून भविष्यातदेखील संघाचा हा विचारच देशाला व गोव्याला तारक ठरणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी आज येथे केले.
गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित असलेले प्राचार्य वेलिंगकर यांच्या षष्ट्यब्दिपूर्तीनिमित्त त्यांचा आगळावेगळा गौरव येथील कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात त्यांचे शेकडो चाहते व हितचिंतकांच्या उपस्थितीत 'संपन्न' झाला. त्याप्रसंगी आपल्या गौरव सोहळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्राचार्य वेलिंगकर म्हणाले, समर्पित भावनेने काम केलेल्या संघ स्वयंसेवकांनी गोव्याचे सांस्कृतिक व सामाजिक संचित टिकवून ठेवले. या स्वयंसेवकांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून संघाच्या कामाला वाहून घेतले. त्या कामाला आलेली फळे सध्या आपण चाखत आहोत. फक्त संघातच सर्वसमावेशकता आहे. म्हणून कोणाच्या टीकेमुळे संघ ही संस्था कधी हळवी होत नाही. संघात स्वयंसेवकांची तळहातावरील फोडासारखी काळजी घेतली जाते. मात्र व्यक्तिस्तोम अजिबात माजवले जात नाही. हेच या संस्थेचे वेगळेपण आहे." मी'पणा संपून "आम्ही' हा शब्द सहजच ओठावर येतो हा बदल केवळ संघाच्या संस्कारामुळेच शक्य झाला. आजचा हा गौरव म्हणजे आपला वैयक्तिक नसून आपल्याबरोबर कार्य केलेल्या संघ सहकाऱ्यांना मिळालेला मानाचा मुजराच होय अशी आपली धारणा आहे.
कोकण प्रदेश संघचालक उपेंद्र तथा बापूसाहेब मोकाशी (डोंबिवलीतील उद्योजक) यांनी प्राचार्य वेलिंगकर म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा यथार्थ गौरव केला. भटके विमुक्त परिषदेचे अध्यक्ष भिकूजी इदाते यांनी संघशक्ती म्हणजे काय आणि केवळ राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक समाजकारणातही ही संस्था कशी मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे याविषयी विवेचन केले. प्राचार्य वेलिंगकर यांनी गोव्यात संघाचे काम कसे रुजवले व आज त्याचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले आहे हा इतिहासाच त्यांनी ओघवत्या शैलीत मांडला.
गौरव सोहळा समितीचे कार्यवाह सुभाष देसाई यांनी प्राचार्य वेलिंगकर यांच्या कार्याचा गौरव करतानाच सौ. सुषमा वेलिंगकर यांनी कौटुंबीक आघाडी कशी सांभाळली याची उदाहरणे दिली.
दत्ता नाईक यांनी "गोव्यातील संघकामाचे शिल्पकार' अशी उपाधी प्राचार्य वेलिंगकर यांना बहाल केली. घटावर घट ठेवत जावे, तसे वेलिंगकर सरांचे जीवन असून १९६२ पासून त्यांचा हा संघसेवेचा महायज्ञ सुरू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सामाजिक समरसतेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संघ असे सांगताना त्यांनी प्राचार्य वेलिंगकर यांच्या जीवनशैलीस उद्देशून "नाही पुण्याची बोचणी, नाही पापाची बोचणी..' या कवितेचा दाखला दिला.
त्यापूर्वी वेलिंगकर सरांची मुलाखत वल्लभ केळकर व गजानान नांद्रेकर यांनी घेतली. या मुलाखतीच्या प्रारंभीच सरांनी मला स्वतःबद्दल बोलताना खूपच संकोचल्यासारखे वाटत आहे, असे सुरुवातीसच सांगितले तेव्हा हास्याची लकेर उमटली. सरांनी आपला जीवनपटच मोजक्या शब्दांत आपल्या चाहत्यांसमोर मांडला व यात साऱ्या कुटुंबाचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. सर्वांना बरोबर घेऊन जा हा विचार संघाने आपल्याला दिला. त्यातून आपली जडणघडण होत गेली. सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या आक्रमकतेपेक्षा जास्त धोकादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रा. अनिल सामंत यांनी रसाळ शैलीत सूत्रसंचालन केले. शालेय महापरिवार ही योजना देशभरात फसली, पण वेलिंगकर सरांनी अफाट परिश्रम घेऊन ती गोव्यात यशस्वी करून दाखवल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी मंत्रोच्चारांच्या गजरात वेलिंगकर सरांना बापूसाहेब मोकाशी यांच्या हस्ते पारंपरिक समई, शाल श्रीफळ व मानपत्र देऊन गौरवले तेव्हा त्यांच्या अनेक चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे डोळे आनंदाश्रूंनी वाहू लागले.मानपत्राचे वाचन प्रा. सामंत यांनी केले. भालचंद्र सातार्डेकर व दुर्गानंद नाडकर्णी या ऋषितुल्यांनी प्राचार्य वेलिंगकर यांना आशीर्वाद दिले. तसेच सौ. सुषमा वेलिंगकर यांना सौभाग्यलेणे प्रदान करण्यात आले. बाळकृष्ण केळकर यांनी याकार्यक्रमास अनुषंगाने खास गीत सादर केले.
गोव्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीत न्हालेल्या संध्याकाळी झालेल्या या ऐतिहासिक गौरव सोहळ्याला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, संजय वालावलकर, असंख्य संघ स्वयंसेवक, वेलिंगकर सरांचे चाहते, हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.
Monday, 13 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment