पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व अश्लील एसएमएस प्रकरणी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा पुत्र रोहित जर खरोखरच निरपराध असेल तर त्याने लपून न फिरता थेट पोलिस चौकशीला सामोरे जावे, असा इशारा आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिला. सदर पीडित मुलीचे मन वैद्यकीय चाचणीसाठी वळवण्याकरता स्वयंसेवी संघटना, मनोविकारतज्ज्ञ व महिला पोलिस अधिकारी प्रयत्नशील असल्याचे पोलिस महासंचालक किशन कुमार यांनी सांगितले. त्या मुलीची आई पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य करत असल्याचेही ते म्हणाले.
आपला पुत्र निर्दोष आहे असे बाबूश यांना वाटत असेल तर त्यांनी त्याला पोलिस चौकशीसाठी घेऊन यावे, असे आवाहन बॉस्को यांनी केले. ते आज पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. आजही या प्रकरणातील संशयित आरोपी रोहित मोन्सेरात याचा शोध घेण्यात आला. काल दुपारी मंत्री मोन्सेरात यांच्या दोन्ही बंगल्यावर छापे टाकल्यानंतरही रोहित पोलिसांच्या हाती लागला नव्हता. "तो राज्याच्या बाहेर गेल्यास कोणतीही हरकत नाही', मात्र त्याने देश सोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कडक कारवाईस सामेरे जावे लागेल', असे ते यावेळी म्हणाले.
काल रात्री श्री. मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन आपला मुलगा निर्दोष असल्याचे सांगितले होते. तसेच पोलिस आपल्याविरोधात गुन्हे दाखल करून वचपा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला होता. आज दिवसभर रोहितबाबत पणजी व पोलिस मुख्यालयात अफवांना ऊत आला होता. दुपारी रोहित आपल्या वकिलासह कळंगुट पोलिस स्थानकात शरण येणार असल्याची वावटळ उठवण्यात आली. मात्र उशिरापर्यंत तो पोलिसांना शरण आला नव्हता.
"आम्ही त्याला पुरेसा वेळ दिलेला आहे. कायद्यानुसार फौजदारी कलम १६० नुसार नोटीसही बजावली आहे. त्याला अजूनही संधी देण्यात आली आहे. मात्र
त्यानंतर संशयितांना कसे ताब्यात घेतले जाते हे आम्हाला माहीत आहे,' असे आज एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे सांगितले. त्यामुळे रोहित याला कोणत्याही क्षणी तो असेल तेथून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काल बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री कामत यांची भेट घेतल्यानंतर श्री. कामत यांनी याविषयाची स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तथापि, तसे झाल्यास हा चुकीचा पायंडा ठरणार असून तसे करता येणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment