Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 14 October 2008

सुदिन ढवळीकर समर्थक खवळले गोविंद गावडे यांच्यावर कारवाईची मागणी

पणजी,दि. १३ (प्रतिनिधी) : गेल्या विधानसभा निवडणुकीत वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले कॉंग्रेसचे उमेदवार गोविंद गावडे यांनी बांदोडा येथे भर बैठकीत ढवळीकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अपशब्द वापरून अपमानीत केल्याप्रकरणी चोवीस तास होऊनही कारवाई होत नसल्यामुळे ढवळीकर समर्थकांत तीव्र असंतोष पसरला आहे.
गोविंद गावडे हे कॉंग्रेसचे गेल्यावेळचे मडकई मतदारसंघातील उमेदवार होते. गृहमंत्री रवी नाईक यांचे ते कट्टर समर्थक आहेत,असे सांगून अशा लोकांकडून जर एखाद्या मंत्र्याला भर जाहीर कार्यक्रमांत धमकी देण्यात येते व पोलिस कारवाई करीत नाहीत, तर सामान्य लोकांची काय परिस्थिती असेल असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी ढवळीकर यांच्या काही समर्थकांनी आज ढवळीकर यांची पर्वरी येथे भेट घेतली असता कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या आठवड्यात बांदोडा येथे सुदिन ढवळीकर यांच्या कार्यालयात विविध योजनेअंतर्गत धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कवळेच्या जिल्हा पंचायत सदस्य मनुजा नाईक,बांदिवडेचे जिल्हा पंचायत सदस्य नरेश नाईक,कवळे,बांदोडा,कुंडई आदी ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच, पंच व सरकारी अधिकारी हजर होते.
हा कार्यक्रम सुरू असताना अचानक मुख्य खोलीत प्रवेश करून सगळ्या लोकांना बाहेर काढा,आपल्याला काही बोलायचे आहे,अशी मागणी गावडे यांनी केल्याचे ढवळीकर समर्थकांनी सांगितले. ढवळीकर यांनी नंतर बोलू असे सांगताच गावडे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनाही त्यांनी अपशब्द वापरले. मात्र, ढवळीकरांनी सर्व कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आपल्या कार्यकर्त्यांनाही बजावले व स्वतःही त्याचे पालन केले.
ढवळीकर यांच्या सुरक्षा पोलिसांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर पोलिस आपले काहीही करू शकत नाही हे ध्यानात ठेवा,असा इशाराही त्यांनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सुमारे पंधरा ते वीस मिनिटांनी पोलिस तेथे पोहचले. यावेळी गावडे यांना अटक करण्याचे सोडून जबानी घेण्यातच पोलिसांनी वेळ काढला. आता चोवीस तास संपले तरी गावडे यांना अटक किंवा त्याची चौकशी करण्यासही त्यांना पाचारण करण्यात आले नसल्याने ढवळीकर समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.गोविंद गावडे यांनी भर कार्यक्रमात जो धिंगाणा घातला त्याचे सुमारे तीनशे ते चारशे लोक प्रत्यक्षदर्शी आहेत. आता पोलिस तक्रार करूनही जर त्यांना अटक होत नाही तर जनतेने काय समजावे,असे ते उद्वेगाने म्हणाले,
आपण संयम राखून आपल्या कार्यकर्त्यांनाही शांत ठेवले. अन्यथा अनर्थ घडला असता. अशा लोकांना जर पोलिसांचे संरक्षण मिळू लागले तर उद्या परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.गोविंद गावडे यांच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असता ते सापडू शकले नाहीत,असे सांगून पोलिस अजूनही त्यांचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: