पणजीतील निषेध सभेत विविध संघटनांची जोरदार मागणी
बाबूशना मंत्रिमंडळातून
ताबडतोब डच्चू द्या
कारवाई न झाल्यास आंदोलन
गावागावांत नेण्याचा इशारा
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा प्रशासनावरील ताबा पूर्णपणे सुटला आहे. हा कारभार असाच चालणार असेल तर हे सरकार ताबडतोब बरखास्त करा व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,असा गर्भित इशारा आज आझाद मैदानावरील जाहीर सभेत अनेक वक्त्यांनी दिला. समाज कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना तात्काळ मंत्रिमंडळातून डच्चू द्या व या याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून गुन्हेगारांना ताब्यात घ्या, अन्यथा हे आंदोलन गोव्यातील प्रत्येक गावागावात पेटवले जाईल,अशी तंबीही यावेळी सरकारला देण्यात आली.
आज संध्याकाळी ५ वाजता पणजी येथील आझाद मैदानावर ऍड.रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.ही सभा नागरिकांतर्फे आयोजित करून यावेळी व्यासपीठावरून कोणालाही बोलण्याची संधी देण्यात आली होती. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा बेजबाबदारपणा,कायदा सुव्यवस्थेची दयनीय अवस्था,वाढता भ्रष्टाचार,लोकांचा विरोध डावलून बिल्डरांचे लांगूलचालन, आंदोलकांचा आवाज बंद करण्यासाठी गुंडगिरीचा वापर व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मंत्रिमंडळ तथा सरकारवरील कसलेच नियंत्रण नसल्याचा सूर अनेक वक्त्यांनी लावला.
गोवा बचाव अभियानाचे निमंत्रक डॉ.ऑस्कर रिबेलो,गोवा पीपल्स फोरमचे ऍड.सतीश सोनक व पर्यावरणवादी पॅट्रिशिया पिंटो आदी व्यासपीठावर उपस्थित होते."हम होंगे कामयाब' व "सत्यमेव जयते'या घोषवाक्यांनी या सभेची सुरुवात झाली. अन्यायाविरोधात व सरकारच्या एखाद्या चुकीबाबत उघडपणे बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, तो दडपून टाकण्याचे प्रयत्न झाल्यास या राज्यात कायद्याला काहीही महत्त्व नसल्याचेच स्पष्ट होते.यावेळी ऍड.रॉड्रिगीस यांच्यावर उपचार करताना रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या आयरिश यांनी "नुसती बोटेच नव्हे तर जीभ व शरीराचा प्रत्येक भाग जरी छाटलात तरी अन्यायाविरोधात लढण्याचा जोश मात्र मोडून काढणे शक्य होणार नाही',अशा शब्दात एका व्यक्तीबरोबर बोलताना फोनवर या हल्ल्याचे प्रत्युत्तर दिल्याचे डॉ. रिबेलो म्हणाले. जोपर्यंत या हल्ल्यामागील सूत्रधारांना पकडले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला.
राज्यात निवडून आलेल्या प्रतिनिधींवरून गोव्यातील जनतेची मनोवृत्ती प्रदर्शित होते. भ्रष्टाचारी व स्वार्थी नेत्यांना निवडून देणारी जनता किती प्रामाणिक आहे,याचाही विचार होण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर यांनी व्यक्त केले.महात्मा गांधींनी स्थापन केलेली कॉंगेस एवढ्या खालच्या थराला पोहचल्याने यापुढे डोळे बंद केलेल्या गांधीजींचा फोटो सर्वत्र लावा,असे उपहासात्मक आवाहनही त्यांनी केले.
माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांनीही सत्यासाठी प्रसंगी मरणाची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. प्रत्येक राजकीय नेत्याला "चोर' संबोधणे योग्य नाही असे सांगून मुळात पैशांसाठी व स्वार्थासाठी आपले मत विकून निवडून दिलेल्या नेत्यांकडून कसली अपेक्षा ठेवायची,असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनीही सरकारच्या पद्धतीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.सध्या राजकारणात जे सुरू आहे ते पाहता आपण चार हात दूरच राहिल्याचे त्या म्हणाल्या. अन्यायाविरोधात व अत्याचाराविरोधात जनता निडरपणे उभी राहत असल्याचे कौतुक करून आपला या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल,असेही त्या म्हणाल्या. गोवा मुक्तीनंतर आता अशा स्वार्थी,भ्रष्ट व गुन्हेगारी कृत्यात गुंतलेल्या नेत्यांपासून राज्य मुक्त करण्यासाठी दुसरा लढा उभारण्याची वेळ आल्याचे ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक नागेश करमली यांनी सांगितले.सत्यासाठी लढणारा वकील व केवळ अध्यापन न करता चांगल्याची शिकवण देणारा शिक्षक यांच्यावर होणारा हल्ला ही खरोखरच निंदनीय अशीच गोष्ट असून अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे युवक या आंदोलनात सक्रिय भाग घेतील,असे प्रा.दत्ता नाईक म्हणाले.यापूर्वी इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला आता त्याच कॉंग्रेसकडून लोकशाहीनुसार बहाल करण्यात आलेला लोकांचा आवाज मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रभारी प्रा.सुभाष वेलिंगकर यांनी केली. यावेळी अनेक वक्त्यांनी व्यासपीठावर उभे राहून सरकाराविरोधातील आपल्या मनातील असंतोषाला वाचा फोडली. यावेळी बोलणाऱ्यांत "ऊठ गोंयकारा'चे निमंत्रक अमोल नावेलकर,जीवन मयेकर,अरविंद भाटीकर,सोयरू वर्दे,शांती आल्मेदा,पत्रकार संदेश प्रभुदेसाई,एकनाथ केरकर,कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका,आवडा व्हिएगश,सेझ विरोधी मंचचे चार्ल्स फर्नांडिस,डॉ. ब्रॅडा मिनेझिस,मेलिसा सिमोएश,अभिजीत नाईक,सॅबी रॉड्रिगीस,सागर नाईक,भाजप विद्यार्थी मंचचे अध्यक्ष आत्माराम बर्वे,ऍड.प्रसाद शहापूरकर,प्रशांत नाईक,मोहनदास लोलयेकर,श्रीधर कामत,प्रा.रघुविर वेर्णेकर,डॉ.प्रमोद साळगावकर,अनंत अग्नी आदींची भाषणे झाली. यावेळी आझाद मैदानावर मेणबत्त्या पेटवून अन्यायाविरोधाची ही ज्योत आता प्रत्येकाने आपल्या मनात लावावी आणि तिचे वणव्यात रूपांतर करून अशा दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची ताकद नागरिकांत निर्माण होण्यासाठी प्रार्थना केली.
अंतर्गत मतभेद विसरा - पर्रीकर
गोव्याच्या हितासाठी जर खरोखरच आंदोलन उभे राहायला हवे तर प्रत्यक्षात प्रत्येकाने आपले वैयक्तिक मतभेद दूर ठेवण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. या व्यासपीठावरून अनेक वक्त्यांनी वेगवेगळे सूर व्यक्त केला. हे सूर जेव्हा एकत्र होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आंदोलन उभे राहील,असेही त्यांनी स्पष्ट केले. अराजकीय आंदोलन म्हणून पळवाट शोधून काढण्यापेक्षा चांगल्या लोकांना निवडून देण्यासाठी जनतेने प्रयत्न करावे. विद्यमान कॉंग्रेस सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात भाजप वारंवार आवाज उठवत असल्याचे ते म्हणाले. केवळ काही लोकांना भाजपची कावीळ असल्याने अशा लोकांकडून बुद्धिभेद निर्माण केला जातो. भाजप सध्याच्या सरकाराविरोधात आंदोलन छेडणार आहेच; परंतु एक निश्चित समिती नेमून जर नागरिकांना व्यापक आंदोलन छेडायचे असेल तर त्यास भाजपचा पूर्ण पाठिंबा असेल,असेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, या सभेवेळी मोहनदास लोलयेकर यांनी सभेसाठी एकही आमदार हजर नसल्याचा निषेध करून हल्ला पणजीत झाल्याने पणजीचे आमदार या नात्याने पर्रीकर उपस्थित हवे होते,असे वक्तव्य केले होते. यावेळी लगेच पर्रीकर प्रकटले.आपण सभेच्या मागे उभे राहून पणजीचा आमदार या नात्याने सर्वांची भाषणे ऐकत होतो,असे ते म्हणाले. दरम्यान,पर्रीकर याठिकाणी उपस्थित राहताच काही भाजपविरोधी आयोजकांनी आक्षेप घेतला व एक नागरिक म्हणून त्यांना बोलण्याची परवानगी द्यावी,अशी अट घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपण एक नागरिक म्हणूनच बोलत आहोत. भाजपचा नेता आणि विरोधी पक्षनेता ही आपली ओळख असून ती अजिबात लपवता येणार नाही,असेही त्यांनी निक्षून सांगितले.
Friday, 17 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment