- सरकार बरखास्तीची भाजपची मागणी
- आंदोलनाद्वारे रस्त्यावर उतरण्याचा इशारा
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): समाजकार्यकर्ते तथा पर्यावरण चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस, प्रा. प्रजल साखरदांडे आणि ऍड. जतीन नाईक यांच्यावर काल रात्री भरवस्तीतील एका ठिकाणी झालेला भीषण तलवार हल्ला हा अत्यंत थंड डोक्याने केलेला खुनाचाच प्रयत्न असून राजकारणी, गुंड आणि पोलिस यांच्यातल्या अत्यंत धोकादायक अशा संगनमताचा तो परिणाम आहे, असा संतप्त आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केला. गोव्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे हात रक्ताने माखले असून गुंड- पुंडांच्या सहकार्याने चाललेल्या या सरकारच्या हाती गोवा अजिबात सुरक्षित नसल्याने ते बरखास्त करणेच योग्य असल्याचे जळजळीत निरीक्षणही पर्रीकर यावेळी नोंदवले.
विद्यमान स्थितीत गोव्यावर दहशतवाद अक्षरशः घिरट्या घालत आहे. या परिस्थितीतही गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि गुन्हेगार यांच्यातील घनिष्ट संबंधांमुळे राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांकडे पोलिस गांभीर्याने पाहूच शकत नाहीत. त्यामुळे या धोकादायक परिस्थितीत या भूमीच्या रक्षणासाठी सामान्य माणसाला रस्त्यावर उतरण्यावाचून पर्यायच उरलेला नाही. वाढती गुन्हेगारी आणि दहशतवादाविरूध्द दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि स्वयंसेवी संघटनांना भाजपचा पूर्ण पाठिंबा असेल. त्यासाठी आमचा पक्षदेखील आंदोलनात उतरेल अशी ग्वाहीदेखील पर्रीकर यांनी दिली.
भाजपच्या येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांशी बोलताना, पर्रीकर यांनी कामत सरकारच्या एकंदर धोरणावर जबरदस्त कोरडे ओढले.हे सरकार सत्तेवर राहण्यास लायक नसून ते त्वरित बरखास्त करावे ही मागणी घेऊन भारतीय जनता पक्षाचे एक शिष्टमंडळ येत्या शुक्रवार दि. १७ रोजी राज्यपाल एस. एस. सिद्धू यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या गृहमंत्र्यांची स्थिती तर इतकी डबघाईस आली आहे की, त्यांनी आता काशीला जाऊन सन्यासच घेणेच योग्य असल्याचा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ज्या गृहमंत्र्यांना स्वतःच्या शाळेतल्या देवी सरस्वतीच्या मूर्तीचे रक्षण करता आले नाही ते गोव्याचे दहशतवादापासून रक्षण काय कपाळ करणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवताना ते म्हणाले, या गृहमंत्र्यांची लीला अगाधच आहे. पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे गृहस्थ आपले हितसंबंध जपत आहेत. गुंड - पुंडांना संरक्षण देण्यात खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार आहेत. माशेल येथील "कालिका ज्वेलर्स' या दुकानातील जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेन्सियो नामक एका संशयिताच्या डायरीत अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावे, हुद्दे आणि त्यांना दरमहा दिले जाणारे हप्ते यांची रीतसर नोंद होती. त्यामध्ये प्रामुख्याने देऊ बाणावलीकर, प्रवीणकुमार वस्त, फ्रान्सिस कॉर्त आणि हप्ता बहाद्दर म्हणवून नाव कमावलेले हवालदार विनय श्रीवास्तव तसेच नितीन गावकर यांच्या नावांचा समावेश होता. त्यांना दिल्या जाणाऱ्या पैशांचाही त्यात उल्लेख होता. दरमहा किमान पाच हजार ते एक लाखापर्यंतच्या हप्त्यांच्या नोंदी प्रत्येकाच्या नावावर आहे. "कालिका ज्वेलर्स'मधील जबरी चोरीनंतर गुंडांनी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या हप्त्यांमध्ये भरमसाट वाढ केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही सर्व माहिती गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे असूनदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, या प्रश्नाचे उत्तर लोकांनीच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडून घेण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने मडगावातील शस्त्रास्त्र प्रकरणातील आरोपींवर ९० दिवस उलटले तरीही आरोपपत्र दाखल का केले गेले नाही, याचेही उत्तर आता जनतेने मुख्यमंत्र्यांकडे मागावेच अशी आग्रही मागणी पर्रीकरांनी केली.
----------------------------------------------------------------------
मुक्काम पोस्ट विशाळगड
गुंड, समाजकंटक व राजकारणी यांच्यातले संबंध किती घनिष्ठ आहे हे सांगण्यासाठी पर्रीकरांनी यावेळी पत्रकारांना एक सीडी दाखवली. त्यामध्ये मुख्यमंत्री दिगंबर कामत, त्यांच्या पत्नी आशा कामत यांनी मोती डोंगर - मडगाव येथील शस्त्रास्त्र प्रकरणातील प्रमुख संशयित सूत्रधार जलील शेख व त्याचा सहकारी मकबल शेख, जलीलचा भाऊ बशीर, मकबूल शेख, अलिफ बंडुकुडे, अल्ताफ सय्यद यांच्याबरोबर केलेल्या विशाळगड दौऱ्याचे चित्रण आहे. अलीफ बंडुकुडे हा बोगस मते आणण्यात पटाईत असून तो मुख्यमंत्र्यांच्या निकटच्या वर्तुळातला म्हणून ओळखला जातो. अल्ताफ सय्यद हा बालिकेवरील बलात्काराच्या प्रकरणातला मुख्य संशयित आहे. जलीलचा भाऊ बशीर हा मुख्यमंत्र्यांचा मोती डोंगरवरील अगदी नजीकचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. या सीडीमधील एकंदर चित्रण पाहता, ही सर्व मंडळी मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे आहेत हे स्पष्ट होते. यातील एक नामचीन गुंड मुख्यमंत्र्यांसाठी सरबत ओत असताना दिसतो तर त्यांच्या पत्नी अन्य गुंडासमवेत हसत खेळत गप्पा मारताना दिसतात. राज्याचा मुख्यमंत्रीच जर सहकुटुंब अशा गुंडांबरोबर सहली करत असतील तर गुंडांना भीती ती कसली, असा सवालही पर्रीकरांनी यावेळी केला. मुख्यमंत्री कामत हे निवडून आल्यास विशाळगडाच्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा नवस याच टोळक्याने केला होता व नंतर तो फेडण्यासाठीच मुख्यमंत्री कुटुंबासह विशाळगडवर गेले होते, असे पर्रीकर यांनी नमूद केले. दरम्यान, गुन्हेगारांसोबत वावरणाऱ्या दुतोंडी लोकांच्या हाती गोवा सुरक्षित आहे का, विचार करा, अन्यथा गोव्याचा सर्वनाश अटळ आहे, असा त्याचा संदेशही सीडीच्या शेवटी देण्यात आला आहे.
------------------------------------------------------
वाऽऽरे मंत्रिमंडळ
विद्यमान मंत्रिमंडळात इतका गोंधळ आहे की, कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही. मंत्र्यांमध्ये कमालीचा गोंधळ आहे. मिकी पाशेको उठतात आणि दुसरे मंत्री चर्चिल तसेच आमदार रेजिनाल्ड यांच्याविरूध्द अपात्रतेची याचिका दाखल करतात. विद्यमान वाहतूकमंत्री हे गृहमंत्र्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यावरून तोफ डागतात. राज्यात गुन्हेगारी, साठमारी, लुटपात, भ्रष्टाचार, हितसंबंध यांनी कळसच गाठला असून इतकी बिकट परिस्थिती गोव्यावर कधीही उदभवली नव्हती, असेही पर्रीकर म्हणाले. राज्यात गेल्या दीड वर्षात अनेक गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या. अठरा ठिकाणी मूर्तिभंजन झाले. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बेकायदा शस्त्रसाठा सापडला. या सर्वावर कळस म्हणजे आयरिश, प्रजल व जतीन यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला असल्याचेही ते म्हणाले.
Wednesday, 15 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment