आयरिश हल्ला प्रकरण; संशयितांनी सात दिवसांची पोलिस कोठडी
बाबूशच्या सांगण्यावरूनच हल्ला: आयरिश यांचा आरोप
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): 'ऊठ गोयकारा' संघटनेचे प्रवक्ते तथा समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस व निसर्ग बचाव चळवळीतील कार्यकर्ते प्रजल साखरदांडे, ऍड. जतीन नाईक यांच्यावर काल रात्री झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी आज पहाटे पणजी पोलिसांनी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे कट्टर समर्थक अँथनी बार्रेटो (सांव पावलू - ताळगाव), नॉर्मन जॉन ऊर्फ बॉचो (व्हडलेभाट- ताळगाव ) व संदीप तुकाराम वायंगणकर (टोंक - करंजाळे) या संशयितांना अटक केली. तसेच या हल्ल्यात वापरण्यात आलेली मारुती कार जप्त करण्यात आल्याचीही माहिती आज सायंकाळी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली. पोलिसांनी ३०७ सह अन्य विविध कलमांखाली ही कारवाई केली. सायंकाळी संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या हल्ल्यानंतर ऍड. आयरिश यांच्या घराभोवती आणि इस्पितळाच्या ठिकाणीही पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
आयरिश यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच समाजाच्या विविध क्षेत्रांतील मानवरांनी आज सकाळपासून इस्पितळात जाऊन त्यांची चौकशी केली. सकाळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, कॉंग्रेसचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर, सांताक्रुजच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा व कोकण प्रांत संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, गोवा विभाग कार्यवाह प्रा.रत्नाकर लेले, धेंपे महाविद्यालयाचे विद्यार्थी, ऊठ गोयकारा संघटनेने पदाधिकारी व अन्य अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी ऍड. आयरिश व प्रा. साखरदांडे यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
काल रात्री १०.३० वाजता पणजीत टपाल खात्याच्या मागे असलेल्या अशोक बार अँड रेस्टॉरंटमधे जेवायला बसलेल्या ऍड. आयरिश, प्रा.साखरदांडे, ऍड.जतीन नाईक यांच्यावर सशस्त्र हल्लेखोरांनी तलवारी, चाकू, बाटल्या व धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला होता. काळे टीशर्ट, जीन पॅंट व तोंडावर बुरखा अशा वेशात हल्लेखोर आले होते.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत ऍड. आयरिश व साखरदांडे यांना कांपाल क्लिनिकमधे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. ऍड. आयरिश व साखरदांडे यांच्या बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
"माझ्यावर व प्रजल यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामागे बाबूश मोन्सेरात यांचाच हात आहे,' असा थेट आरोप आज ऍड. आयरिश यांनी इस्पितळात पत्रकारांशी बोलताना केला. पोलिसांना दिलेल्या जबानीतही त्यांनी हेच म्हटले आहे. रोहित मोन्सेरात यांच्याविरुद्ध जर्मन मुलीला अश्लील "एसएमएस' पाठवल्याप्रकरणी तक्रार दाखल करू नये यासाठी आपल्यावर अनेकांनी दबाव आणला. तसेच तिच्या आईवर दबाव आणला जात असल्याचे ते म्हणाले. २ ऑक्टोबर रोजी रोहित याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर बाबूश मोन्सेरात यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी त्या जर्मन महिलेच्या घरी जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी तिला धमक्या दिल्या जात असल्याचे ऍड. आयरिश यांनी सांगितले.
आपल्यावर हल्ला होण्यापूर्वी बाबूश यांच्या समर्थकांचे मोबाईलवर अनेक फोन आले होते. बाबूश यांच्या मुलाविरूध्द तक्रार दाखल करू नये यासाठी धमक्यांचे ते फोन होते असे सांगून बाबूश यांनी निराशेपोटीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप ऍड. आयरिश यांनी केला. हल्लेखोरांनी माझा गाळा कापण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचवेळी मी टेबलाखाली वाकल्याने बचावलो, असे ते म्हणाले. "गोव्यासाठी ऊठ गोयकाराचे सर्व कार्यकर्ते वचनबद्ध असून आमचा प्राण गेला तरी, त्याची फिकीर नाही,' असे ते म्हणाले.
----------------------------------------------------------------
...अन आयरिशना रडू कोसळले
सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा व कोकण प्रांतचे संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांची इस्पितळात भेट असता आयरिश भावनाविवश झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. यावेळी प्रा. वेलिंगकर यांनी "आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत', असे आश्वासन दिले. त्याबरोबर प्रा. वेलिंगकर यांच्या गौरव सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही याची खंत आयरिश यांनी व्यक्त केली.
Wednesday, 15 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment