Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 28 July 2008

लोक आजही जातीयवाद व अंधश्रद्धेच्या जोखडात नंदकुमार कामत यांची खंत

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) ः नागरिकांची वाढती राज्यनिर्भरता आणि दैवनिर्भरता याच आजच्या खऱ्या समस्या आहेत. सरकार व दैवावर विसंबून राहाणारी माणसेच आज अधिक दिसतात. काही वर्षांपूर्वी माणूस अशिक्षित, जातीयवादी आणि संकुचित वृत्तीचा होता, आज आपण तो सुशिक्षित झाल्याचा दावा करतो. हे खरे असले तरी तो जातीयवाद, अंधश्रद्धा यापासून मात्र मुक्त झालेला नाही, ही आपली खरी खंत आहे, असे उद्गार लेखक व विचारवंत डॉ. नंदकुमार कामत यांनी आज येथे काढले.
डॉ. कामत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये आयोजित स्नेहमेळाव्यात डॉ. कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, लेखक दिलीप बोरकर व कला अकादमीचे सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई होते.
सध्या गोव्यात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे, १९८० नंतर या राज्याची वाटचाल अधोगतीकडे चालली आहे. भ्रष्टाचाराचा सुकाळ झाला आहे. थिल्लर , सवंग संस्कृती वाढली आहे, असे सांगताना डॉ. कामत यांनी आत्तापर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेतला. विविध भागांमध्ये वाढत चाललेल्या आत्महत्यांमागील कारणे शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. १५ ते ४५ वर्षे वयोगटात अशी निराशा येण्यामागे समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादण्यात, दुःखात वाटेकरी होण्यात आपण कमी पडतो, असे ते म्हणाले.
गोव्यात दहा हजार कोटींची पर्यायी अर्थव्यवस्था अस्तित्वात असल्याचे सांगून ते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रासाठी निश्चित धोरण नसणे हीच खरी समस्या आहे. येथील योजना, प्रकल्प याबाबत विचार करताना स्थानिकांना विश्वासात घेण्याची, त्यांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. या मातीची कोणतीही माहिती नसलेल्या सचिवांवर ही कामगिरी सोपविली जाते, ही नामुष्की असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनाची गुणवत्ता आणि सुखाची उंची असे दोन निकष लावून सत्ताधाऱ्यांनी आपली वाटचाल ठरवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजच्या स्थितीचे डॉ. कामत यांनी योग्य मूल्यमापन केले आहे. त्यांच्यासारख्या अस्वस्थ माणसाने निराश होऊ नये, कारण अशी माणसेच दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालू शकतात, असे गौरवोद्गार न्या. धर्माधिकारी यानी काढले.
सूत्रसंचालन संदेश प्रभुदेसाई यांनी केले. उपस्थितांमध्ये आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, सुरेंद्र सिरसाट, सुरेश वाळवे, सतीश सोनक आदींचा समावेश होता.
---------------------------------------------------------------------------------
'देशासाठी योगदान द्या'
आपली घटना ही आदर्श असून, त्यात अधिकारांप्रमाणेच कर्तव्यांचाही उल्लेख आहे. आपला उत्कर्ष साधताना देशाच्या संपत्तीचे रक्षण करा, देशाला गरज लागेल त्यावेळी योगदान द्या, असे आवाहन याप्रसंगी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी केले.
--------------------------------------------------------------------------------

No comments: