Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 31 July 2008

डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांना 'मॅगसेसे' पुरस्कार

गडचिरोली, दि.३१ : मागील ३५ वर्षापासून भामरागडच्या जंगलातील हेमलकसा येथे आदिवासींची सेवा
करणाऱ्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे यांना "मॅगसेसे' पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. कर्मयोगी दिवंगत बाबा आमटे यांना देखील मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एकाच घरातील तिघांना "मॅगसेसे' पुरस्कार मिळण्याची ही अभूतपूर्व घटना समजली जात आहे. आज दिवसभर डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे या दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
गेली ३५ वर्षे शांतपणे काम करीत कुठलीही अपेक्षा न ठेवता आदिवासींची सेवा केली, त्या कार्याचेच हे फळ आहे. आपण केवळ निमित्तमात्र असून हा सन्मान आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्याच बळावर इथपर्यंतचा पल्ला आम्हाला गाठता आला आहे, अशी प्रतिक्रिया मॅगसेसे पुरस्कार घोषित झाल्यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आमटे यांचे कार्य
पद्मश्री, नागभूषण, आदिवासी सेवक, महावीर पुरस्कार, हेगडे पुरस्कार अशा पुरस्कारांनी डॉ. प्रकाश आमटे सन्मानित झाले आहेत. डॉ. प्रकाश आमटे याचं बालपण आनंदवनात गेलं. बाबांनी महारोग्यांची केलेली सेवा, त्यांनी अगदी जवळून बघितली. समाजाने झिडकारलेल्यांना जवळ करताना येणाऱ्या दाहक ज्वालांचा अनुभव बाबांच्या वाट्यालाही आला. मात्र बाबा डगमगले नाहीत. बाबांची सेवा चिमुकल्या प्रकाशच्या अंतर्मनात थेट पोहचत होती. प्रकाशचं मन वेदना समजून घेऊ लागलं होतं. बाबांच्या समाजसेवेच्या सावलीत प्रकाश वाढत गेला, तो साऱ्यांना लख्ख करण्यासाठी!
डॉ. प्रकाश आमटे म्हणतात, "बाबा स्वत: डॉक्टर नसल्याने त्यांना त्याकाळी बऱ्याच अडचणी येत होत्या. तेव्हाच मी डॉक्टर व्हायचं ठरवलं. १९७० मध्ये अभ्यासक्रमांची परीक्षा दिल्यानंतर मी बाबांसह भामरागडच्या जंगलात गेलो. जंगलात जाण्यासाठी कुठलेही कारण नव्हते, मात्र त्या जंगलातून परत आनंदवनात आल्यानंतर पुन्हा त्याच जंगलात जाण्यासाठी अनेक कारणे होती. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत हेमलकसा गाठले ते मागे वळण्यासाठी नाहीच!
हेमलकसा येथे प्रकल्प उभारण्याच्या कामी जागा मिळविण्याकरिता तीन वर्षे लागली. २३ डिसेंबर १९७३ रोजी बाबांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प उभारला. हा प्रकल्प सांभाळण्यासाठी ३५ वर्षापूर्वी डॉ. प्रकाश जेव्हा हेमलकसा येथे आले, तेव्हापासून त्यांच्या जगण्याच्या लढाईचा प्रवास सुरू झाला. या लढाईत त्यांच्या पत्नी मंदाताईंची मोठी साथ लाभली. लग्नानंतरच्या अगदी काही दिवसांतच ते मंदाताईंना घेऊन दु:खाच्या जंगलात सुख शोधायला आले.
कुठून सुरुवात करावी, कशी करावी, कसं राहावं अशा विचारात एक गवताची झोपडी उभी राहिली. गळ्यात स्टेथॅस्कोप अडकवून डॉ. प्रकाश झोपडीतून बाहेर पडू लागले. आदिवासी माडियांच्या आजारासह कितीतरी समस्या उभ्या होत्या. मंदाताईंनी डॉ. प्रकाश यांना कुठल्याही परिस्थितीत एकटे पडू द्यायचे नाही, असा मनाशी निश्चय केला होता. त्यासाठी नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता.
भामरागड परिसरात आदिवासींच्या जन्म-मृत्यूची नोंद नव्हती. किती मेले आणि किती जिवंत आहेत, याची सरकारच्या लेखी कुठलीच दखल नव्हती. असण्याचे कारणही नव्हते. तेव्हा जन्म-मृत्यूच्या नोंदी, आरोग्यासंबंधी आदिवासींमध्ये जागृती, त्यांचं शिक्षण, शेतीचं तंत्रज्ञान, त्यांचे हक्क आदी सारेच प्रश्न सोडविणं गरजेचं होतं. माणसाला बघताक्षणी जंगलात पळणाऱ्या आदिवासींमध्ये जागृतीची ज्योत पेटविणे वाटते तितके सोपे नव्हते. त्यासाठी डॉ. प्रकाश यांनी आधी आजारावर उपचार सुरू केले. साप चावल्यानंतर त्यांनी केलेल्या उपचाराने मुलं वाचू लागली. तसा त्या आदिवासींचा प्रकाशभाऊंवर विश्वास बसू लागला. हाच विश्वास आजही कायम आहे. म्हणूनच त्यांच्या रुग्णालयात वर्षाकाठी ४० ते ५० हजार आदिवासी उपचारासाठी येतात. आरोग्याची समस्या सोडविता-सोडविता त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी डॉ. प्रकाश यांनी शाळा उघडली. आदिवासींच्या मुलांचे पाय शाळेकडे वळू लागली. आज त्यांच्या शाळेतून शिकून गेलेली पाच मुले डॉक्टर झाली आहेत, जवळपास ५० ते ६० मुले शिक्षकी पेशात आहेत आणि ९५ टक्के आदिवासी मुले शिकून आपल्या भागात जागृतीचे कार्य करीत आहेत.
डॉ. प्रकाश आमटे केवळ आदिवासींच्या आजारावर उपचार, शिक्षण करून थांबले नाहीत तर त्यांच्या हक्कासाठी भांडले आणि भांडत आहेत. मजुराला मजुरी मिळवून देण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांपुढे वाद घातला आहे. ते बोलताना नेहमी म्हणतात, आम्ही कुठलाच संकल्प करून हेमलकसा येथे आलेलो नाही. परिस्थितीनुरूप बदलत जाऊन, समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन, जागीच त्या समस्या सोडविण्यासाठी प्ररुत्न केले. घरातली भांडणे न्यायालयात पोहचू दिली नाहीत, यातच त्यांच्या कार्याचं यश आहे.
आदिवासींच्या सुखदु:खात सहभागी होऊन जीवन जगत असताना, त्यांना मुक्या प्राण्यांच्या सहजीवनाची साथ लाभली. एक-एक प्राणी त्यांच्या परिवाराचा सदस्य बनला आणि कुत्र्या-माकडांच्या मैत्रीची घट्ट वीण-तिथे विणली गेली. सुरुवातीच्या काळात आदिवासी माकडाची शिकार करून त्यांचे मांस खात होते. डॉ. प्रकाश आमटेंनी त्या आदिवासींना माकडाच्या बदल्यात अन्न दिले आणि मुक्या प्राण्यांना मारू न देण्याचा नकळत सल्ला दिला. माकड, कुत्रा, हरिण, वाघ, अस्वल असे कितीतरी प्राणी त्यांच्या प्राणी संग्रहालयात येऊ लागली. माणसासह त्यांनी प्राण्यांचेही सहजीवन सुरू केलं. पस्तीस वर्षापूर्वी हेमलकसा परिसरात वीज नव्हती, संपर्काचे साधन नव्हते. अशा अंधाऱ्या परिस्थितीत प्रकाशाचा किरण तिथे आला आणि सारा परिसरच उजाळला.
-----------------------------------------------------------------------------------
कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेल्या कार्याचे फळ : डॉ. प्रकाश आमटे
दै. 'गोवादूत'ने डॉ. आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, ""आज बाबा पाहिजे होते, त्यांच्या मुलाला व सुनेला मॅगसेसे पुरस्कार घोषित झाल्याचे बघून त्यांना खूप आनंद झाला असता, आम्हाला देखील त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, असे म्हणत असतांना त्यांचे डोळे पाणावले. या पुरस्कारामुळे आमच्या कामाला निश्चितच गती येईल, त्यापेक्षाही ज्यांच्यासाठी आम्ही काम केले त्या आदिवासींचे प्रश्न या पुरस्काराने जगासमोर येतील. त्यांच्या समस्या, त्यांच्या हालअपेष्टा लोकांपर्यंत पोहचतील. हा सन्मान आमचा नसून खऱ्याअर्थाने आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्या आदिवासींचाच आहे, भावपूर्ण उद्गार डॉ. आमटे यांनी काढले.

No comments: