Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 21 June 2008

'बसप'ने पाठिंबा काढला

महागाईप्रश्नी केंद्राला सपशेलअपयश; मायावती कडाडल्या
लखनौ, दि. २१ : डावे पक्ष केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याच्या पोकळ धमक्या देत असतानाच, उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने आज संपुआ सरकारला बाहेरून असलेला पाठिंबा मागे घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आज येथे एका पत्रकार परिषदेत मायावती यांनी ही घोषणा केली.
केंद्रातील संपुआ सरकार आपल्या राज्याला सापत्न वागणूक देत आहे. केवळ उत्तरप्रदेशच्याच नव्हे तर देशभरातील सर्वसामान्यांच्या जिवावर उठलेले संपुआ सरकार एक क्षणही सत्तेवर राहायला नको, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. बसपाकडे १७ खासदार आहेत.
""संपुआ सरकार उत्तरप्रदेशच्या विकासाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. आपल्या पक्षाला आणि सरकारला केंद्राकडून सापत्न वागणूक मिळत आहे. हा अन्याय मी कदापि सहन करू शकत नाही,'' असा आरोप त्यांनी यावेळी केला. "सर्वजन समाजा'चे (सर्व समुदाय) कल्याण करण्याचे वचन संपुआ सरकारने दिले होते. पण, विशिष्ट समाजाला प्राधान्य देऊन संपुआने अन्य समाजाची उपेक्षा केली. हे पाठिंबा काढण्यामागील मुख्य कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपुआ सरकारवर हल्ला करताना मायावती म्हणाल्या की, महागाई नियंत्रणात आणण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. याशिवाय ताज कॉरिडोरप्रकरणी आपल्याला उगाच त्रास दिला जात आहे. मला बदनाम करण्याची एकही संधी कॉंगे्रसने गमविली नाही. कॉंगे्रस आणि भाजपा हे एकजात आहेत. संसदेत जर संपुआ सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला तर आपला पक्ष बाजूने मतदान करेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
पाठिंबा मागे घेत असल्याचे पत्र आपण राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील, संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी व लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांना पाठविले आहे, असे त्या म्हणाल्या.
पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय हा देश व पक्षाचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. महागाईच्या मुद्यावर आता माझा पक्ष लवकरच आंदोलनाची रूपरेषा तयार करेल. उत्तर प्रदेशात कॉंगे्रसची स्थिती अत्यंत दयनीय आहे. केंद्रात अणुकरारावरून डावे व संपुआ आपापसात लढत आहेत. जनतेकडे त्यांचे लक्ष नाही. म्हणूनच आमचा पक्ष आता स्वतंत्र मार्ग चोखाळणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही.
सरकारवर परिणाम नाही
बसपाने पाठिंबा काढून घेतला असला तरी केंद्रातील संपुआ सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण, मुलायमसिंग यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी अशा स्थितीत सरकारला पाठिंबा देऊ शकते. सपाजवळ ३९ खासदार आहेत. डाव्या पक्षांची आघाडी कधी अणुकरारावरून तर कधी महागाईच्या मुद्यावरून केंद्राचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी देतच असते. बसपाने पाठिंबा काढून घेतला आहे, अशा स्थितीत डाव्या पक्षांच्या आघाडीनेही जर सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर मात्र मनमोहनसिंग सरकार अल्पमतात येऊ शकते. परंतु, पाठिंबा जारी ठेवावयाचा की काढू न घ्यावयाचा याचा निर्णय २५ जूनला डावे पक्ष घेणार आहेत. तोपर्यंत तरी हे सरकार सत्तेवर राहणार आहे.
................................................
कॉंगे्रस-सपा एकत्र?
नवी दिल्ली, दि. २१ : संपुआ सरकारला बसपाने ठोकलेला रामराम आणि डाव्यांची पाठिंबा काढण्याची धमकी या पार्श्वभूमीवर डळमळीत झालेल्या कॉंगे्रसला समाजवादी पार्टीने मैत्रीचा हात दिला आहे. आपसातील शीतयुद्धाला विराम देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला असल्याने डाव्यांनी पाठिंबा काढला तरी देखील संपुआ सरकारकडे साधे बहुमत असेल अशी सध्याची स्थिती आहे.
डाव्यांच्या निर्णायक धमकीनंतर कॉंगे्रसने सपाला जवळ करण्याची मोहीमच हाती घेतली होती. आता तर, मैत्रीचा हात मिळवावा इतक्या स्तरापर्यंत त्यांच्यातील मतभेद दूर झालेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात युती करण्याच्या शक्यतेचीही हे पक्ष चाचपणी करीत आहेत. डाव्यांकडे असलेला ६२ खासदारांचा आकडा भरून काढण्याची ताकद सपाकडे नसली तरी सपाच्या येण्यामुळे डाव्यांच्या जाण्याचा सरकारच्या स्थैर्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. बसपाचा विचार कॉंगे्रसने तसाही कधीच केला नव्हता. कारण, सपाच्या ३९ खासदारांसोबतच जदएस आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रत्येकी तीन आणि सहा अपक्ष खासदार आहेत. त्यांची बेरीज २८१ होत असून, हा आकडा साधे बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे.

No comments: