भाजप कार्यकारिणीची मागणीपणजी, दि. 15 (प्रतिनिधी) - वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांच्यावर तिकीट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे खाते काढून घ्यावे, कॅसिनोंना देण्यात आलेले परवाने त्वरित रद्द करावे, "सेझ' प्रकल्पांसाठी देण्यात आलेली जागा सरकारने मागे घेऊन जागा वाटपाची चौकशी करावी त्याचप्रमाणे संपावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात, अशा प्रकारचे ठराव आज भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आल्याची माहिती गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली. ते आज कार्यकारिणी बैठकीनंतर पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर पक्षाचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर व संघटनमंत्री सुभाष साळकर उपस्थित होते.
राष्ट्रीय सहसंघटनमंत्री सतीश वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय व महागाईच्या विरोधात असे दोन ठराव यावेळी संमत करण्यात आले. सामान्याला दोनवेळेचे अन्न घेणेही मुश्कील झाले आहे. पेट्रोलची सात वेळा दर वाढवण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत ही अतोनात महागाई वाढली असून जेव्हा जेव्हा केंद्रात कॉंग्रेस सरकार सत्तेवर असते, त्यावेळी महागाईने आपली सीमा ओलांडली आहे, असे महागाईच्या विरोधात घेण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे. सट्टेबाजी करणाऱ्यांकडे कॉंग्रेसचे साटेलोटे असल्यामुळे ते महागाईवर अंकुश ठेवूच शकत नसल्याचे यावेळी खासदार श्री. नाईक म्हणाले. महागाईच्या विरोधात माजी सभापती ऍड. विश्वास सतरकर यांनी ठराव मांडला तर त्याला सौ. कुंदा चोडणकर यांनी अनुमोदन दिले.
भारतीय जनता पक्षाने कमी दरात 14 ठिकाणी तेल, नारळ व कांदे वाटप करून महागाई आटोक्यात आणता येत असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. यावेळी 48 हजार किलो कांदे, 26 हजार 500 लीटर तेल तर, 38 हजार नारळ वाटप केल्याची माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली. तर सरकार 33 रुपयांत बाजारात मिळणारी वस्तू स्वस्त दराच्या नावाने 34 रुपयांत विक्री करून लोकांची थट्टा करीत असल्याचे ते म्हणाले.
गोवा सरकारने सध्या अंदाधुंद कारभार चालवला आहे. सरकार नावाची चीजच नाही. कायदा व्यवस्था तर पूर्णपणे कोलमडली आहे. स्कार्लेट खून प्रकरणामुळे राज्याची अतोनात बदनामी झाली आहे. राज्यात हजारो तरुण बेकार आहेत, त्यांना हे सरकार नोकरी देऊ शकत नाही. प्रादेशिक आराखडा अद्याप तयार झालेला नाही. "सेझ' प्रकल्पाबाबत सरकाराचे दुटप्पी धोरण आहे. कॉंग्रेसच्याच आमदाराने साळ नदीतील कॅसिनोला विरोध करून आता कॉंग्रेस हा कॅसिनो मांडवी नदीत उभा करू पाहत आहे, असे राजकीय ठरावात नमूद करण्यात आले आहे, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
वित्तमंत्री ऍड. नार्वेकर यांच्यावरील आरोपांचा राज्य सरकारशी कोणताही संबंध नसल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाबद्दल भाजप कार्यकारिणीने आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी श्री. नाईक म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांच्यावर हवालाचा आरोप झाल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता आणि त्यातून निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यावरच त्यांनी लोकसभेत पाय ठेवला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी मायावतींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांवर "एफआयआर' नोंद होताच त्याला मंत्रिमंडळातून कमी करण्यात आले तर गोव्याचे मुख्यमंत्री अशा प्रकरणाचे वक्तव्य करून गोव्याचे नाव बदनाम करीत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. ऍड. नार्वेकर यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, असे श्री. नाईक म्हणाले.
कार्यकारिणीवर महिलांना स्थान
33 टक्के महिला आरक्षणाअंतर्गत भारतीय जनता पक्ष तसेच जिल्हा समित्यांवर महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजप प्रदेश समितीच्या उपाध्यक्षपदी श्रीमती कमलिनी पैंगिणकर तर सचिवपदी सौ. छाया विजय पै खोत यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर गोवा जिल्हा समितीच्या उपाध्यक्षपदी सौ. शुभांगी वायंगणकर तर सचिवपदी अरुणा राजेश पाटणेकर यांची नियुक्ती झाली आहे. तसेच दक्षिण गोवा जिल्हा समितीच्या उपाध्यक्षपदी श्रीमती आंतोनेत फ्रान्सिस मास्कारेन्हस तर सचिवपदी सौ. रोहिणी परब व सौ. मेदिनी नाईक यांनी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली.
No comments:
Post a Comment