Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 February 2011

मांद्रेऐवजी हरमलमध्ये क्रीडाग्राम?

दोन लाख चौ. मी. जागा संपादन होणार
फलोत्पादन क्षेत्रात प्रकल्प उभारण्याचा सरकारचा घाट
पणजी, दि.२६ (प्रतिनिधी): राज्यात २०१४ साली होणार्‍या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठीच्या नियोजित ‘क्रीडाग्राम’ प्रकल्पाकरिता मांद्रे येथील जागा रद्द करून आता हरमल येथील सर्वे क्रमांक ४०, ४१, ४२, ४३ आणि ४४ मधील सुमारे २,४४,३९३ चौ. मी. जागा संपादन करण्याचा घाट घातला जात आहे. प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत ही फलोत्पादन जागा दाखवण्यात आली आहे.क्रीडाग्रामसाठीसदर जागा निश्‍चित करून सरकारने स्वतःहूनच प्रादेशिक आराखड्याला कचर्‍याची टोपली दाखवल्याची चर्चा सुरू आहे.
गोव्यात २०१४ साली राष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने विविध ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी सुरू आहे. या स्पर्धांसाठी पेडणे तालुक्यातील मांद्रे किंवा हरमल येथील किनारीभागात क्रीडाग्राम उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी मांद्रे येथील सर्वे क्रमांक २७६, २७७, २७९ आणि ३६६ अंतर्गत ४,३२,८७७ चौ. मी. सरकारी जमीन संपादन करण्याची तयारी केली होती. या भूसंपादनाला मांद्रेचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व नागरिकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सदर जागा रद्द करून आता हरमल येथे २,४४,३९३ चौ. मी. जागा संपादन करण्याचे ठरवले आहे. क्रीडाग्राम हा प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तो सरकारसाठी कितपत फायदेशीर ठरेल याबाबत शंकाच आहे.
दरम्यान, हरमल येथील सदर जागा प्रादेशिक आराखडा २०२१ नुसार ओर्चाड (फलोत्पादन) क्षेत्रात येते. या आराखड्यात फलोत्पादन जमिनीच्या वापराबाबत सरकारने स्पष्ट निर्देश घालून दिले आहेत. या क्षेत्रात जनहितार्थ एखादा प्रकल्प राबवण्यास विशेष सवलत देण्यात आली असली तरी राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठीचा हा प्रकल्प उभारता येणार काय, याबाबत मात्र अनेकांचे दुमत आहे. एकीकडे वसाहत क्षेत्र मर्यादित ठेवण्यात आल्याचे सरकारकडून सांगितले जात असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात फलोत्पादन क्षेत्राचाही वसाहत क्षेत्राप्रमाणे वापर होऊ लागला तर परिस्थिती गंभीर बनणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. हरमल ग्रामस्थांनी प्रादेशिक आराखड्याविरोधात दंड थोपटले आहेत. ग्रामस्थांच्यावतीने केलेल्या शिफारशींचा अजिबात विचार करण्यात आला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारच जर फलोत्पादन क्षेत्राचा वापर ‘क्रीडाग्राम’ उभारण्यासाठी करीत असेल तर यापुढे या क्षेत्राचा वापर स्थानिकांकडून बांधकामासाठी केला जाऊ शकतो. अशा लोकांवर सरकार कोणत्या तोंडाने कारवाई करेल? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
लीबियाला जाळून टाकू : गडाङ्गी
लीबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मर गडाङ्गीने संपूर्ण लीबियाला जाळून टाकण्याची धमकी दिली असून अमेरिकेने लीबियाविरोधात एकतर्ङ्गी कडक उपाययोजना तयार करणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्रिपोली येथील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला आहे. तसेच लीबियासोबतचे सैन्य संबंध तोडले आहेत. दरम्यान, लीबियात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी आणण्याचे काम भारत सरकारने सुरू केलेे आहे.
तरुणाईत भारत जगात ‘नंबर वन’
गुवाहाटी, दि. २६ : तरुणाईत भारत देश जगात ‘नंबर वन’ असून, १० ते १९ या वयोगटातील सुमारे २४.३ कोटी तरुण भारतात आहेत, अशी माहिती आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनी आज दिली. ‘द स्टेट ऑङ्ग द वर्ल्ड चिल्ड्रेन रिपोर्ट’ हा युनिसेङ्गचा कार्यक्रम आज राजभवनात जाहीर करताना पटनायक म्हणाले की, संपूर्ण जगात १.२ अब्ज तरुण आहेत. यातील २० टक्के वाटा भारताचा आहे.
उद्या केंद्रीय अर्थसंकल्प
नवी दिल्ली, द. २६ : महागाईने गाठलेले शिखर, देशाची विद्यमान आर्थिक स्थिती आणि काही राज्यांमध्ये याचवर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुका या पार्श्‍वभूमीवर सोमवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राजकीय समीकरणे डोळ्यांपुढे ठेवून काही निवडक घटकांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये होण्याचीच जास्त शक्यता आहे.
सहा नक्षलवादी चकमकीत ठार
बांका (बिहार), दि. २६ : बिहारच्या बांका जिल्ह्यातील काटोरिया या गावात आज पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांनी एका चकमकीत सहा नक्षलवाद्यांना ठार केले असून, काही नक्षलवादी जखमी झाले; तर काहींनी पळ काढला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या चकमकीत सुरक्षा दलाचा एकही जवान जखमी झाला नाही.
सोनियांनी भूमिका स्पष्ट करावी : उमाभारती
भोपाळ, २६ ङ्गेबु्रवारी : योगगुरू बाबा रामदेव यांच्याबाबत कॉंगे्रसमधील काही नेत्यांनी जी वादग्रस्त विधाने केली आहेत, ती कॉंगे्रस पक्षाला मान्य आहेत काय, याबाबत कॉंगे्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्वरित स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आज येथे केली.
जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद
जम्मू , दि. २६ : प्रचंड बर्ङ्गवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून, यामुळे काश्मीर खोर्‍याचा उर्वरित देशासोबतचा संपर्क तुटलेला आहे. काल रात्रीपासूनच काश्मीर खोर्‍यातील विविध भागांत जोरदार बर्ङ्गवृष्टी आणि मुसळधार पाऊस पडत आहे. अवघ्या एकाच आठवड्यात हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची ही दुसरी वेळ आहे.

‘कॅसिनो’ कीड ठेचणे काळाची गरज : प्रा. वेलिंगकर

पणजी, दि. २६ (सांस्कृतिक प्रतिनिधी): समाजात आज अनैतिक गोष्टी प्रतिष्ठेच्या होत चालल्या आहेत. त्यामुळे समाज चुकीच्या पथावर मार्गक्रमण करीत असून भविष्याच्या दृष्टिकोनातून ते विघातक आहे, असे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.
कॅसिनो आज वविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थी मंडळाचे विविध कार्यक्रम पुरस्कृत करून तो आपली पाळेमुळे घट्ट रोवू पाहत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणून २३ व २४ फेबु्रवारी रोजी कला अकादमीत रॉयल कॅसिनो पुरस्कृत ‘तत्त्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे पाहावे लागेल. यासंदर्भात बोलताना प्रा. वेलिंगकर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते.
समाजात वाईट गोष्टींबरोबर चांगल्या गोष्टीही आहेत. परंतु वाईट गोष्टींचा उदोउदो जास्त होत असल्याने चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाहीत. देशातील नागरिकांच्या मनातील देशप्रेमाची भावना कमी व्हावी म्हणून ‘फुंदासांव ओरिएंट’ सारखी संस्था भरमसाठ पैसा खर्च करून येथील कलाकारांना, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या निमित्ताने पोर्तुगालला पाठवत आहे. तेथून हे लोक परत आल्यावर त्यांची एक नवीन पिढी तयार होते. हीच पद्धत कॅसिनोवाल्यांनी अवलंबली आहे. भावी पिढीसाठी हे घातक ठरणार आहे. त्यामुळे आत्ताच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. केवळ शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनीच नव्हे तर समाजातील सर्व लोकांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. आज कॅसिनोने राजकीय लोकांच्या आधाराने टिकाव धरला असला तरी समाजाला लागलेली ही मोठी कीड आहे. वाईट मार्गाचा पैसा शिक्षण क्षेत्रात येता कामा नये यासाठी समाजानेच दक्ष असणे गरजेचे आहे. चारित्र्यसंपन्न मार्गदर्शकांच्या अभावामुळे आज सारासार विचार करणे लोप पावत चालले आहे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले.
गोव्यात कॅसिनोंचे आक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात आधार निर्माण करण्यापर्यंत मजल मारली आहे. ही खरोखरच चिंतेची बाब आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही पालकही त्यास पाठिंबा देत आहेत. त्यावर कहर म्हणजे काही दिवसांपूर्वीच पणजी विद्यालयातील एका ७ वीच्या विद्यार्थ्याचा वाढदिवस त्याच्या पालकांनी कॅसिनो बोटीवर साजरा केला. कॅसिनो आज अनेक माध्यमांतून आपल्या घरापर्यंत पोचला आहे. उद्या आपलीच मुले त्यामध्ये गुंतणार नाहीत कशावरून, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. याबाबत अनेक मान्यवरांनी दै. ‘गोवादूत’शी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
प्रा. राधिका नायक
धेंपे महाविद्यालयाच्या प्राचार्य राधिका नायक म्हणाल्या, कॅसिनो, दारू या समाजाला पोखरू पाहणार्‍या गोष्टींचं कुठल्याही कार्यक्रमासाठी सहकार्य घेऊन त्यांची जाहिरात करणे समाजहिताचे नाही. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यापासून चार हात दूरच राहणे योग्य. आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचा ‘आधार’ आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर शिक्षकांचेही निरीक्षण असले पाहिजे.
सॅबिना मार्टिन्स
‘बायलांचो एकवोट’च्या अध्यक्ष सॅबिना मार्टिन्स म्हणाल्या, कॅसिनोंविरोधात आम्ही अनेकवेळा आवाज उठवला परंतु सरकारला जाग आली नाही. आता तर ही कीड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कॅसिनोविरोधात पेटून उठणे काळाची गरज बनली आहे. येत्या ८ मार्च रोजी महिला दिनादिवशी एक सभा घेऊन दारू आणि कॅसिनोंविरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

Saturday, 26 February 2011

‘सीबीआय’ चौकशीचा पर्दाफाश करणार


पर्रीकरांचा कॉंग्रेसला इशारा

‘इफ्फी-०४’ चे व्यवहार पारदर्शकच


पणजी, दि.२५ (प्रतिनिधी)
आपल्या विरोधातील ‘सीबीआय’ तक्रार कॉंग्रेस पक्षाच्या तत्कालीन प्रभारी मार्गारेट आल्वा व इतर काही नेत्यांनी रचलेले षड्यंत्रच होते. या षड्यंत्रात महालेखापाल कार्यालय व ‘सीबीआय’ चा गैरवापर करण्यात आला. यासंबंधीचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्याचा योग्य वेळी पर्दाफाश केला जाईल, असा खुलासा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केला. ‘इफ्फी-०४’ च्या पूर्ण व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यात आली होती व त्यामुळे या प्रकरणात आपण निर्दोष सुटणार याची पूर्वीच खात्री होती, असेही ते म्हणाले. आता आपण ‘आयनॉक्स’ सिनेमागृहात जाण्यास मोकळे झालो, असे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
राज्यसभेत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी एका प्रश्‍नावर दिलेल्या उत्तरात पर्रीकर यांच्याविरोधातील ‘सीबीआय’ चौकशीत काहीही आढळून आले नसल्याने ही चौकशी बंद करण्याची शिफारस केल्याचा खुलासा केला होता. ‘सीबीआय’ कडून ‘क्लीनचीट’ मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी ही माहिती दिली. मुळातच ज्या महालेखापालांच्या अहवालाचा आधार घेऊन आपल्याविरोधात ‘सीबीआय’ चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला त्या अहवालात कुणाचेच नाव घेण्यात आले नव्हते. सुरुवातीला खुद्द तत्कालीन माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ‘इफ्फी-०४’ च्या व्यवहारांची चौकशी करण्याची शिफारस ‘सीबीआय’कडे केली होती. ‘सीबीआय’ ने केलेल्या प्राथमिक चौकशीत काहीही आढळून आले नाही. या प्रकरणी ‘सीबीआय’कडून आपल्याला क्लीनचीट मिळाल्यास कॉंग्रेसची नाचक्की होणार यामुळे तत्कालीन कॉंग्रेसच्या प्रभारी मार्गारेट आल्वा यांनी काही स्थानिक नेत्यांना हाताशी धरून नव्याने ‘सीबीआय’ चौकशीचे षड्यंत्र रचले. माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो यांनी यासंबंधी महालेखापालांच्या अहवालाच्या आधारावर आपल्याविरोधात पणजी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली व या तक्रारीवर ‘एफआयआर’ दाखल झाल्यानंतर तो ‘सीबीआय’ कडे पाठवण्यात आला. या कटात महालेखापाल व ‘सीबीआय’ यंत्रणेचाही गैरवापर झाला. यासंबंधी माहिती हक्क कायद्यानुसार माहिती देण्यास ‘सीबीआय’कडून नकार देण्यात आल्याने त्याला केंद्रीय माहिती आयोगाकडे दाद मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

‘आयनॉक्स’ ची मालकी सरकारकडेच
एकूणच ‘इफ्फी-०४’ च्या पायाभूत सुविधांवर करण्यात आलेल्या खर्चाचे खोटे आकडे नाचवून काही नेते जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्याकडून सरकारी जमीन विकल्याचा जो आरोप झाला त्याचा खरपूस समाचार घेताना इथे कोणतीही जमीन विकली नसल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. ‘आयनॉक्स’ हे सरकारी मालकीचे सिनेमागृह आहे व त्याची मालकी माहिती व प्रसिद्धी खात्याकडे आहे. सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा हा एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे राज्य सरकारला ३१ लाख रुपये भाडे व वर्षाकाठी ३० ते ४० लाख रुपये मनोरंजन कर प्राप्त होतो, अशी माहितीही त्यांनी दिली. उर्वरित पायाभूत सुविधांवर सगळाच खर्च सुमारे ८० कोटी रुपयांच्या आसपास झाला. आयनॉक्स सिनेमागृहाला आता सहा वर्षे झाली व या सिनेमागृह इमारतीचा दर्जा कायम आहे. ही सर्व कामे दर्जात्मकच होती. अलीकडेच सरकारने उभारलेल्या मॅकनिज पॅलेसची परिस्थिती काय बनली आहे त्यावरून आपल्या व विद्यमान सरकारच्या कामांचा दर्जा पडताळून पाहा, असे आवाहनही त्यांनी केले. कला अकादमीवर झालेल्या खर्चाचा विनाकारण बाऊ केला जातो. कला अकादमीवर झालेल्या २१ कोटी रुपये खर्चात १७ कोटी रुपये खर्चून संपूर्ण यंत्रणाच बदलण्यात आली होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

‘आयनॉक्स’ सिनेमागृहात जाण्यास मोकळे
जोपर्यंत ‘सीबीआय’ चौकशीतून निर्दोष मुक्त होत नाही तोपर्यंत आयनॉक्स सिनेमागृहात जाणार नाही, असा निर्धार आपण केला होता. फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी एकदाच आपण तिथे गेलो होतो. आता आयनॉक्स सिनेमागृहात जाण्यास आपण मोकळा झालो आहे. एखादा चांगला चित्रपट प्रदर्शित झाला तर अवश्य जाईन असेही त्यांनी घोषित केले.

एकूण ९२ उमेदवार रिंगणात

पणजी महापालिका निवडणूक

९ दुरंगी, १३ तिरंगी, ६ चौरंगी, १ पंचरंगी व १ सहारंगी लढती

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी येत्या १३ मार्च २०११ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी एकूण ९२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५२ उमेदवारांपैकी ६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. एकूण ३० प्रभागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत ९ प्रभागांत दुरंगी, १३ प्रभागांत तिरंगी, ६ प्रभागांत चौरंगी, १ पंचरंगी व एका प्रभागात सहा उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अखेरच्या चित्राअंती ही लढत बाबूशसमर्थक पॅनल पणजी विकास आघाडी, भाजप समर्थक पणजी फर्स्ट आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांतच होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी एकच रांग लागली होती. त्यात तब्बल ६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने प्रभागांचे चित्र स्पष्टच झाले.दरम्यान, जादा उमेदवार रिंगणात उतरल्यास मतांचे विभाजन होण्याची शक्यता होती. कोणत्याही पद्धतीत पणजी महापालिकेत यंदा चांगले उमेदवार निवडून यावेत अशी इच्छा बहुतांश इच्छुकांनी व्यक्त करून आपले अर्ज मागे घेतल्याचे दिसून आले. पणजी मतदारसंघावर आपली पकड मिळवण्यासाठी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेचीच बनवली आहे. पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मात्र पणजीतील मतदार सूज्ञ आहेत, तेव्हा महापालिका निवडणूकीद्वारे या सुंदर शहराचे भवितव्य ते योग्य पद्धतीने ठरवणार आहेत, असा विश्‍वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे समर्थन लाभलेल्या उमेदवारांनी मात्र बाबूश पॅनलसमोर जोरदार आव्हान उभे करून त्यांना दणका देण्याचीच व्यूहरचना आखल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या अंतिम प्रभागांतील उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.
दुरंगी लढत
प्रभाग-४ः प्रभाकर डोंगरीकर व कॅरोलिना पो, प्रभाग-५ः शीतल नाईक व शुभदा शिरगावकर, प्रभाग-७ः मारिया आल्मेदा व श्‍वेता लोटलीकर, प्रभाग-१२ः प्रसाद आमोणकर व वैदही नाईक, प्रभाग-१५ः शेखर डेगवेकर व मंगलदास नाईक, प्रभाग-२२ः हेमा चोपडेकर व माया तळकर, प्रभाग-२५ः शुभदा धोंड व नमिता नार्वेकर, प्रभाग-२७ः शुभम चोडणकर व सुरज कांदोळकर, प्रभाग-२८ः निवेदिता नाईक चोपडेकर व सुजाता हळदणकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
तिरंगी लढत
प्रभाग-१ः लोबो डिसोझा, नॅटी पो व किरण जांबावलीकर, प्रभाग-६ः आलेक्स फेलिझादो, बेंटो सिल्वेस्टर व अनंत शेणई गायतोंडे, प्रभाग-८ः तुकाराम चिनावर, दुर्गा केळुस्कर व टोनी रॉड्रिगीस, प्रभाग-९ः सुरेंद्र फुर्तादो, सुदिन कामत व डॉम्नीक रॉड्रिगीस, प्रभाग-१०ः रूथ फुर्तादो, माया जोशी व तोशा खुराडे, प्रभाग-११ः मनोज पाटील, मखिजा पिंटो व ऍश्‍ली रोझारीयो, प्रभाग-१३ः भारती हेबळे, मंगला कारापुरकर व सिमा पेडणेकर, प्रभाग-१९ः अशोक नाईक, यतीन पारेख व प्रसाद सुर्लेकर, प्रभाग-१६ः पास्कॉला मास्कारेन्हास, सतिशा शिरोडकर व निना सिलीमखान, प्रभाग-१७ः नीलेश खांडेपारकर, उदय मडकईकर व प्रजोत वायंगणकर, प्रभाग-२१ः महेश चांदेकर, गंगाराम काळे, केदार शिरगांवकर, प्रभाग-२३ः रूद्रेश चोडणकर, शैलेश उगाडेकर व सत्चीत वायंगणकर, प्रभाग-२९ः वनिता फर्नांडिस, प्रतिमा होबळे व याधव नाईक यांच्यात लढत होणार आहे.
चौरंगी लढत
प्रभाग-३ः सॅबेस्तीयानो बर्रोटो, मार्गारिटा कोएलो, रोझारीया पो, ग्लोरीया पो, प्रभाग-१९ः डियोदिता डीक्रुझ, नीता गायतोंडे, विरा नूनीस, मारिया पॅरेरा, प्रभाग-२०ः अविनाश भोसले, सुरज कांदे, विरेन महाले व कृष्णा शिरोडकर, प्रभाग-२४ः जितेंद्र केणी, दिक्षा माईणकर, मोहनलाल सरमळकर व मंदा शेटये, प्रभाग-२६ः ऑस्कर कुन्हा, रूई फेरेरा, एडवर्ड डेनीस व प्रेमानंद नाईक, प्रभाग-३०ः रूपेश हळर्णकर, श्यामसुंदर कामत, विविना नास्नोडकर व आयरिश रॉड्रिगीस यांच्यात लढत होईल.
पंचरंगी लढत
प्रभाग-१४ः समीर च्यारी, रत्नाकर फातर्पेकर, लक्ष्मण खराडे, रविश खराडे व सीताराम नाईक हे भिडणार आहेत. सहारंगी लढत
एकमेव प्रभाग-२ः नाझारेथ काब्राल, नेल्सन काब्राल, इव्हारीस्टो फर्नांडिस, रवींद्र कुर्टीकर, राजू मार्टीन्स व महेश शिरोडकर हे सहा उमेदवार रिंगणात आहेत.

अपना घरमधून दोन मुलांचे पलायन

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
अपना घर येथून दोन मुलांनी आज पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकट्याला पकडण्यात येथील कर्मचार्‍यांनी यश मिळवले तर दुसरा पळ काढण्यात यशस्वी ठरला. पकडण्यात आलेल्या मुलाला रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.
मडगाव येथे एका घरफोडी प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोन मुलांनी आज अपना घरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात एकटा निसटला तर त्याचा दुसरा साथीदार मात्र पळून जाण्यास अपयशी ठरला. त्याला वेळीच येथील कर्मचार्‍यांनी पकडण्यात यश मिळवले. अपना घर मधून पळून जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी वाढले होते. अलीकडे हे प्रमाण कमी झाले असतानाच आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा या प्रकाराला उजाळा मिळाला आहे. पकडण्यात आलेल्या मुलाला उद्या रिमांडसाठी हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सावरकर साहित्य संमेलन आज

कुंकळ्ळीकरीणीच्या सान्निध्यात सुरू
मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व गोव्याचे कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा मंडळ केपे आयोजित सावरकर साहित्य संमेलन उद्यापासून सुरू होत आहे. सदर संमेलन २४ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या दशकपूर्ती वर्धापनदिनानिमित्त फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण साहित्य नगरीतील खंडराय सभागृहात सुरू होत आहे.
सकाळी ९-३० वा. ग्रंथदिंडी निघेल व १०-३० वा. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते संमेलनाचे होईल. संमेलनाचे अध्यक्ष तथा मुंबईतील सव्यसाची पत्रकार अरविंद कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती राहील. नंतर मुंबईतील खासदार तथा पत्रकार भरतकुमार राऊत यांचे हिंदू राष्ट्रवाद व अल्पसंख्याकांची मानसिकता या विषयावर व्याख्यान होईल.
दुपारच्या सत्रांत डॉ. अशोक मणगुतकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. दिलीप बेतकीकर यांचे ‘सावरकरांचा राष्ट्रवाद व गोमंतकीय ’या विषयावर तर नंतर ‘गोमंतकांतील मराठीची सद्यःस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर प्रा. अनिल सामंत यांची व्याख्याने होतील.
सायंकाळी ४ वा. लोकनृत्यस्पर्धा व नंतर ७ वा. सावरकर विषयक गीतांचा कार्यक्रम बिंदिया वस्तू व सहकारी सादर करतील.
रविवारी २७ रोजी सकाळी ९-३० वा. विद्यार्थ्यासाठी प्राथमिक गटात वेशभूषा तर माध्यमिक गटात देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा घेतल्या जातील. ११-३० वा. शंकर दत्तात्रेय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश प्रभुणे यांचे ‘सामाजिक समरसता व सावरकर’ या विषयावर तर नंतर प्रभाकर अनंत संत यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश दाबके हे ‘सावरकर विचारांपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्याने होतील.
दुपारी २-३० वा. मुंबईतील हौशी महिला कलाकार मंचातर्फे ‘अग्निकुंड’ हा सावरकरांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रम तर ४ वा. ‘झिंजिर झिंजिर सांज’ हे विष्णू सूर्या वाघ यांचे कविता सादरीकरण होईल.
त्यानंतर सायंकाळी ५ वा. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा होईल. संमेलनाच्या जागृतीसाठी बुधवारी संपूर्ण केपे तालुक्यात काढलेल्या जागृती यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्‍या शिक्षकांना शिक्षण खात्याने खास परवानगी देताना त्या दिवसातील त्यांची शाळांतील अनुपस्थिती ही कामावरील हजेरी मानावी असे परिपत्रक जारी केल्यामुळे बरेच शिक्षक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

चिखली अपघातात तीन गंभीर जखमी


स्थानिकांकडून टँकरची नासधूस

वास्को, दि. २५(प्रतिनिधी)
आज (दि.२५) रात्री उशिरा चिखली येथे टँकर व दोन मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जोडपे व एक युवक गंभीररित्या जखमी झाले. वाडे येथे राहणारा नरेंद्र सिंग (४८) व त्यांची पत्नी इंदू (४२) घरी परतत असताना टँकरने त्यांना मागून धडक दिली. त्यानंतर समोरून येणार्‍या मडगाव येथील जोझेफ कॉस्ता (२३) याच्या दुचाकीला जबर धडक दिली. सदर अपघातानंतर येथे असलेल्या संतप्त जमावाने टँकर चालकाची धुलाई करून टँकरची नासधूस केली.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्री ८.३० च्या सुमारास सदर अपघात घडला. नरेंद्र सिंग व त्यांची पत्नी ही दोघेही ‘स्प्लेंडर दुचाकीने (जीए ०८ एल १८७०) घरी येत असताना चिखली जंक्शनच्या पूर्वी असलेल्या रस्त्यावर ते पोहोचले असता मागून येणार्‍या टँकरने (जीए ०१ झेड २७१५) त्यांना जबर धडक दिली. त्यामुळे उभयता रस्त्यावर कोसळली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. सिंग यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर पुढच्या बाजूने येणार्‍या जोझेफ कॉस्ता यांच्या ‘एफ. झी’ दुचाकीला (जीए ०६ सी ४१२८) सदर टँकरने जबर धडक दिली. सदर भीषण अपघातात एक जोडपे व जोझेफ हा युवक गंभीर जखमी झाली. हे वृत्त कळताच स्थानिकांनी तिघांनाही त्वरित चिखलीच्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर स्थानिकांनी प्रथम टँकरची नासधूस केली. त्यानंतर टँकरचालक अनिल कुमार सिंग याचीही धुलाई केली.
वास्को पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यांनी नंतर टँकर चालकाला ताब्यात घेतले. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार तिघा जखमींची प्रकृती गंभीर आहेत. वास्को पोलिस सदर अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.

ममतांचे ‘बंगाल’मयरेल्वेअंदाजपत्रक

• ऑनलाईन एसी तिकीट बुकिंग २० ऐवजी १० रुपयांत
• ५६ नवीन एक्सप्रेसतर १३ नवीन पॅसेंजर गाड्या
• गोव्यासाठी नवीन दोन रेल्वे

नवी दिल्ली, दि. २५
मागील दोन रेल्वे अंदाजपत्रकांप्रमाणेच यंदाही रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रवासी वा मालवाहतूक भाड्यात दरवाढ केली नाही. मात्र, दरवाढ न करण्याच्या मखमली शालजोडीखाली त्यांनी उर्वरित देशाच्या तोंडाला पाने पुसत पश्‍चिम बंगालच्या पारड्यात मात्र भरभरून गाड्या आणि प्रकल्पांचे दान टाकले. मात्र गोव्यासाठी वास्को - वालंकनी आणि पोरबंदर - कोझिकोड या दोन नवीन रेल्वे वगळता तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील ठाकुर्ली येथे एका वीजप्रकल्पाची योजना त्यांनी दिली. पण, प्रत्यक्षात मागील अंदाजपत्रकातील आश्‍वासने पूर्ण न करता पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी तोट्यातील रेल्वेचे ‘बंगाल’मय अंदाजपत्रक आज लोकसभेत सादर केले.
दरवर्षीप्रमाणे यंदा मात्र विरोधी पक्षांनी अन्य राज्यांशी होत असलेला हा पक्षपात सहन केला नाही आणि ममतांच्या या ‘विशेष बंगाल प्रेमा’वर तीव्र आक्षेप घेत काहीवेळासाठी अंदाजपत्रकाचे भाषण त्यांनी बंद पाडले. संपुआ सरकारमधील रेल्वेमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचे हे तिसरे अंदाजपत्रक होते. आज सकाळी अंदाजपत्रकाच्या शबनम बॅगसह त्या लोकसभेत दाखल झाल्या तेव्हा यावर्षी तोट्यातील रेल्वेचा उद्धार त्या कसा करतात, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते.
पश्‍चिम बंगालला एरवीही झुकते माप देणार्‍या दीदींनी तेथील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन यंदाचे अंदाजपत्रक तयार केल्याचे स्पष्ट दिसून आले. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी पश्‍चिम बंगालबाबत अनेक नव्या योजनांची घोषणा केली. पश्‍चिम बंगालच्या सिंगूरनजीक मेट्रो कोच ङ्गक्टरी उभारली जाणार आहे. राज्यातील उलूबेरिया येथे ट्रॅक मशीन उद्योगाची स्थापना केली जाणार असून, दार्जिलिंगमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्टचे काम सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील ठाकुर्ली येथे ७०० मेगावॅट गॅसआधारित वीजप्रकल्पाची स्थापना केली जाणार असल्याचीही घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.
यंदा सामान्यांवर कोणताही बोजा टाकणार नाही, असे ममतांनी यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार त्यांनी २०११-१२ या वर्षासाठी कोणतीही ठोस तिकीट दरवाढ सुचविलेली नाही. यापुढे रेल्वेच्या सर्व योजना पंतप्रधान रेल्वे विकास योजनेंतर्गत संचालित होणार आहेत. विशेष म्हणजे, रेल्वेमध्ये अडचणी न आणणार्‍या राज्यांना अतिरिक्त दोन रेल्वे योजना आणि दोन रेल्वेगाड्या दिल्या जाणार असल्याचीही आगळी-वेगळी घोषणा ममतादीदींनी केली.
५६ नव्या एक्सप्रेस गाड्यांसह ९ दूरान्तो आणि ३ शताब्दी एक्सप्रेसचीही घोषणा यंदाच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. याशिवाय तिकीट दरातील सवलतीसाठीची वयोमर्यादा महिलांसाठी दोन वर्षांनी कमी करण्यात आली आहे. आता ५८ वर्षांच्या महिलांनाही तिकीटदरात ज्येष्ठ नागरिकांसाठीची सूट मिळू शकणार आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात देण्यात येणारी सूट ३० टक्क्यांहून ४० टक्के करण्यात आली आहे. यापुढे कीर्ती आणि शौर्यचक्रविजेते तसेच अपंगांना राजधानी आणि शताब्दीतही सवलत मिळू शकणार आहे. एवढेच नव्हे तर अशोकचक्र आणि परमवीरचक्र विजेत्या अविवाहित शहिदांच्या माता-पित्यांना प्रवासासाठी विशेष पास दिला जाणार आहे. लष्करातील सुमारे १६ हजार माजी सैनिकांना मार्चपासून रेल्वेत सामावून घेण्याचीही घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली.

गोव्याला वाटाण्याच्या अक्षता ः आर्लेकर
वास्को, (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वषार्ंपासून वास्कोतील बहुतेक नागरिकांची वास्को मिरज मार्गावर तीन ते चार रेल्वे सुरू करण्याची मागणी आहे, मात्र यंदाही ती पूर्ण झाली नाही. वास्को रेल्वे स्थानकावरून आठवड्यात फक्त एकदा वालंकनीसाठी (केरळ) रेल्वे सुरू करून केंद्र सरकारने स्थानिक जनतेच्या मागणीला वाटाण्याची अक्षता लावल्याची टीका भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने ह्या वर्षाचा अर्थसंकल्पात जाहीर केल्यानंतर वास्कोवासीयांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाने मागे ठेवल्याची प्रतिक्रिया श्री. आर्लेकर यांनी दिली. मिरज रेल्वेच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले असा सवाल श्री. आर्लेकर यांनी केला आहे. रेल्वे मार्ग रुंदीकरणापूर्वी (ब्रॉडगेज) वास्को रेल्वे स्थानकावरुन मीरजच्या बाजूने दिवसाला तीन ते चार रेल्वे जात होत्या मात्र आता वास्कोतून दिवसाला एकच (गोवा एक्सप्रेस) रेल्वे मिरजच्या बाजूने जात असल्याने येथील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे श्री. आर्लेकर यांनी सांगितले. वास्कोतील जनतेची मागणी ओळखून वास्को मिरज रेल्वे सुरू करावी अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली आहे.


गोमंतकीयांची नवीन
रेल्वेमुळे सोय ः मुख्यमंत्री
पणजी, दि. २५
वास्को रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवून ते आदर्श केले जाईल असे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. वास्को ते वालंकणी साप्ताहिक रेल्वेमुळे तसेच पोरबंदर ते कोझिकोडे या दोन रेल्वेंमुळे गोमंतकीयांची मोठी सोय झाली आहे असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. प्रवासी आणि भाडे यात वाढ न करता महसुलात वृद्धीच्या रेल्वेमंत्र्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी यामुळे उतारुंना दिलासा मिळेल असे म्हटले आहे.

‘अर्थसंकल्प गोव्यासाठी निराशाजनक’
आज (दि.२५) केंद्राने जाहीर केलेल्या केल्वे अर्थसंकल्प हा गोव्यासाठी अतिशय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया मडगाव सीनियर सिटीझनचे तुळशीदास मळकर्णेकर यांनी व्यक्त केली आहे.
श्री. मळकर्णेकर यांनी या अर्थसंकल्पाबाबत बोलताना पुढे सांगितले की, बंगालमध्ये येत्या काळात होणारी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र याचवेळी त्यांनी कोणत्याही प्रकारे तिकीटदरवाढ न केल्याने सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तींसाठी तिकीटांमध्ये ४० टक्के तर ५८ वर्षांच्या महिलांनाही आता प्रवासात सवलत केली आहेत. त्याबाबत श्री. मळकर्णेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकांच्या जिवाशी खेळ नको


‘पीएसी’ बैठकीत अधिकार्‍यांना खडसावले

खनिज वाहतूकीविरोधातील कारवाईवर
नजर ठेवण्यासाठी उपसमिती स्थापन


पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
राज्यातील बेकायदा खाणींमुळे खनिज वाहतुकीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सांगे, कुडचडे, सावर्डे आदी भागांत स्थानिक लोकांचे जगणेच हैराण बनले आहे. या परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे बनले आहे. लोकांच्या जिवाशी खेळ मांडू नका, अन्यथा त्याचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देत लोकलेखा समितीने खाण, वाहतूक, पोलिस व जिल्हाधिकारी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले आहे.
आज लोकलेखा समितीची (पीएसी) बैठक विधानसभा संकुलात झाली. या बैठकीला खाण, वाहतूक, पोलिस खात्याचे अधिकारी तसेच दोन्ही जिल्हाधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी विविध भागात बेफाम खनिज वाहतुकीविरोधात जनतेच्या उठावाचा विषय चर्चेस घेण्यात आला. खनिज वाहतुकीचा ताण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की येथील स्थानिक लोकांना श्‍वास घेणेही कठीण बनले आहे. रस्त्याची रुंदी व त्यात ट्रकांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक बनले आहे. खाण तथा वाहतूक कायद्यात अनेक तरतुदी असून त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून या परिस्थितीवर काबू ठेवणे गरजेचे आहे व त्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पोलिसांची मदत घेता येईल, अशी सूचना समितीकडून करण्यात आली. २००३-०५ या काळातील महालेखापाल अहवालात सुमारे एक कोटी टन खनिजावरील रॉयल्टीचा हिशेब मिळाला नसल्याची नोंद झाली होती व त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुळातच खाण खात्याला कायदेशीर खाणींवर नियमन घालणे शक्य झालेले नाही व त्यामुळेच बेकायदा खाणींचा उद्रेक सुरू आहे. राज्यातील कायदेशीर खाणींची ओळख पटवल्यानंतरच बेकायदा खाणी आपोआपच उघड होतील, असा सल्लाही समितीचे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी दिला. खाण कायद्यात आवश्यक तरतुदी असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याची गरज आहे. बहुतांश ट्रक चालकांकडे वाहन चालक परवाना नसल्याचे आढळून आले आहे. विविध खाण प्रभावित भागांत हे ट्रक यमदूत बनूनच धावतात व त्यामुळे पहिल्यांदा विनापरवाना चालकांवर कारवाई होण्याची गरज आहे. काही ठिकाणी दिवसाकाठी १५ हजार ट्रक धावतात, असे आढळून आले आहे. दरम्यान, सुरुवातीला काही निवडक भागांत खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची पद्धत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सांगे, रेवण, किर्लपाल आदी भागांचा समावेश आहे. यासंबंधी सुरू होणार्‍या कार्यपद्धतीवर नजर ठेवण्यासाठी फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती नेमण्याचाही निर्णय झाला आहे. खनिज वाहतुकीचा हा विषय हाताळण्यासाठी विशेष पोलिस उपअधीक्षकांची नेमणूक करण्याचीही शिफारस समितीने केली आहे.