रमेश तवडकर कडाडले
पूरग्रस्त निधी गैरव्यवहाराच्या
सखोल चौकशीची मागणी
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- काणकोणवासीय अजूनही महापुराच्या संकटातून सावरलेले नसताना युवक कॉंग्रेसकडून काणकोणवासीयांच्या नावाने मदतनिधी गोळा करून त्याचा अपव्यय करण्याची कृती म्हणजे माणुसकीला कलंक लावण्याचा प्रकार आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी समाजातील माणुसकी हीच या आपद्ग्रस्तांसाठी खरा आधार असतो, परंतु युवक कॉंग्रेसची कृती काणकोणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार ठरला आहे. या वृत्तामुळे या लोकांचे नीतिधैर्यच खचले असून अशा गैरव्यवहाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी पैंगीणचे आमदार तवडकर यांनी केली आहे.
काणकोणात महापुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत प्रचंड आत्मबळाच्या साह्याने येथील लोक पुन्हा एकदा आपले संसार उभे करण्यासाठी धडपडत आहेत. राज्य सरकारने मदतीच्या नावाखाली तुटपुंज्या रकमेचे धनादेश लोकांच्या हातात टेकवून आपली जबाबदारी झटकली आहे. या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ४८ कोटी रुपयांचा असताना आत्तापर्यंत केवळ एक कोटी रुपये खर्च केल्याचे जे मुख्यमंत्री सांगतात, त्यावरून ते आपलीच निष्क्रियता उघड करीत असल्याचेही आमदार तवडकर म्हणाले. काणकोणवासीयांच्या मदतीसाठी समाजातील विविध लोकांनी आपले हात पुढे केले व वेगवेगळ्या माध्यमातून आपली मदत या लोकांपर्यंत पोचवली. यामुळे अनेकांची घरे सध्या उभी राहत आहेत. अशा परिस्थितीत युवक कॉंग्रेसकडून काणकोण पुराची संधी साधून या लोकांना मदत करण्याचे निमित्त करून निधी गोळा करण्यात आला. या निधीचा वापर न करता तो खात्यातही जमा झाला नसल्याचे त्यांच्याच सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उघडकीस आणले आहे. हा प्रकार समाजासाठी घातकच ठरला असून अशामुळे काही प्रमाणात बाकी असलेली माणुसकीही लोप पावण्याचा धोका असल्याचेही आमदार तवडकर म्हणाले. यापुढे असा प्रसंग कुणावरही ओढवला तर लोक कोणत्या विश्वासाने मदत करण्यास पुढे सरसावतील? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कॉंग्रेसकडून जमवण्यात आलेला निधी हा काणकोणवासीयांसाठी नव्हेच, असे सांगून कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधण्याचाच प्रकार केला आहे. लोकांकडून जमवलेला हा निधी काणकोणवासीयांसाठी नव्हे तर तो काणकोणात पूर आल्यानंतरच का जमवला? त्यासाठी कॉंग्रेसला दुसरा मुहूर्त सापडत नव्हता काय? असे प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. काणकोणवासीयांच्या नावाने अशा पद्धतीने कुणी गैरव्यवहार करीत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. राज्य सरकारने ताबडतोब या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी व सत्य काय ते जनतेसमोर आणावे. लोकांच्या भावनांची अशा पद्धतीने थट्टा करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. काणकोणवासीयांच्या नावाने पैसा गोळा करून या पैशांची चैन करण्याचा प्रकार खरोखरच घडला असेल तर या गैरव्यवहाराला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. मुख्यमंत्री कामत यांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावावा अन्यथा काणकोणवासीयांना निदान आपला स्वाभिमान दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडेल, असा खणखणीत इशाराही आमदार तवडकर यांनी दिला.
Saturday, 18 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment