Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 14 September 2010

प्रदेश कॉंग्रेसचा ठराव ठरणार राहुल गांधींनाच चपराक!

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी कॉंग्रेस समित्यांची निवड लोकशाही पद्धतीनेच व्हावी, असा आग्रह एका बाजूला धरत असतानाच, गोवा प्रदेशचे अध्यक्ष कोण याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घ्यावा, असा ठराव प्रदेश कॉंग्रेस घेणार असल्याने राहुल गांधी यांच्या संघटनात्मक सुधारणांना चपराकच मिळाल्याचे दिसत आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पदासाठी पक्षांतर्गत बरीच चुरस निर्माण झाल्याने प्रदेश कॉंग्रेस समितीने प्रदेशाध्यक्षपदाची निवड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनीच करावी, असा एकमुखी ठराव संमत करण्याचा अलीकडेच घेतलेला निर्णय नव्या वादाला तोंड फोडणाराच ठरला आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनाच प्रदेशाध्यक्षपदी ठेवण्यासाठी पक्षाचा एक गट सध्या बराच सक्रिय बनला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही शिरोडकर यांच्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीत आपला शब्द घातल्याची माहिती प्राप्त झाल्याने शिरोडकर विरोध गटानेही प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्याचा चंगच बांधला आहे. पक्षातील हा गट प्रदेशाध्यक्षपद हे अल्पसंख्याक नेतृत्वाकडेच यायला हवे, असा हट्ट धरून शिरोडकर यांना अद्दल घडवण्यासाठी पुढे सरसावला आहे. या गटाने चालवलेल्या या प्रयत्नांमुळे शिरोडकर गटांत बरीच अस्वस्थता पसरली आहे. "धरले तर चावते व सोडले तर पळते', अशी केविलवाणी अवस्था त्यांची बनली आहे. अल्पसंख्याक नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्यास विरोध दर्शवला तर हा गट दुखावेल व त्याचा थेट परिणाम पक्षाच्या वोटबॅंकेवर पडेल, यासाठी हा वाद थेट श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडेच टोलवून सोनियांचा आदेश शिरसावंद्य मानण्याची नामुष्की शिरोडकर गटावर ओढवली आहे. दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसचा हा ठराव मात्र सध्या बराच चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी पक्षाअंतर्गत सर्व संघटनात्मक नेमणुका निवडणूक पद्धतीने होणार असल्याची घोषणा केली होती. "एनएसयुआय' या कॉंग्रेसकृत विद्यार्थी संघटनेच्या अलीकडेच निवडणुका घेण्यात आल्या व त्यात निवडणूक पद्धतीने या संघटनेच्या प्रमुखांची निवडही करण्यात आली. कॉंग्रेस पक्षात युवकांना प्रवेश करण्याचे आवाहन करून इथे कुणीही नेता बनू शकतो, असा भूलभुलैयाही त्यांच्याकडून सुरू आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाने घेतलेल्या या कथित ठरावामुळे मात्र पक्षावर गांधी घराण्याचीच हुकमत चालते व या घराण्याच्या इशाऱ्यावरच हा पक्ष चालतो, यालाच पुष्टी मिळाल्याने राही नेत्यांनी या ठरावाला आक्षेप घेत त्याबाबत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना आपल्या इच्छेला मुरड घालणे शक्य होत नसल्यानेच त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीचे अधिकार सोनिया गांधी यांना बहाल करण्याचा ठराव संमत केला,असा टोलाही पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने हाणला. सुभाष शिरोडकर यांना खरोखरच या पदाची आसक्ती नसती तर त्यांनीच खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नावाची शिफारस दिल्लीत केली असती, परंतु प्रदेशाध्यक्षपद निवडीचे अधिकारी सोनिया गांधी यांच्याकडे दिल्याचे सांगून दिल्लीत मुख्यमंत्री कामत यांना घेऊन लॉबिंग करून हे पद परत मिळवण्यासाठी ते धडपडत आहेत, अशीही टीकाही या पदाधिकाऱ्याने केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पक्षाच्या राष्ट्रीय गोटात आपले जबरदस्त वजन प्राप्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गोव्याला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कामत यांनी आपले वजन वापरले तर सार्दिन यांची नक्कीच वर्णी लागणे शक्य आहे, अशी भावना पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची बनली आहे. कामत हे जाणीवपूर्वक सार्दिन यांच्यासाठी प्रयत्न करीत नाही, अशी नाराजीही या गटात पसरल्याने त्याचा वचपा काढण्यासाठीच प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीत सुभाष शिरोडकर व मुख्यमंत्री कामत यांना खो देण्याचा कट या गटाने आखला आहे.

No comments: