Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 17 September 2010

कॅसिनोच्या निर्णयामागे 'दलाली'

विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची घणाघाती टीका
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): कॉंग्रेस आघाडी सरकारातील नेत्यांनी कॅसिनोवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात दलाली उकळली आहे व त्यामुळेच ही जुगारी जहाजे मांडवी नदीबाहेर काढण्याची नैतिकताच या सरकारने हरवली आहे, अशी घणाघाती टीका आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे पूर्णतः दिवाळखोर बनल्याचा आरोपही यावेळी पर्रीकर यांनी केला.
राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून त्यात कॅसिनो जहाजांना मांडवीतच आपला व्यवसाय करण्याची मोकळीक देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी म्हणून हे सर्व तरंगते कॅसिनो रायबंदर, बेती व पणजी येथे मांडवी नदीत वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले जाणार आहेत. मांडवी नदीतून हटवण्यासाठी सरकारने काढलेल्या आदेशाला कॅसिनोवाल्यांनी न्यायालयात आव्हान दिले. आता एक वर्ष झाले तरी न्यायालयात या प्रकरणी सरकारच्या बाजूने आदेश मिळवण्यास ऍडव्होकेट जनरल अपयशी ठरले आहेत. न्यायालयातही हे प्रकरण ज्या पद्धतीने रखडत आहे ते पाहता ऍडव्होकेट जनरलांचेही कॅसिनोवाल्यांकडे साटेलोटे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही पर्रीकर म्हणाले.
या सरकारला जनाची सोडाच स्वतःच्या मनाचीही लाज राहिलेली नाही. विधानसभेत आमदारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कॅसिनो जहाजे मांडवी नदीतून हटवण्याचे आश्वासन दिले जाते व आता मंत्रिमंडळ बैठक बोलावून ही जहाजे मांडवी नदीतच ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. या सरकारला जनतेची अजिबात कदर नाही. पूर्णतः भ्रष्ट बनलेल्या या सरकारकडून राज्याचा सत्यानाश सुरू आहे. हे सरकार नव्हे तर भस्मासुराचा अवतार आहे व त्यामुळे या भस्मासुराचा वध करण्यासाठी आता गोमंतकीयांनी पुढे सरसावणे ही काळाची गरज आहे, असेही पर्रीकर म्हणाले. आपण व आपल्या पक्षाने तरंगत्या कॅसिनोला कायम विरोध केला आहे व यापुढेही विरोध राहील. या सरकारच्या तावडीतून गोव्याला वाचवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. गोवा वाचवण्यासाठीच्या या लढ्याचे नेतृत्व भाजप करेल व गोमंतकीय जनतेने सर्व मतभेद बाजूला सारून भाजपची साथ द्यावी, असे आवाहनही पर्रीकर यांनी यावेळी केले.

No comments: