थरूर यांच्याभोवती वादाचे मोहोळ
नावच उघड झाल्यामुळे
थरूर-मोदी संघर्ष पेटला
नवी दिल्ली, दि. १३ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये नव्याने दाखल झालेल्या कोची टीमच्या मालकांची नावे आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी जाहीर केल्याने मोदी विरूद्ध परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर असा वेगळाच "सामना' रंगला आहे. त्यामुळे थरूर यांच्याभोवती वादाचे मोहोळच निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर "वादग्रस्त' थरूर यांचा राजीनामा पंतप्रधानांनी आता घ्यावाच, अशी जोरदार मागणी आज भारतीय जनता पक्षाने केली. थरूर यांनी या सर्व घटनाक्रमात मंत्रिपदाचा "गैरवापर' केला, असा असे भाजपचे म्हणणे आहे.
कोचीच्या मालकांमध्ये थरूर यांची "कश्मीर की कली' प्रेयसी सुनंदा पुष्कर हिचा समावेश असल्याची बाब यानिमित्ताने उजेडात आली आहे. कोची या नव्या टीमच्या मालकीसाठी अनेक नामांकित कंपन्या रेसमध्ये असताना "रेंदेंवूज' नावाच्या ग्रुपने कोट्यवधी रुपयांना ही टीम विकत घेतली. या टीमचे खरे मालक कोण, याबाबतची उत्सुकता ताणली गेली असतानाच, थरूर यांनी कोचीसाठी पडद्याआडून सूत्रे हलवल्याचे स्पष्ट झाले. आपण टीम मालकांपैकी एक नसल्याचे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर, आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी ट्विटरवरून पाठवलेल्या एका संदेशात कोचीच्या मालकांची नावेच जाहीर केली. त्यामध्ये एक नाव सुनंदा पुष्कर यांचे आहे. सुनंदा या पेशाने ब्युटिशियन असून, थरूर यांच्याशी त्या लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे समजते. मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की कोचीच्या संघाची खरेदी करणाऱ्या रेंदेवूज स्पोटर्स कंपनीत दुबईत वास्तव्यास असलेल्या सुनंदा पुष्कर यांचीही भागीदारी आहे. किशन शैलेंद्र, पुष्पा गायकवाड, सुनंदा पुष्कर, पूजा गुलाटी, जयंत कोटलवार, विष्णू प्रसाद आणि संदीप अग्रवाल हे रेंदेवूज स्पोटर्सच्या फ्री इक्विटी होल्डर्समध्ये आहेत. मात्र सुनंदा यांच्या फ्रेंचाइजीबाबत आपल्याला गुप्तता पाळण्यास सांगण्यात आले होते, असा दावा मोदींनी केला आहे. त्यामुळे मोदी विरुद्ध थरूर असा सामना पेटला आहे. सुनंदा यांची भागीदारी असल्याची बाब आयपीएलच्या इतिवृत्तातही नोंदविण्यात आली आहे. कोची संघात थरूर यांची भागीदारी असल्याचा दावा या संघाच्या खरेदीनंतरच माध्यमांनी केला होता. मात्र त्यावेळी थरूर यांनी अशा कुठल्याही बाबीस नकार दिला होता. कोचीच्या मालकिणबाईंची ही भानगड मोदींनी जगजाहीर केल्याने थरूर प्रचंड संतापले आहेत. दरम्यान, या प्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ललित मोदी यांनी गुप्ततेचा भंग केल्याबद्दल त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली असून मोदी यांचा सुनंदांच्या भागीदारीस कुठलाही विरोध होता तर तो त्यांनी लिलावाच्या आधीच का नोंदविला नाही असा प्रतिप्रश्न केला आहे.
थरूर यांना डच्चू द्या
दरम्यान, कोची संघाच्या मालकीवरून उठलेल्या वादळामुळे
शशी थरूर यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे केली आहे.
नेहमीच वादाचा धुरळा उडवून देण्यासाठी "प्रसिद्ध' असलेल्या थरूर यांच्या या नव्या कारनाम्यामुळे राजधानी दिल्लीत ते चर्चेचा विषय बनले आहेत. भाजपचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, थरूर यांनी मंत्रिपदाचा "गैरवापर' करून स्वतःची खास मैत्रीण सुनंदा पुष्कर यांनी कोची संघासाठी केलेली गुंतवणूक "सुरक्षित' केली आहे. वास्तविक इंडियन प्रीमियर लीगशी भाजपला कसलेही देणेघेणे नाही. आम्हाला फक्त थरूर यांच्या या कारनाम्याची "सीबीआय'मार्फत चौकशी झालेली हवी आहे. आम्ही त्यासाठीच आग्रही आहोत.
Wednesday, 14 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment