जमीनमालकाच्या हट्टापायी
खुद्द सरकारनेही टेकले हात
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील बहुतांश गावांत गटारांवर सिमेंटचा गिलावा चढला, घराघरांच्या अंगणात जाणाऱ्या पायवाटांवर चक्री टाइल्स बसवण्यात आल्या; त्याचप्रमाणे प्रत्यक्षात जनतेला काहीही उपयोग नसलेल्या अनेक कामांवरही लाखो रुपयांचा निधी उडवण्याचेही प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. मात्र या सगळ्या भूलभुलैयात पेडणे पालिका क्षेत्रातील सुर्बानवाडा या दलितवस्तीकडे मात्र कुणाचेही लक्ष गेलेले नाही की जातही नाही. या भागातील दलित बांधवांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेली विहीर अस्वच्छतेचे आगार बनली आहे व या भागातील तळीची दुरवस्था झालेली असून ती गटारसदृश्य बनलेली आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या परंतु, मुळात एका सनातनी जमीन मालकाच्या हट्टापायी या दलित बांधवांची सुरू असलेली ही प्रचंड हेळसांड "ऍडव्हान्स' गोवेकर मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत बसले आहेत.
उद्या १४ रोजी देशात सर्वत्र भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. गोव्यातही या निमित्ताने सरकारी व खाजगी पातळीवर विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या या कार्यक्रमांत दलितांच्या उद्धाराची भाषणे ठोकली जातील. दलित बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काय काय दिवे लावले याच्या गमजाही काही नेते दलित बांधवांसमोर मारतील. दलित बांधवांच्या "जय भीम' च्या घोषणेत आपलाही आवाज मिसळून आपणच दलितांचे कैवारी आहोत असाही फुकाचा आव आणण्याची धडपड अनेकजण करतील. मात्र गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना आपण आपल्याच बांधवांना साधा पिण्याच्या पाण्याचा हक्कही नाकारतोय याचे भान मात्र यांपैकी अनेकांना नसेल. उद्या आंबेडकर जयंतीनिमित्त जेव्हा विविध कार्यक्रमांतून एकीकडे दलितांच्या उद्धाराच्या वल्गना सुरू असतील तेव्हा दुसरीकडे पेडण्यातील सुर्बानवाडा येथील दलित बांधव आपली तहान भागवण्यासाठी त्या भयानक अस्वच्छ विहिरीचेच पाणी प्राशन करत असतील.
पेडणे तालुक्यातील धारगळ हा राज्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला एकमेव मतदारसंघ. या मतदारसंघाचे आमदार मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर हे विद्यमान सरकारात मंत्री आहेत व पेडणे तालुक्याचे पालकमंत्रीही आहेत. हे खरे म्हणजे सुदैव ठरले पाहिजे होते. मात्र अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाबू आजगांवकर यांच्या पालकत्वाखाली येणाऱ्या दलित बांधवांचीच विहिरीच्या दुरुस्तीवरून गेल्या काही काळापासून हेळसांड आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे व त्यामुळेच विस्मयचकित करणारीही आहे. या दलित बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही पिळवणूक सर्वांगीण विकासाचा नेहमीच डंका पिटणाऱ्या पालकमंत्र्यांना दिसत नाही का? की त्यांना ती दिसत असूनही ते "त्या' जमीनमालकापुढे हतबल आहेत?
क्रीडानगरीचा प्रकल्प आणून पेडण्याचा भगीरथाप्रमाणे उद्धार करण्याची भाषा करणाऱ्या बाबू आजगांवकर यांना या तालुक्यातील दलितबांधव विहीर असूनही अस्वच्छ पाणी पीत आहेत, ही गोष्ट खरोखरच शोभते काय? स्थानिक पालिकेने विहीर दुरुस्तीची निविदा काढली पण या दुरुस्तीस जमीनमालकाने हरकत घेतल्याने काम रखडते आहे. या विरोधात या बांधवांनी पेडण्यात मूक मोर्चाही काढला पण आजच्या परिस्थितीत टाहो फोडूनही जनतेचा आवाज ऐकू न येणाऱ्या सरकारला या मूक मोर्चामागची भावना समजेल असे मानणेच व्यर्थ आहे. पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी यासंबंधी विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना मांडली व या गोष्टीकडे सभागृहाचे लक्ष्य वेधले. याप्रकरणी पालिकामंत्री ज्योकीम आलेमांव यांनी संबंधित जमीन मालकाशीे चर्चा करून या कामाला प्रारंभ करू, असेही आश्वासन दिले होते पण पुढे काहीच झाले नाही. पेडण्याचे पालकमंत्रीही याबाबत आपली राजकीय ताकद वापरताना दिसत नाहीत. एरवी कोणत्याही कारणावरून सभागृहात आदळआपट करणाऱ्या बाबू आजगांवकर यांना या विषयावरून आपला आवाज चढवण्याची किंवा तार सप्तकातून आपल्याच सरकारला सुनावण्याची गरज भासली नाही काय, असाही सवाल हे बांधव करीत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या गळ्यातील गेल्या जयंतीनिमित्त घातलेली फुलांची सुकलेली माळ काढून नवी चढवण्याइतकेच या दिनाचे महत्त्व आहे की खरोखरच दलितांच्या समस्या व त्यांच्या हक्कांबाबत गांभीर्याने विचार करण्याची संधी देणारा हा दिन आहे याचा विचार आता प्रत्येकाने करणे काळाची गरज बनली आहे.
Wednesday, 14 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment