Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 15 April 2010

आयपीएलमध्ये अंडरवर्ल्डचाही शिरकाव?

नवी दिल्ली, दि. १४ : आयपीएलमधील गुंतवणुकीच्या मुद्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शशी थरुर यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
परराष्ट्र व्यवहार खात्याचे विशेष कार्य अधिकारी जेकब जोसेफ यांनी एका वृत्तवाहिनीला संदेश पाठवून ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, थरुर यांना आयपीएलच्या कोच्ची टीमशी संबंध तोडण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी असे केले नाही तर परिणाम वाईट होतील, असे सांगण्यात आले आहे. या विषयी आपण गृहमंत्रालय आणि पोलिसांना सूचना दिल्याचेही जोसेफ यांनी सांगितले.
पण, गृहमंत्रालय आणि पोलिस दोघांनीही अशी कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय, आता थरुर यांना धमकी मिळाली असेल तर ती नेमकी कोणी दिली, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
काही वृत्तवाहिन्यांनी ही धमकी अंडरवर्ल्डमधून देण्यात आल्याचे म्हटले आहे. काहींनी तर दाऊदच्या हस्तकांनी ही धमकी दिल्याचा दावा केला आहे. पण, अद्याप या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यात आलेला नाही आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलेले नाही. त्यामुळे याविषयी कोणताही निष्कर्ष काढता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोदींचा प्रतिक्रिया देण्यास नकार
शशी थरुर यांना कथित अंडरवर्ल्डकडून मिळालेल्या धमकीविषयी प्रतिक्रिया देण्यास ललित मोदी यांनी स्पष्ट नकार दिला. याविषयी काही बोलण्याची आपली इच्छा नसल्याचे मोदी यांनी सांगितले. सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांनी स्वत: मोदी यांनाही बऱ्याच धमक्या मिळत असल्याने त्यांनी सरकारकडून सुरक्षा मागितल्याचे सांगितले.
कॉंग्रेस, भाजपा यांचे आंदोलन
आयपीएलच्या वादात अडकलेले ललित मोदी आणि शशी थरुर या दोघांच्याही विरोधात आज तिरुवनन्तपुरम येथे कॉंग्रेस तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. विशेष म्हणजे, थरुर हे लोकसभा सदस्य असून ते तिरुवनन्तपुरम येथूनच निवडून आले आहेत. आज त्यांच्याच मतदारसंघात विरोधी लाट उसळली असून त्यांचे पुतळे जाळण्यात आले. केवळ विरोध पक्ष भाजपच नव्हे तर सत्ताधारी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही थरुर यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

No comments: