Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 January 2010

कामत हटाव मोहीम आणखी तीव्र, बंडखोरांना कॉंग्रेस आमदारांचीही साथ

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): कॉंग्रेस आघाडी सरकारातील कॉंग्रेसेतर मंत्री व आमदारांनी "ग्रुप ऑफ सेव्हन' च्या नावाखाली मुख्यमंत्री कामत यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली असतानाच आता खुद्द कॉंग्रेसमधील एका प्रबळ गटानेही कामत हटाव मोहिमेसाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे नेतृत्व झुगारून टाकण्यासाठी खुद्द सरकारातील मंत्री आमदारांनीच इतक्या मोठ्या प्रमाणात बंड करण्याची ही पहिलीच वेळ असून कामत यांना बाजूला केल्याशिवाय शांत न बसण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. आजच दिल्लीहून परतलेल्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने आपण सध्याच्या राजकीय अस्थिरतेतून नेहमीप्रमाणे सुरक्षितपणे बाहेर पडू असे वाटत असताना ग्रुप ऑफ सेव्हन बरोबरच पक्षातील बंडखोरांकडूनही कडवा विरोध सुरू झाल्यामुळे अचंबित होण्याची पाळी आली आहे. तथापि, या ही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवण्याची त्यांनी आपल्यापरीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कामत यांच्यासाठी खरी डोकेदुखी ठरलेले चर्चिल आलेमाव यांना आज श्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला पाचारण केले व कामत विरोधक काही प्रमाणात नरम पडले असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही परिस्थितीत कामत यांना हटवणारच असा निग्रह केलेल्या कॉंग्रेसच्या काही आमदारांनी मात्र नेतृत्व बदलाचा विडाच उचलला असून त्यासाठी पुढील परिणामांनाही सामोरे जाण्याची तयारी ठेवली असल्याचे समजते.
आज दिवसभरात राज्यातील राजकीय स्थिती काहीशी शांत वाटत होती परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्री कामत यांच्या विरोधातील असंतोष मात्र कायम होता हे नंतर स्पष्ट झाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निष्क्रिय कारभारामुळे सतत नाराज असलेल्या ग्रुप ऑफ सेव्हनच्या आमदारांनी कॉंग्रेस पक्षातही त्यांच्याबद्दल असलेला नाराजीचा या बंडासाठी चांगलाच उपयोग केल्याचे सध्या दिसत आहे. ग्रुप ऑफ सेव्हन' च्या नेत्यांनी काही कॉंग्रेस आमदारांशी संधान बाधून कामत यांच्या विरोधकांचा आकडा सध्या चांगलाच वाढविला आहे. म. गो. चे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ऐन वेळी ग्रुप ऑफ सेव्हनला आज दगा देण्याचा प्रयत्न केला असला तरी ढवळीकरांच्या पाठिंब्यावर ग्रुप ऑफ सेव्हन आधीपासूनच फारसा अवलंबून नव्हता असे, त्यामुळे त्यांच्या आजच्या पवित्र्यामुळे राजकीय बंडाळीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे ग्रुप ऑफ सेव्हनच्या एका नेत्याने सांगितले. म. गो. पक्षाने दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे व तो कायम राहणार असे विधान करून त्यांनी गोंधळात भर घालण्याचा ढवळीकर यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर संध्याकाळी दोनापावला येथील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर या गटाची बैठक झाली पण त्यात नेमके काय ठरवण्यात आले ते मात्र कळू शकले नाही. मात्र विरोधक आपल्या मताशी ठाम असल्याचेच एकंदरीत घटनांवरून दिसून आले.
कॉंग्रेस पक्षातील आमदारांनी आज माजी वित्तमंत्री तथा हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांची भेट घेतल्याचीही माहिती मिळाली आहे. ऍड.नार्वेकर यांनी या गटाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्याचे समजते. पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रताप गावस, आग्नेल फर्नांडिस आदी आमदार ग्रुप ऑप सेव्हनबरोबर असल्याचे समजते. नेतृत्व बदलाची ही मागणी श्रेष्ठीपर्यंत पोहचवण्यात आल्याचे आमदार मडकईकर यांनी काही पत्रकारांना सांगितले. या मागणीपासून अजिबात माघार घेणार नाही व त्याचे परिणाम काहीही झाले तरी बेहत्तर असा ठाम निर्धार मडकईकर यांनी व्यक्त केल्याचे समजते.
मुख्यमंत्री बंडखोरांना भेटणार
दरम्यान दिल्लीहून परतलेल्या मुख्यमंत्री कामत यांची पत्रकारांनी विमानतळावर भेट घेतली असता, आपण निर्धास्त असल्याचे नेहमीप्रमाणे त्यांनी म्हटले खरे परंतु त्यांच्या आवाजात पूर्वीप्रमाणे आत्मविश्वास मात्र नव्हता. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांकडे आपण चर्चा करणार असून त्यांची समजूत काढण्यात आपण यशस्वी होऊ असेही ते म्हणाले. कदाचित उद्याच ते बंडखोरांची भेट घेण्याची शक्यता आहे, त्यानंतर शनिवारी पक्षाच्या बंडखोर आमदारांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शनिवारपर्यंत कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
--------------------------------------------------------------
नातेवाईकांवर रोष
अकार्यक्षमता, निष्क्रियता, निर्णयशक्तीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे ग्रुप ऑफ सेव्हन तसेच पक्षातील आमदार मुख्यमंत्री कामत यांच्यावर चांगलेच नाराज आहेत, परंतु अलीकडे सरकारी निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्र्यांच्या काही कुटुंबीयांकडून होणाऱ्या कथित हस्तक्षेपाबद्दलही त्यांना कमालीचा राग असल्याचे समजते. या हस्तक्षेपाच्या अनेक चित्तरकथा सध्या बंडखोर आमदारांमध्ये चर्चिल्या जात असून ही कौटुंबिक मक्तेदारी सहन केली जाणार नसल्याचे वक्तव्य बंडखोर वारंवार करताना दिसत आहेत.

No comments: