पणजी, दि. १२ (विशेष प्रतिनिधी) ः महिलांना चांगले आरोग्य प्राप्त करून देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने महिलांचे सशक्तीकरण करणे होय, केवळ त्यांना सुशिक्षित करणे व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे म्हणजे सशक्तीकरण नव्हे. यासाठी महिलांच्या सशक्तीकरणाचा केंद्रबिंदू हा तिचे आरोग्य असले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा रोग व आजारांपासून मुक्त असलेली निरोगी महिला ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी सुध्दा एक बहुमूल्य संपत्ती असल्याचे सुप्रसिद्ध अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या व राज्यसभा खासदार शबाना आझमी यांनी आज सांगितले.
आरोग्य खात्यातर्फे, देशातील पहिल्याच दोन आधुनिक मोबाईल "मेमोग्राफी' वाहनांच्या उद्घाटनानिमित्त येथील कला अकादमीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांसमोर त्या बोलत होत्या. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील गरिबांनी कष्टांनी जमविलेले बहुतेक पैसे हे त्यांच्या कुटुंबातील विविध रोगांचे निदान व उपचारासाठीच खर्च केले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे आझमी यांनी सांगितले. महिलांचे राहणीमान सुधारायचे असल्यास वैद्यकीय विमा नसलेल्यांनाही चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
मोबाईल मेमोग्राफी हे ग्रामीण महिलांसाठी एक वरदानच आहे कारण कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगाच्या निदानासाठी इस्पितळच त्यांच्या दरवाजात येणार आहे असे त्या म्हणाल्या. कॅन्सरचे लगेच निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो व जीव वाचू शकतो यावर त्यांनी भर दिला. मोबाईल मेमोग्राफी वाहन प्रकल्प सुरु करण्यासाठी गोवा सरकारबरोबर भागीदारी केल्याबद्दल त्यांनी मुस्कान या बिगरसरकारी संस्थेचे कौतुक केले. या प्रकल्पाचे यश हे महिलांच्या सहभागावर असल्याचे त्या म्हणाल्या. गोव्यातील महिलांच्या हितासाठी हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल त्यांनी आरोग्य मंत्र्यांचे अभिनंदन केले.
स्वतःच्या स्तनातील गाठी, सूज किंवा स्तनात झालेल्या आकारातील बदल याची चाचणी करण्यासाठी महिलांनी लाजता कामा नये. २० वर्षांवरील प्रत्येक स्त्रीने आपल्या स्तनांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंग राणे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, आरोग्य सचिव राजीव वर्मा, आरोग्य संचालक राजनंदा
देसाई, डॉ. शेखर साळकर, डॉ. विरेंद्र गांवकर व डॉ. शर्मिला सरदेसाई, डॉ. लक्ष्मी गावणेकर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, आपले सरकार श्रीमंतांना मिळणाऱ्या सर्व सुविधा गोव्यातील गरिबांनाही उपलब्ध करून देण्यासाठी बांधील असल्याचे सांगितले. आरोग्य ठीक नसेल तर संपत्ती कामाची नाही, असे सांगताना लोकांच्या घरापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविल्याबद्दल त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
आरोग्य सचिव वर्मा यांनी भारतातील प्रत्येकी २२ महिलांपैकी एक महिला ही स्तन कॅन्सरची रुग्ण असते व या रोगाविरुद्ध लढाई वैद्यांनी नव्हे तर लोकांनी लढायची असल्याचे ते म्हणाले.
सभापती राणे यांनी या मोबाईल सेवेचा जास्तीत जास्त उपयोग महिलांनी करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. रस्त्याच्या बाजूला औषधांच्या नावाखाली मुळे व औषधी वनस्पतींची विक्री करणाऱ्या ढोंगी वैद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कायद्याची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.
गोव्यात स्तन कॅन्सरची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अशा प्रकारची मोबाईल वाहने राज्यातील कानाकोपऱ्यातील रुग्णांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करील,असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यावेळी सांगितले.
Wednesday, 13 January 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment