Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 16 January 2010

जुगाराचे निर्दालन करणारच पोलिस महासंचालकांचे ठोस आश्वासन

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे हा गुन्हा आहे व तो प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. धार्मिक कार्यक्रम किंवा जत्रोत्सवातील जुगारावर स्थानिक पोलिसांना कारवाई करावीच लागेल. जुगाराबाबत जनतेने पोलिसांना माहिती दिल्यास तात्काळ कारवाई करू, असे आश्वासन पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी दिले. गतवर्षी केवळ ३५ जुगार प्रकरणांची नोंद कशी, असा सवाल केला असता जुगार बंद करण्यासाठी जनतेचे सहकार्य गरजेचे असल्याचा खुलासा त्यांनी केले.
राज्यातील ढासळती कायदा आणि सुव्यवस्था व गुन्हेगारी प्रकरणांत वाढ झाल्यावरून गोवा पोलिस खात्यावर कुणी कितीही आरोप केले तरी गतवर्षी गोवा पोलिसांनी केलेली कामगिरी व अनेक कठीण गुन्हेगारी प्रकरणांचा लावलेला छडा ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचा दावा बस्सी यांनी केला. वर्षभरातील गुन्हेगारी प्रकरणांचा आढावा घेताना हिंदू धार्मिक स्थळांची मोडतोड व मोतीडोंगर येथील तलवार प्रकरणाबाबत चकार शब्दही अहवालात आढळला नाही. महानंद नाईक व मडगाव स्फोट प्रकरणी पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीची मात्र आज भरभरून स्तुती करण्यात आली.
आज पोलिस मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत बस्सी यांनी वर्षभरातील कामगिरीचा आढावा पत्रकारांसमोर सादर केला. याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक के. डी. सिंग, पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव, खास अधीक्षक व्ही. व्ही. चौधरी, तसेच विविध विभागाचे अधीक्षक, उपअधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते.
सुरुवातीस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी गतसालच्या पोलिस कामगिरीबाबत खास सादरीकरण करून राज्यातील पोलिस कामगिरीचा विस्तृत आढावा पत्रकारांसमोर ठेवला. त्यानुसार गेल्या वर्षभरात भारतीय दंड संहितेखाली (आयपीसी) एकूण ३००१ प्रकरणांची नोंद झाली. त्यातील १८६१ प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले. यंदा गंभीर स्वरूपाच्या एकूण १५८ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १३७ प्रकरणांचा तपास लावण्यात आला. गतसालापेक्षा ही प्रकरणे जादा असली तरी तपासाची टक्केवारीही वाढली आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
या प्रकरणांत खून (५८), खुनाचा प्रयत्न (२४), दरोडा (४), चोरी (३०), बलात्कार (४७), लूटमार (२९४), दंगे (५०) आदी प्रकरणांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या व्यतिरिक्त वाहन चोऱ्या (३३६), इतर चोऱ्या (५२२), फसवणूक (१३२), दंगे (५०), मारामारी (१९१), अपघाती मृत्यू (२१०), इतर अपघात(५२६), जुगार(३५) आदींचीही दखल घ्यावी लागेल. दरम्यान, पोलिस स्थानकांत आलेल्या प्रत्येक प्रकरणांची त्वरित नोंद घेण्याची पद्धत अवलंबिल्याने आकड्यांत वाढ झालेली असली तरी विविध प्रकरणांचा तपास लावताना पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
बस्सी म्हणाले, महानंद नाईक प्रकरणी पहिल्या आरोपपत्रांत तो निर्दोष सुटणे हा पोलिसांसाठी धक्का आहे; पण पुढील प्रकरणांत त्याच्याविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. त्याला या कर्माची सजा मिळणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वास्को येथील एका व्यापाऱ्याला ओलीस ठेवण्याची घटना, सांताक्रुझ येथील दरोड्याचा छडा, महिलांच्या संशयास्पद मृत्यू सत्राचा तपास, पाटो येथील चारजणांच्या गूढ मृत्यूची चौकशी आदी प्रकरणांचाही त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला. मडगाव स्फोटप्रकरणी विशेष चौकशी पथकाच्या कामाची तोंडभरून स्तुती करताना या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले व आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला हे पथक साहाय्य करीत असल्याचे ते म्हणाले.
अमलीपदार्थ विरोधी पथक, वाहतूक विभाग, आर्थिक गुन्हा विभाग, बेपत्ता शोध विभाग, कोकण रेल्वे विभाग, किनारी सुरक्षा विभाग, पोलिस नियंत्रण कक्ष आदी विभागांनी वठवलेल्या कामगिरीचीही दखल यावेळी श्री. बस्सी यांनी घेतली. पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा अभाव व साधनसुविधांची कमतरता असूनही या त्यावर मात करून पोलिस आपले कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्यावर कडक कारवाई
पोलिस खात्याबाबत अभिमान बाळगताना त्याला काही अपवाद असणे हे स्वाभाविक आहे. पोलिस खात्यातील काही लोक गुन्हेगारी प्रकरणांत गुंतले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही बस्सी यांनी दिली.
..तर महानिरीक्षकांच्या मुलालाही अटक
पोलिस महानिरीक्षक के. डी. सिंग यांच्या मुलाकडून सरकारी वाहनाचा गैरवापर झाला व अपघातही करण्यात आल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे व या वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च उचलण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. गरज पडलीच तर महानिरीक्षकांच्या मुलाला अटक करण्यासही पोलिस कसूर ठेवणार नाहीत,असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
आग्नेल यांच्या आरोपांची गंभीर दखल
कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमलीपदार्थ व्यवहारांबाबत केलेल्या वक्तव्यांची व पोलिस खात्यावर केलेल्या आरोपांची गंभीर दखल खात्याने घेतली आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे व गुन्हेगारांना अजिबात सोडणार नाही,असे श्री.बस्सी म्हणाले.अमलीपदार्थ व्यवहारांचे जाळे उखडण्यासाठी पोलिस कार्यरत आहेत. या व्यवहारांत गुंतलेल्यांना गोव्याबाहेर हाकलून लावले जाईल, असे त्यांनी सांगितले.

No comments: