विविध छाप्यांत अमलीपदार्थ जप्त
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - राज्यात अमलीपदार्थांचा अजिबात वापर होत नाही व इथे अमलीपदार्थांचे सेवनही केले जात नाही, असा तर्कट दावा करणाऱ्या गृहमंत्री रवी नाईक यांना त्यांच्या पोलिस खात्यानेच तोंडघशी पाडले आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पोलिस पथकाने विविध किनारी भागांत छापे टाकून अनेक प्रकारचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी सहाजणांना ताब्यातही घेण्यात आले असून या कारवाईमुळे रवी नाईक यांनी केलेल्या वक्तव्याची मात्र चांगलीच फजिती उडाली आहे.
आज पर्वरी येथे खास बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी या गुप्त कारवाईबाबत माहिती दिली. अत्यंत नियोजित व छुप्या पद्धतीने हे छापे टाकण्यात आले व एकूण १४९.३६ ग्राम विविध अंमलीपदार्थ जप्त करून सहाजणांना ताब्यात घेण्यात आले. यात चार विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचीही माहिती देण्यात आली. या अमलीपदार्थांची एकूण किंमत १ लाख ८३ हजार ९२० रुपये होते. विशेष म्हणजे बॉस्को जॉर्ज यांनी केलेल्या या कारवाईबाबत अंमलीपदार्थ विरोधी पथकाला मात्र पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. गृहमंत्री रवी नाईक यांनी अमलीपदार्थ विरोधी पथकाचे कौतुक करूनच कथित दावा केला होता पण या कारवाईमुळे हा दावा फोल ठरलाच व अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या विश्वासार्हतेबाबतही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कारवाईसाठी दोन उपअधीक्षक, पाच निरीक्षक, उपनिरीक्षक व विविध पोलिस स्थानकातील शिपायांचे एक पथक तयार करून त्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे श्री.जॉर्ज म्हणाले. पेडणे, हणजूण व म्हापसा या पोलिस स्थानकांवर एकूण चार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. "हिल टॉप','शिवा व्हॅली','साईप्रसाद', 'नाईन बार' आदी शॅक्सवर हे छापे टाकण्यात आले. या छाप्यात विविध पद्धतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. त्यात चरस, गांजा,"एमडीएमए' कॅप्सुल्स, "एलएसडी' आदींचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांत मोरजी गावडेवाडा येथे माथन हॉवार्ड जुलेर (निदरलेंड), हणजूण येथील कर्लीस शॅक्सवर सुखराम (नेपाळ), शिवा व्हॅली शॅक्स येथे विरकुन्नीन ओल्ली पेट्टेरी (स्वीडन) व पर्रा चर्च मैदानावर एज्रा नातेली, हजाज माओर व कोरेन इलाद (इस्राइली) आदी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे, अशी माहिती श्री. जॉर्ज यांनी दिली. यापुढे अंमलीपदार्थ सापडलेल्या शॅक्सवर कारवाई करण्यात येणार आहे व त्यांनाही जबाबदार धरण्यात येईल.आपल्या शॅक्स किंवा हॉटेलवर अंमलीपदार्थांचे सेवन किंवा व्यवहार होणार नाही याची काळजी यापुढे त्यांना घ्यावी लागणार आहे,अशी माहितीही श्री.जॉर्ज यांनी दिली.
गृहमंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर आपण प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही. एक पोलिस अधिकारी या नात्याने बेकायदा गोष्टींवर कारवाई करणे हे आपले कर्तव्य ठरते,असे म्हणून त्यांनी या विषयाला बगल दिली. अंमलीपदार्थ जप्त केल्यानंतर ते कोणत्या प्रकारचे आहेत याची माहिती मिळवण्यासाठी अंमलीपदार्थ विरोधी पथकाची मदत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये कारवाईस वेळ नव्हता
डिसेंबर अखेर व जानेवारीच्या प्रारंभी अमलीपदार्थांचा मोठा व्यवहार चालतो, पण आता जानेवारीच्या मध्यंतरी ही कारवाई करण्याचे कारण काय,असे विचारले असता डिसेंबर महिन्यात "इफ्फी',नाताळ, नववर्ष आदी कार्यक्रमांमुळे पोलिस खात्यावर अतिरिक्त कामाचा ताण होता. या काळात सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी असल्याने अंमलीपदार्थांवर छापे टाकण्यासाठी वेळच मिळाला नाही,असे स्पष्टीकरण श्री. जॉर्ज यांनी दिले.
Monday, 11 January 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment