पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यापाठोपाठ सत्तरी तालुक्यालाही जुगाराने वेढले आहे व या भागातही अनेक लोक या जुगाराच्या आमिषाला बळी पडत असल्याचे विविध किस्से समोर येत आहेत. सत्तरीत विविध ठिकाणी जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांना जुगार चालतोच पण त्याही पलीकडे या भागात काही कायमस्वरूपी जुगाराचे अड्डे उभे राहिले असून त्यात लोकांची वर्दळ सुरूच असते,अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
होंडा सत्तरी येथील एका सरकारी विद्यालयामागील अंतर्गत रस्त्याच्या बाजूलाच एक खास झोपडी तयार करण्यात आली आहे. पोफळी व नारळाच्या झावळ्या व बांबूंच्या साहाय्याने बनविलेली ही झोपडी या भागातील जुगाराचे महत्त्वाचे केंद्र बनले असून तिथे बारमाही पत्त्यांच्या जुगाराचे डाव रंगतात, अशी खबर प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या जुगाराच्या अड्ड्यापासून फक्त अंदाजे ३०० मीटरवर होंडा पोलिस स्थानक असून देखील इथे काहीच अवैध चालत नाही, अशा आविर्भावात पोलिस वावरत असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे. या जुगारवाल्यांनी पोलिसांना पूर्णपणे मिंधे करून ठेवले आहे व प्रत्येक वेळी त्यांच्या खिशात "गांधी'नोट चढवून त्यांना लाचार बनवल्याची टीका या भागातील एका नागरिकाने केली.
याठिकाणी हा अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांकडून लोकांना ताकीद दिली जाते व हा जुगार बंद करण्याची कुणातच बिशाद नाही व सगळ्यांना "सेटल' केल्याचेही सांगण्यात येते. विनाकारण जुगारवाल्यांशी पंगा घेऊ नका, अशी सरळ धमकी देण्यासही हे लोक मागेपुढे पाहत नाही. इथपर्यंत त्यांची मजल गेल्याची खबर काहींनी सांगितली. दरम्यान, "गोवादूत' ने जुगाराविरोधात चालवलेल्या जनचळवळीचे कौतुक करून या भागातील एका स्थानिकाने या संबंधित वृत्ताची खबर दिली. आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर या व्यक्तीने प्रत्यक्ष हे ठिकाणही दाखवले. सकाळीच इथे जुगाराचे डाव सुरू होतात व रात्री ८ च्या नंतर तर तोबा गर्दी उसळते. रात्री १ पर्यंत हा खेळ चालतो. सकाळपासून सायंकाळ पर्यंत "रमी' हा पत्त्यांचा खेळ इथे सुरूच असतो. दरम्यान, या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी आज २२ रोजी आमच्या "प्रतिनिधी'ने सकाळी ११ वाजता याठिकाणी भेट दिली. सदर व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार कथीत झोपडीची शोधाशोध सुरू केली. येथील शालेय विद्यालयाकडून वाड्यावर जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने जात असतानाच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मोठी झोपडी व त्या पुढे आणखी एक झोपडी दिसली व तिथे जुगार खेळणे सुरू असल्याचे आढळले. साखळी हरवळे येथेही रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या झोपडीत जुगार चालतो, असेही सांगण्यात आले.
यापूर्वी या भागातील लोकांनी या प्रकाराबाबत आपली नापसंती व्यक्त केली असता पोलिसांकडूनच लोकांना जरब दाखवण्याचेही प्रकार घडल्याची प्रकरणेही स्थानिकांनी पुढे केली. पणजीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जुगाराचा नायनाट करण्याची घोषणा केली असता स्थानिक पोलिस अधिकारी मात्र या आदेशांना जुमानत नाही, हा काय प्रकार आहे, असा खडा सवालही केला जात आहे. एखाद्या गैरप्रकाराबाबत जनतेने उघडपणे पुढे येऊन तक्रार करायला हवी, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते पण पोलिसच या जुगारवाल्यांचे खरे खबऱ्या म्हणून वावरत आहेत व कुणी गावांतून जर या जुगाराविरोधात तक्रार किंवा नाराजी व्यक्त केली की त्याची खबर लगेच या लोकांकडे पोचती केली जाते, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
------------------------------------------------------------
मांद्र्यातील जुगार उधळला!
मांद्रे मेस्तवाडा येथे उत्सवानिमित्त थाटण्यात आलेला जुगार पेडणे पोलिसांनी उधळून लावला. जुगार थाटण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली असता अचानक पोलिसांनी धडक दिल्याने जुगाराचा पट मांडलेल्यांनी पळ काढला. दरम्यान, हा जुगार चालवण्यासाठी पोलिसांकडे अनेकांनी विनवणी केली पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा विषय गंभीरपणे घेतल्याने कोणत्याही परिस्थितीत जुगार चालणार नाही, असे ठणकावून पोलिसांनी मध्यस्थी करणाऱ्यांना पिटाळून लावले. पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिकांनी जोरदार स्वागत केले आहे.
Saturday, 23 January 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment