Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 19 January 2010

राहुल गांधींची पहिलीच भेट वादाच्या भोवऱ्यात

भाजयुमोच्या घेरावानंतर विद्यापीठाचे परिपत्रक मागे
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आणि सरचिटणीस राहुल गांधी यांचा गोवा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी विद्यापीठाच्या कुलसचिवाने लेखी आदेश काढल्याने आज भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी विभागाने घेराव घालून सदर आदेश मागे घेण्यास भाग पाडले. यावेळी चुकीने व घाईगडबडीत हा आदेश काढल्याचे कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर यांनी मान्य करीत सदर आदेश मागे घेतला. दरम्यान, उद्या गोवा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर होणाऱ्या या राजकीय कार्यक्रमाला कॉंग्रेस पक्षाचा एकही फलक दिसता कामा नये, असा इशारा भाजपच्या विद्यार्थी विभागाने दिला आहे.
आज दुपारी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सांगोडकर यांना घेराव घालण्यात आला. विद्यापीठाच्या आवारात कोणताही राजकीय कार्यक्रम करण्यास विद्यापीठाच्या संविधानात मज्जाव असताना विद्यापीठाने राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी कोणत्या आधारावर परवानगी दिली, असा थेट प्रश्न करून डॉ. सांगोडकर यांना भांबावून सोडले. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना करणारे हे परिपत्रक डॉ. सांगोडकर यांनी कोणाच्या आदेशावरून काढले होते, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित राहिला आहे.
या वादग्रस्त परिपत्रकात विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांना तसेच संबंधित महाविद्यालयातील विद्यालयांना राहुल गांधी यांच्या सभेत उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भाजपच्या विद्यार्थी गटाने कुलसचिवांच्या कार्यालयाला घेराव घातल्याने सदर परिपत्रक चार तासांच्या आत मागे घेण्यात आले. या सभेदरम्यान गोवा विद्यापीठाच्या आवारात राजकीय झेंड्यांनाही मज्जाव करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. सांगोडकर यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. गोवा विद्यापीठाद्वारे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेसाठी आवारात जागा उपलब्ध करून देण्यावरच मुळात वाद निर्माण झाला आहे. कारण भाजपच्या विद्यार्थी गटाने हा प्रकार म्हणजे कॉंग्रेसद्वारे गोवा विद्यापीठाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठासारखे ठिकाण राजकारणापासून अलिप्त असायला हवे. या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने विद्यार्थ्यांना संबोधणे उचित नसल्याचे भाजप विद्यार्थी गटाने स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी सध्या भारत दौऱ्यावर असून, खास करून देशातील युवावर्गाचे विचार समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने त्यांची ही गोवा भेट असून, गोवा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. हा एका तासाचा कार्यक्रम असून, त्यानंतर ते गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती आणि युवा कॉंग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.

No comments: