Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 22 January 2010

डिचोलीतही जुगारी अड्डे "फुल्ल'!

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- सत्तरी पाठोपाठ आता डिचोली तालुक्याच्या कानाकोपऱ्यांतही राजरोसपणे जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली आहे. पोलिस या प्रकाराकडे कानाडोळा करतातच, वरून ते देखील यातील काही अड्ड्यांवर जुगार खेळण्यात दंग असतात, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दिवसभर कष्ट करून मिळवलेले चार पैसे घरी नेण्याचे सोडून काही पायलट मंडळी ही कमाई जुगारात उधळून टाकतात व कधी चुकून डाव लागला तर दारूवर खर्च करतात, असेही किस्से आता पुढे येत आहेत.
"गोवादूत'मधून सार्वजनिक ठिकाणी व जत्रोत्सव तथा इतर धार्मिक उत्सवांना चालणाऱ्या जुगाराविरोधात जनमत चळवळ उभारली जात असतानाच विविध ठिकाणी जुगाराचे आयोजन करणाऱ्यांकडून थेट आव्हान देण्याची भाषा केली जात असल्याची खबर आहे. प्रसिद्धी माध्यमाने कितीही गरळ ओकली तरी जुगार बंद होणार नाही, असे म्हणून संपूर्ण प्रशासकीय व पोलिस यंत्रणांनाही आव्हान देण्याची धमक ते दाखवत आहे. "गोवादूत'ने यासंबंधी घेतलेल्या पुढाकाराचे मात्र सर्वत्र स्वागत केले जात असून आता लोक आपोआपच पुढे येऊन आपल्या अवतीभोवती सुरू असलेल्या जुगाराबाबत सविस्तर माहिती देण्यास पुढे सरसावले आहेत. जुगार आयोजित करणाऱ्या या लोकांनी समाजात एक प्रकारचा दरारा निर्माण केला आहे तसेच पोलिसांनाही विकत घेतले जात असल्याचेही वातावरण पसरल्याने उघडपणे या प्रकाराविरोधात लोक आवाज काढीत नसले तरी हा प्रकार बंद व्हायलाच हवा, याबाबत मात्र सगळ्यांचे एकमत बनले आहे.
डिचोलीच्या बाबतीत प्राप्त झालेल्या माहितीनुसार टप्प्या टप्प्यात जुगाराचे अड्डे तयार होत आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास डिचोली बसस्थानकामागे एक बराच मोठा अड्डा चालतो. त्याही पलीकडे डिचोली बगलरस्त्यालगत अशाच प्रकारचा अड्डा चालतो. वन म्हावळिंगे येथील बसथांब्याजवळही अशीच एक अडगळीतील जागा असून तिथेही दिवसभर लोक जुगार खेळण्यासाठी ठिय्या मारून बसलेले असतात. तेथील दोन नामांकित कंपन्यांजवळ एका झाडीत मोठ्या प्रमाणात जुगार चालतो व येथील कामगार आपला संपूर्ण पगार याठिकाणी डावाला लावत असतात, अशीही खबर मिळाली आहे. गोवा - दोडामार्ग सीमाभागात तर या प्रकाराला काही पारावारच राहिलेला नाही. या भागातील लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेल्या पाटाजवळील खास उभारलेल्या झोपडीत दिवसरात्र जुगार चालतो. विशेषतः रविवार हा सुट्टीचा दिवस व त्यात दोडामार्ग (सकीरवाळ) येथील बाजाराचा दिवस असल्याने ही झोपडी भरून उतू पडते. दुचाक्यांच्या रांगाच रांगा इथे लागलेल्या असतात. साळ येथे जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूला पेट्रोलपंप आहे, त्याच्या जवळही एका झोपडीत जुगार चालतो. ही दोन्ही ठिकाणे पोलिस आउट पोस्टाच्या अत्यंत जवळ असूनही पोलिस थांगपत्ता नसल्याचा आव आणून कानावर हात ठेवून गप्प असतात. या व्यवसायातून दर महिन्याला किंवा आठवड्याला पोलिसांचा "मान' पोचवला जातो व त्यामुळेच पोलिसांचा या प्रकाराला छुपा पाठिंबा मिळतो. आता पोलिस महासंचालकांनीच जुगाराविरोधात दंड थोपटल्याने या पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला जुगारवाल्यांना देण्यात येत असल्याचीही खबर आहे.

No comments: