Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 14 October 2009

सतावणूक न थांबल्यास उद्या 'बस वाहतूक बंद'

उत्तर गोवा खाजगी बस वाहतूक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांची भेट घेतली व विचारपूस केली. यावेळी पर्रीकरांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला. (छायाः सचिन आंबडोस्कर)

वाहतूक मंत्र्यांचा राष्ट्रीयीकरणाचा इशारा
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): राज्यातील खाजगी प्रवासी बस वाहतूकदार व वाहतूक खाते यांच्यातील वाद आता चिघळण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी झाली नाही किंवा खाजगी बस वाहतूकदारांची सतावणूक बंद झाली नाही तर गुरुवार १५ रोजी अखिल गोवा खाजगी बस वाहतूक बंद करू, असा इशारा संघटनेने दिला आहे तर खाजगी बस वाहतूकदारांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही तर त्यांचे परवाने रद्द करू त्याचबरोबर विविध मार्गांचे राष्ट्रीयीकरण करू,असे प्रतिआव्हान वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले.
...तर गुरुवार १५ रोजी गोवा बंद
वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराने गाठलेला कळस व प्रवासी बस वाहतूकदारांची खात्याकडून होत असलेली सतावणूक याविरोधात उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. उपोषणाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पणजी ते कळंगुट मार्गावरील खाजगी बसगाड्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी दिली. उद्यापर्यंत काहीही तोडगा निघत नसेल तर गुरुवार १५ रोजी गोव्यातील खाजगी प्रवासी बस वाहतूक बंद करावी लागेल,असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर हे अहंपणाने वागतात. सुमारे चार हजारांच्या आसपास खाजगी बसमालक आहेत. त्यांच्या समस्या व अडचणी ऐकून घेण्यासही ते तयार नाहीत. संघटनेत फूट घालण्यासाठी व बस वाहतूकदारांवर दबाव घालण्यासाठी ते राष्ट्रीयीकरणाचा धाक दाखवत आहेत. त्यांना हिंमत असेल तर त्यांनी हा निर्णय घेऊन दाखवावा,असे आव्हान यावेळी श्री.कळंगुटकर यांनी दिले. राष्ट्रीयीकरण करा व बस मालकांसह, चालक व वाहकांना नोकरीवर घ्या,असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. महाराष्ट्रात कर्जाचा बोजा वाढल्याने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या तोच प्रसंग आता खाजगी बस मालकांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खाजगी बस वाहतूकदारांवर प्रवाशांची सतावणूक करण्याचा आरोप केला जातो पण प्रत्यक्षात वाहतूक खात्याकडून या बसमालकांची पिळवणूक होते त्याबाबत मात्र वाहतूकमंत्री "ब्र' काढीत नाहीत. "कोंबड्यांची झुंज लावून मजा पाहत बसावे' त्या पद्धतीने आज वाहतूक खाते खाजगी बस वाहतूकदारांचीच आपापसात झुंज लावून त्यांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.याप्रसंगी दक्षिण गोवा खाजगी बस मालकांनीही श्री.ताम्हणकर यांना आपला पाठिंबा दर्शवला व संघटितपणे हा लढा लढण्याचा निर्धारही केला.
आंदोलन थांबवा, अन्यथा मार्गांचे राष्ट्रीयीकरण करू ढवळीकर
उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे काही नेते केवळ आपल्या वैयक्तिक हेव्यादाव्यांचा वापर करून सरकारला व पर्यायाने प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रयत्न करतात. त्यांच्या या बेशिस्तीला व धमकीला सरकार अजिबात ढळणार नाही.हे आंदोलन मागे घेतले नाही तर आंदोलनात सहभागी झालेल्या बस मालकांचे परवाने रद्द करू व प्रसंगी खाजगी बस मालकांची दयेमुळे स्थगित ठेवलेला राष्ट्रीयीकरणाचा विषय निकालात काढू,असा इशारा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला.
आज "कामाक्षी'या आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी वाहतूक खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर,उपसंचालक अशोक भोसले,साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई व इतर अधिकारी हजर होते.वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराबाबत तोडगा काढण्यासाठी आपण संपूर्ण खात्याच्या संगणकीकरणावर भर दिला आहे.त्यासाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूकही करणार असल्याचे ते म्हणाले.अशोक भासले यांच्यावर होत असलेले आरोप हे वैयक्तिक असूयेपोटी होत असून त्यांना दक्षता खात्याने दोषमुक्त केले आहे.प्रल्हाद देसाई हे वाहतूकमंत्र्यांच्यावतीने पैसे मागतात हा आरोपही निव्वळ खोटारडा आहे,असे स्पष्टीकरण श्री.ढवळीकर यांनी यावेळी दिले.
खाजगी बस वाहतूकदारांच्या पोटावर लाथ मारावी लागेल म्हणूनच आपण राष्ट्रीयीकरणाचा विषय बाजूला ठेवला आहे.आता बस वाहतूकदारच जर बेशिस्तीने वागू लागले व वारंवार सरकारला वेठीस धरण्याच्या धमक्या देऊ लागले तर राष्ट्रीयीकरणावर भर देणे भाग पडेल,असा इशारा यावेळी श्री. ढवळीकर यांनी दिला. संघटनेने बंद पुकारल्यास कदंब महामंडळाची मदत घेऊन तसेच प्रसंगी शेजारील राज्यांतून बसगाड्या मागवून प्रवाशांची सोय करू,अशी माहितीही श्री.ढवळीकर यांनी दिली. प्रवाशांकडून खाजगी बस वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी येतात त्याचीही गंभीर दखल घेऊ, असेही यावेळी श्री.ढवळीकर म्हणाले.
------------------------------------------------------------------
पर्रीकरांचा बस वाहतूकदारांना पाठिंबा
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज सुदीप ताम्हणकर यांची भेट घेतली व विचारपूस केली.यावेळी संघटनेतर्फे सुदीप ताम्हणकर यांनी आमरण उपोषणाचा हा निर्णय का घ्यावा लागला याचे कारण पर्रीकरांना कथन केले. वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची यादीच त्यांनी पुराव्यासहित पर्रीकरांसमोर ठेवली. या सर्व प्रकरणांबाबत अभ्यास करू, असे आश्वासन देऊन पर्रीकर यांनी संघटनेला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

No comments: