Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 11 October 2009

मांद्रेची ग्रामसभा आज वादळी ठरणार

पेडणे, दि. १० (प्रतिनिधी) - मांद्रेची उद्या ११ रोजी होणारी ग्रामसभा विविध विषयांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील जागृत नागरिक तथा विशेष करून मांद्रे सिटीझन फोरमचे तरुण कार्यकर्ते यांनी पंचायत मंडळ व सचिवांना विविध विषयांवरून कोंडीत पकडण्याची जबरदस्त व्यूहरचना आखली आहे, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
मागच्या दोन ग्रामसभा जुनसवाडा मांद्रे येथील तथाकथित "रिवा रिझोर्ट' चे बेकायदा बांधकाम व कुंपणावरून बरीच गाजली होती. उद्याच्या बैठकीत आम्रपाली बांधकाम प्रकल्प, महाशीर हॉटेल प्रकल्प, जुनसवाडा येथील वाळूचे तेंब सपाटीकरण व कुटीरांचे बांधकाम, पंचायत सचिवांच्या बदलीचा घोळ,आश्वे डोंगर कापणी प्रकरण व मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुगार या विषयावरून पंचायत मंडळ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मांद्रे सिटीझन फोरमची तातडीची बैठक आज झाली व त्यात ग्रामसभेत मांडण्यात येणाऱ्या विषयांची तयारी करण्यात आल्याचीही खबर प्राप्त झाली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर यंदा "ग्रामसभावर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. जास्तीत जास्त ग्रामसभा घेणे, ग्रामसभेला मोठ्यासंख्यने नागरिकांना उपस्थित राहण्यास प्रोत्साहन देणे व गावच्या समस्या, प्रश्न व विकासाच्या निर्णय प्रक्रियेत ग्रामस्थांना सहभागी करून घेणे असा उद्देश ठेवण्यात आला आहे. मांद्रे गावातील युवकांनी अलीकडच्या ग्रामसभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध विषयांवरून पंचायत मंडळाला जाब विचारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून आता पेडणे तालुक्यातील इतर गावातील ग्रामसभांनाही गर्दी लोटत असल्याचे चित्र पसरले आहे.
मांद्रे फोरमचा स्तुत्य उपक्रम
मांद्रे गावातील जागृत नागरिकांनी एकत्रित येऊन मांद्रे सिटीझन फोरमची स्थापना केली आहे. वकील, अभियंते, शिक्षक व सुशिक्षित नागरिक यात सभासद म्हणून कार्यरत आहेत. गावात कुणावरही अन्याय झाला तर फोरम लगेच दखल घेतो. मागच्या दोन ग्रामसभांना ग्रामस्थांना जागृत करण्याचे काम मांद्रे फोरमने केले. जुनसवाडा येथील तथाकथित रिवा हॉटेलच्या जागेत राहणाऱ्या मुंडकारांवर मालकांनी केलेल्या अन्यायाला फोरमने वाचा फोडली. हा प्रश्न ग्रामसभेत बराच गाजला होता. फोरमच्या पुढाकाराची पंचायत मंडळाने मात्र बरीच धास्ती घेतली आहे.
आम्रपाली व आश्वे येथील महाशीर हॉटेल बांधकामावरही या सभेत गरमागरम चर्चा होणार आहे.मांद्रे पंचायतीचे सचिव यांची बदली होऊनही ते अजूनही ताबा सोडत नाहीत. या सचिवांची बदली रद्द करण्यासाठी पंचायत मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे विनंती केल्याचीही माहिती मिळाली आहे. पंचायतीच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे सोडून सचिवाची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याचे नेमके कारण काय, असा सवालही ग्रामस्थांना पडल्याने हा विषयही उद्याच्या सभेत उपस्थित होणार आहे. मांद्रेच्या तलाठ्याविरोधातही अनेक तक्रारी असल्याने त्याचाही जाब विचारला जाईल, अशी माहिती देण्यात आली.

No comments: