पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): वेर्णा येथे अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या एविटा रॉड्रिगीस या १६ वर्षीय युवतीच्या खुन्यांना आज गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने मुंबईत ताब्यात घेतले. या खून प्रकरणातील संशयित आरोपी चंद्रकांत तलवार (३५ रा. सांतईनेझ - पणजी) व सायरन रॉड्रिगीस (२० रा. चिंबल) तरुणांना घेऊन पोलिस पथक उद्या शनिवारी सकाळी गोव्यात दाखल होणार आहे. एका ठोस माहितीच्या आधारे वसई येथील एका झोपडपट्टीत छापा टाकून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. या दोघांकडून अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना हाती लागले असून मेरशी, खोर्जुवे आणि सुकूर या चारही खुनांचा छडा त्याद्वारे लागण्याची शक्यता आहे. गोवा पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे आज पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी सांगितले.
एविटाच्या खुनामागे तिच्याच मित्रावर पोलिसांचा संशय होता. त्याचप्रमाणे काही महिन्यापूर्वी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आली होती. ही सोनसाखळी परत हवी तर, आपल्याला भेटायला ये, असेही तिला धमकावण्यात येत होते. तसेच एविटा घरातून निघण्यापूर्वी तिच्या मोबाईलवर १० वाजता अनेक दूरध्वनी आले होते. तेव्हापासून ती बरीच गडबडीत होती. त्यानंतर वास्कोला जाण्याचा हट्ट तिने आपल्या आईकडे धरला होता. एविटाला तो दूरध्वनी कोणी केला होता, याचा माग काढत पोलिस या गुन्हेगारांपर्यंत पोहोचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
एविटाचा खून का...
सायरन हा एविटाला ओळखत होता, मग त्याने एविटाचा खून का आणि कशासाठी केला हा गंभीर प्रश्न सर्वांना पडलेला आहे. यामागे कोणते रॅकेट होते का, एविटा कोणत्या रॅकेटमध्ये फसली होती का, असे अनेक प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडलेले असून खुनी गोव्यात पोहोचताच या सर्व प्रश्नांचा उलगडा होईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
कोण हा चंद्रकांत...!
अनेक प्रकरणांत चंद्रकांत हा पणजी आणि फोंडा पोलिसांना हवा होता. काही महिन्यांपूर्वी माशेल येथे कुविख्यात गुंड स्व. मानशियो याने दागिन्यांच्या एका दुकानावर टाकलेल्या दरोड्यात फोंडा पोलिसांना चंद्रकांत हवा होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचे घर सांतईनेझ येथे असले तरी, तो दक्षिण गोव्यातून गुन्हेगारी कारवायांची सूत्रे हलवत होता, अशी माहिती मिळाली आहे. तसेच मुंबईतून मुली आणून गोव्यात त्यांचा व्यवहार करण्याच्याही धंद्यातही चंद्रकांत होता. यापूर्वी तो मानशियो याला मुली पुरवत होता. दरोडा प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पणजी बस स्थानकासमोर झालेल्या एका वाहन अपघातात मानशियो याचा गेेल्या महिन्यात मृत्यू झाल्याने हा धंदा चंद्रकांत सांभाळत होता. सायरन हा ग्राहक मिळवून त्यांच्यापर्यंत मुली पोहोचवण्याचे काम करत होता. राज्यात छोट्यामोठ्या चोऱ्या करणे तसेच मुली पुरवणे हा त्यांचा मुख्य धंदा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सायरन हाही माशेल दरोडा प्रकरणात जामिनावर सुटला होता.
-----------------------------------------------------------------------
सेक्स रॅकेट..?
मेरशी आणि वेर्णा येथे होरपळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटली असली तरी, खोर्जुवे आणि सुकूर येथे सापडलेल्या त्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या दोन्ही महिला मुंबईतील असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोव्यात वेश्याव्यवसायासाठी या महिला आणून नंतर त्यांचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासकामाची चक्रे फिरवली आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने काढून तिला जाळून मारण्यात आले असावे, ही शक्यतादेखील नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment