ऍड. उदय भेंब्रे यांचे परखड प्रतिपादन
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - गोव्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या नेत्यांच्या हातात सत्तेची सूत्रे सोपवून गोवेकर कसल्या विकासाची अपेक्षा बाळगून आहेत,असा खडा सवाल करतानाच प्रशासनाचा बट्टाबोळ, भ्रष्टाचाराचा कळस हीच राज्याची ओळख बनत चालली आहे, असे परखड उद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक ऍड. उदय भेंब्रे यांनी काढले.
कै.पांडुरंग मुळगावकर यांच्या ९२ व्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी " भारतातील गोवा- काल, आज आणि उद्या' या विषयावर ओजस्वी भाषण केले.यावेळी व्यासपीठावर स्मृती समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश गुरूदास कामत, "मार्ग'अभियानचे निमंत्रक गुरूनाथ केळेकर, लीबिया लोबो सरदेसाई आदी मान्यवर हजर होते.
गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांनंतरही वीज,पाणी आदी आवश्यक गोष्टींची शाश्वती देता येत नाही, तिथे काय बोलावे."इंडिया टूडे, आयबीएन-७' आदींकडून गोव्याला लहान राज्यांच्या विभागांत उत्कृष्ट राज्याचा पुरस्कार जाहीर झाला.लहान राज्यांच्या गटात असलेली मिझोरम,मणिपूर,मेघालय आदी पूर्वांचल राज्ये येतात. अनुसूचित जमातीच्या लोकांचे बहुमत असलेल्या या राज्यांकडे गोव्याची तुलनाच होऊ शकत नाही, तिथे गोव्याला पुरस्कार मिळणे म्हणजे "आंधळ्यात कुड्डो राजा'असाच प्रकार आहे. सर्वांत जास्त भ्रष्टाचार व निष्क्रिय प्रशासनाचा विभाग असता तर त्यात गोव्याचा क्रमांक नक्कीच अव्वल लागला असता असा टोलाही यावेळी ऍड.भेंब्रे यांनी हाणला.
गोव्याच्या मुक्तीला अठ्ठेचाळीस वर्षे संपत आली पण या काळात गोव्याचा विकास कमी आणि दुर्दशाच जास्त झाली आहे. गोव्याच्या अस्मितेबाबत चिंतेचा आव आणून आता "विशेष दर्जाचे' ढोल बडवले जात आहेत. तथापि, "गोंयकारपण' टिकवायचे असेल तर त्यासाठी गोवेकरांनी आपल्या मूलभूत स्वभावात आमूलाग्र बदल करणे अपरिहार्य आहे.अन्यथा गोव्याचा विनाश अटळ आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
गोव्याचा इतिहास, वर्तमान व भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या आपल्या भाषणात ऍड.भेंब्रे पुढे म्हणाले की गोवा मुक्तीनंतर दिशाहीन, तत्त्वहीन, मूल्यहीन सरकारांच्या हातात सत्तेची सूत्रे जनतेने सोपवली. त्यावेळच्या सरकारने केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुढील सरकारांनी सुरू ठेवली आहे. गोवा विलीनीकरण वादाचा आढावा घेतल्यास त्याची जबर किंमत राज्याला भोगावी लागली आहे. समृद्ध, सुखी गोवा व देशाची सेवा करण्याच्या भावनेने पहिल्या निवडणुकीत उतरलेल्या तत्कालीन विचारवंतांना जनतेने झिडकारले व विचारहीन नेतृत्वाकडे सत्ता सोपवली.दगडाला शेंदूर फासून निवडणुकीत उभा केला तरीही तो निवडून येऊ शकतो,अशी भाषा करणारेच श्रेष्ठ ठरले.गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या तत्कालीन नेतृत्वाला गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची आस नव्हतीच व आता कालांतराने तोच मुद्दा ऐरणीवर आला आहे.आता गोव्यासाठी विशेष राज्याच्या दर्जाची भाषा केली जात आहे. दर्जा मिळाला तर तो केवळ आर्थिक पॅकेजच्या दृष्टीने मिळेल, राज्याचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने नसेल,असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या एकूण दारुण परिस्थितीला गोमंतकीय समाजच जबाबदार आहे.गोमंतकीय या नात्याने आपण निष्क्रिय, भ्रष्ट, आळशी, कायद्याचे दुश्मन, हेकेखोर व नेहमीच नकाराचे तुणतुणे वाजवणारे आहोत. हा स्वभावदोष बदलावा लागेल. हे कठीण जरूर आहे व अशक्य नाही.गोव्याला वाचवायचे असेल तर हा स्वभावदोष बदलणे अपरिहार्य आहे,असेही ऍड.भेंब्रे यांनी सांगितले.सुरुवातीला समई प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.निवृत्त न्यायमूर्ती श्री.कामत यांनी स्वागत केले.श्री.केळेकर यांनी विचार मांडले. लीबिया लोबो यांनी आभार मानले.मीनाक्षी मार्टिन्स यांनी सूत्रसंचालन केले.
गोव्याचा नव्हे भारताचा सुवर्णमहोत्सव !
१५ ऑगस्ट हा जरी आपण भारत देशाचा स्वतंत्रदिन म्हणून साजरा करीत असलो तरी तो अपूर्ण आहे.गोव्याच्या मुक्तीनंतरच संपूर्ण भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यामुळे २०११ साली गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा सुवर्णमहोत्सव आहे हे केंद्राला पटवून देण्याची गरज असल्याचे मत ऍड.उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले.
Sunday, 11 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment