Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 14 October 2009

राज्यात आणखी दोन महिलांचे खून

वेर्णा, मेरशीनंतर खोर्जुवे व सुकूर येथे सापडले मृतदेह
चारपैकी तीन खून एकाच पद्धतीने!

पणजी, म्हापसा, वास्को, दि. १३ (प्रतिनिधी): क्रूरकर्मा महानंद नाईक याने केलेल्या तब्बल सोळा खुनांचे थरारक प्रकरण ताजे असतानाच, मेरशी व वेर्णानंतर खोर्जुवे आणि सुकूर येथे गेल्या अठ्ठेचाळीस तासांत चार तरुणींचे मृतदेह आढळून आल्याने राज्यात जबरदस्त खळबळ माजली आहे. यापैकी तीन तरुणींचे मृतदेह एकसारख्या पद्धतीने जाळण्यात आले असून यामागे एकाच व्यक्तीचा हात असण्याची शक्यता आहे. सुकूर येथे सापडलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. खुनी व्यक्तीने पूर्वतयारी करूनच हे खून केले असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. या मृतदेहांची अद्याप चिकित्सा करण्यात आली नसल्याने मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, या भयंकर खुनमालिकेने पोलिसांबरोबर जनतेचीही झोप उडवली आहे. त्यामुळे हे खून म्हणजे पोलिस खात्यासाठी आव्हान ठरले आहेत.
उद्या बुधवारी सकाळी "गोमेकॉती'ल डॉक्टरांचे खास पथक या या मृतदेहांची चिकित्सा करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, वेर्णा येथे काल रात्री सापडलेला "तो' मृतदेह ताळगाव येथून बेपत्ता असलेली १६ वर्षीय एविटा रॉड्रिगीस हिचा असल्याचे सिद्ध झाले आहे. आज सकाळी तिची आई सपना रॉड्रिगीस हिने मृतदेहाची ओळख पटवली.
वरील चार ठिकाणी मिळालेले महिलांचे मृतदेह एकसारख्या पद्धतीने जाळण्यात आले आहेत.
"सीरियल किलर' महानंद नाईक याच्यानंतर आता या पाच तरुणींचे मृतदेह सापडल्याने पुन्हा एकदा गोवेकरांची झोप उडाली आहे. या प्रकारामुळे राज्यात महिला किती सुरक्षित आहेत, याभोवतीच प्रश्नचिन्ह लागले आहे.
हे "सीरियल किलर'चे कृत्य असू शकते; तथापि, या खुनामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसल्याने त्याबाबत एवढ्यातच ठोस भाष्य करणे कठीण आहे, असे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काल सकाळी मेरशी येथे एका अज्ञात तरुणीचा जाळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना ताजी असताना आज सकाळी खोर्जुवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर असलेल्या एका झुडपात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचा पंचनामा करून म्हापसा पोलिस स्थानकावर पोहोचतात न पोहोचतात तोच रात्री सुकूर पर्वरी येथील एका झुडपात आणखी एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याचा दूरध्वनी आला. त्यामुळे ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी सदर मृतदेह चिकित्सेसाठी "गोमेकॉ'मध्ये पाठवून दिला.
खोर्जुवेतील 'ती' नवविवाहित?
खुर्साचीवाडी मरड खोर्जुवे येथे रस्त्यापासून ५ मीटर अंतरावर २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर पिवळा चुडीदार असून हातावर आणि पायावर मेंदी घातली आहे. त्याचप्रमाणे "आयब्रो ट्रीम' केल्या असल्याने तो नवविवाहितेचा मृतदेह असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर तरुणीच्या एका हातात दोन बांगड्या तर दुसऱ्या हातात एक बांगडी आहे. तसेच पायात चांदीचे पैंजण असून दोन्ही पायांत जोडवी असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
या तरुणीची उंची ५.२ इंच आहे. खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असून तिच्या शरीराचा काही भाग होरपळला आहे. शिवाय मृतदेहावर दोन ठिकाणी चपला सापडल्या आहेत. त्यामुळे खून करणारी व्यक्ती विकृत असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह सापडला तेथे सनफ्लॉवर ब्रॅंडची काड्यापेटी (मॅच बॉक्स) पोलिसांना सापडली आहे. यावेळी श्वान पथकाची मदत घेतली असता त्याचा फारसा फायदा झाला नाही.
सुकूर येथेही मृतदेह
दरम्यान, रात्री ७ वाजता खैरा सुकूर येथे सरकारी विद्यालयाच्या समोरील दाट झाडीत अज्ञात तरुणीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळाला. खैरे सुकूर येथे निर्जनस्थळी नेऊन सरकारी शाळेतील आवारात रक्ताचे डाग दिसत असल्याने तिचा त्याच ठिकाणी खून करून मृतदेह दाट झाडीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्र झाल्याने आणि घटनास्थळी विजेची सोय नसल्याने पोलिसांच्या तपासकामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी "गोमेकॉ'मध्ये पाठवण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपअधीक्षक सेमी तावारीस, म्हापशाचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई, उपनिरीक्षक विजय राणे घटनास्थळी दाखल झाले होते.

No comments: