दोघे गंभीर जखमी, स्फोटक होते स्कूटरीतः ग्रेस चर्च पाठीमागील घटना
मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी): सारे मडगाव आज दिवाळीच्या स्वागतात मग्न असताना व जागोजागी नरकाससुराच्या स्पर्धा रंगत असताना येथील ग्रेस चर्चच्या पाठीमागील रस्त्यावर पार्क केलेल्या एका स्कूटरमध्ये शक्तिशाली स्फोट होऊन दोघे गंभीर जखमी झाले व साऱ्या शहरभर हलकल्लोळ माजला.
रात्री ९-२५ वाजता हा स्फोट वर्दे वालावलकर रोडवर झाला व त्याचा आवाज तेथून १०० ते १२५ मी. अंतरावर नरकासूर स्पर्धा कार्यक्रमास हजर असलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत व आमदार दामू नाईक यांच्या कानावरही पडला. लगेच गडबड माजली व पोलिस फौज दाखल होऊन त्यांनी वर्देवालावलकर रोड बंद करण्यात आला. १०८ रुगणवाहिकेतून जखमींना हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले. शीघ्र कृतीदलाच्या कमांडोंना घटनास्थळी आणण्यात आले. तसेच जादा पोलिस कुमक आणून त्या रस्त्याची नाकेबंदी करण्यात आली. हॉस्पिसियोत जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना बांबोळी येथे "गोमेकॉ'त दाखल करण्यात आले.
पोलिस अधीक्षक ऍलन डिसा व उपअधीक्षक उमेश गावकर हेही तोपर्यंत हॉस्पिसियोत आले. त्यांनी केलेल्या चौकशीत जखमीची नावे योगेश नायक व मालगुंडा पाटील अशी आढळून आली. त्यांंच्या कंबरेखालच्या भागाच्या चिंधड्या उडाल्या आहेत व ते किंचाळत होते. ते मराठी बोलत होते. त्यांच्याकडे अत्तराच्या बाटल्या सापडल्या व पोलिसांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या. ते ज्या पद्धतीने जखमी झाले आहेत त्यावरून ते सदर इटर्नो स्कूटरवर बसलेले असावेत व हा स्फोट झाला असावा असा कयास आहे. स्फोटाची माहिती मिळताच मुख्यमंत्री व आमदार दामू नाईक हे कार्यक्रम अर्धवट सोडून लगेच हॉस्पिसियोत आले.
नंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत या स्फोटासंदर्भात चर्चा केली.या स्फोटाची वार्ता लगेच सर्वत्र पसरली .मडगावातील नरकासूर स्पर्धावरही त्याचा परिणाम झाला. लोकांनी स्फोट झालेल्या ठिकाणी एकच गर्दी केली. त्यामुळे रात्री उशिरा तेथे आणखी पोलिस कुमक तैनात करण्यात आली. त्याशिवाय अग्निशामकदलाची गाडी व रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र स्फोट नेमका कशाचा झाला ते शेवटपर्यंत कळू शकले नाही. पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू आहे एवढीच त्रोटक माहिती दिली. मडगावातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र घबराटीचे व त्याचबरोबर कुतूहलाचे वातावरण दिसून आले.
Saturday, 17 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment