Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 3 September 2009

दैवावर हवाला!

हैदराबाद - आंध्र प्रदेशचे 'हाय प्रोफाईल' मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी हे हैदराबादहून सकाळी ८.४५ वाजता चित्तुरसाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले आणि ९.३५ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा गृह मंत्रालयाशी असलेला संपर्क तुटला. दरम्यानच्या काळात पूर्वेकडे सुमारे ४० किलोमीटर हे हेलिकॉप्टर भरकटले व तेव्हापासून मुख्यमंत्री कोठे आहेत, हा प्रश्न सर्वांनाच सतावू लागला. या काळात केंद्र व राज्य यांच्यातील यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे ठळकपणे दिसून आले. मधूनच मुख्यमंत्री गुंटूरला आपल्या ताफ्यासह रवाना झाल्याचे सांगितले जात होते तर दिल्लीतून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांचा छडा लागलेला नाही, असे निवेदन प्रसृत केले जात होते. त्यामुळे विलक्षण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. लोकांना नेमकी माहितीच मिळत नव्हती. मुख्यमंत्र्यांना घेऊन गेलेले सात आसनी हेलिकॉप्टर "बेल-४३०' जातीचे होते. रेशनकार्ड व पाणीपुरवठाविषयक सुविधांची पाहणी करणे हा मुख्यमंत्र्यांचा चित्तुरला भेट देण्यामागील मुख्य हेतू होता. वायएसआर हे सकाळी १०.४५ वाजता चित्तुरला पोहोचणे अपेक्षित होते.
सरकारी गोंधळ
गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस या घटकांची शासकीय पातळीवर दखलच घेतली गेली नाही. दुष्काळात तेरावा महिना या उक्तीनुसार मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये सॅटेलाईट फोनची सुविधाही नव्हती. त्याबद्दल आता आंध्र प्रदेश सरकारने आपली चूक झाल्याचे मान्य केले आहे. मुख्यमंत्र्यांचा छडा लागत नसल्याचे लक्षात येताच दुपारपासूनच राजधानी हैदराबादमध्ये बेचैनी वाढू लागली. त्याचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटले. देशाच्या राजधानीत या वृत्ताने प्रचंड खळबळ उडवून दिली. कॉंग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी तातडीने याप्रश्नी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा केली. त्यानंतर देशपातळीवर यासंदर्भात जोरदार मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
घनदाट जंगल व नक्षलग्रस्त भाग
ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्या कर्नुल, गुंटूर व मेहबूबनगर या तीन जिल्ह्यांमध्ये भारतीय हवाई दलाने जोरदार शोध मोहीम हाती घेतली आहे. हा सुमारे एक हजार किलोमीटरचा इलाखा घनदाट जंगलाने व्यापला असून तेथे दिवसासुद्धा उन्हाची तिरिप पोहोचणे कठीण अशी स्थिती आहे. शिवाय हा सारा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या जंगलात प्रामुख्याने आदिवासी मंडळींची वस्ती आहे. या आदिवासींना प्रखर प्रकाशझोत टाकणारे टॉर्च स्थानिक प्रशासनाने तातडीने पुरवले आहेत. हा सारा भाग पिंजून काढणे हे मोठेच आव्हान आहे. शिवाय मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत खूपच व्यत्यय येत आहे.
सिंथेटिक रडार व सुखोईची मदत
मुख्यमंत्र्यांचा शोध घेण्याची मोहीम आता भारतीय हवाई दलाने हाती घेतली असून त्यासाठी सिंथेटिक रडाराची सुविधा असलेल्या सुखोई विमानांची मदत घेतली जात आहे. या सिंथेटिक रडारचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे धातुमय वस्तूचा छडा त्याद्वारे लावला जाऊ शकतो. मग कितीही कमजोर सिग्नल असले तरी ही शक्तिशाली यंत्रणा आपली कामगिरी फत्ते पाडतेच. या शोध मोहिमेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच हजार जवान, लष्कराचे पाचशे जवान व खास कमांडोंची मदत घेतली जात आहे. एकूण २० पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. त्याखेरीज तीन घातक कमांडोंची प्लाटून शोध मोहिमेत सहभागी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शोधासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ("इस्त्रो') मदत याकामी घेतली जात असून अमेरिकेलाही मदतीसाठी साकडे घालण्यात आले आहे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट सुविधेची मदत घेतली जात असून ही शोध मोहीम रात्रभर सुरू राहणार आहे. सात हेलिकॉप्टर्स जंगलमय भागात घिरट्या घालत असून त्यांनाही खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे.
नातेवाइकांची घालमेल
मुख्यमंत्री वायएसआर बेपत्ता झाल्याची अधिकृत घोषणा आंध्र प्रदेश सरकारने केली आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाइक धाय मोकलून रडत असून साऱ्या राज्यावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्र्यांचे भवितव्य काय, या जाणिवनेच आंध्रवासीय हैराण झाले आहेत. त्यांना दगाफटका होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी प्रार्थनासभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिल्लीतील आंध्र प्रदेशचे प्रभारी तथा केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली हे तातडीने हैदराबादला रवाना झाले आहेत. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एन. डी. तिवारी हेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अर्थात आता सर्वांचाच हवाला आहे तो निव्वळ दैवावर!

No comments: