Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 4 September 2009

मुख्यमंत्री रेड्डींसह पाचही ठार

आंध्र प्रदेशावर शोककळा, आज अंत्यसंस्कार, रोशय्या कार्यवाहू मुख्यमंत्री
हैदराबाद, दि. ३ - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्यासह बुधवारी बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कर्नूल जिल्ह्यातील नलमल्लाच्या जंगलात कोसळून त्यात श्री. रेड्डींसह ५ जण ठार झाले. मृतांमध्ये मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव पी. सुब्रमण्यम , मुख्य सुरक्षा अधिकारी ए. वेस्ले , ग्रुप कॅप्टन एस.के.भाटिया आणि सहवैमानिक एम.एस.रेड्डी यांचा समावेश आहे.
नलमल्लाच्या घनदाट जंगलातील सेराई सालेम टेकडीच्या टोकावर लष्कराच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी सकाळी एक दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर नजरेस पडले. मात्र हा जंगलातील अतिदुर्गम भाग असल्याने घटनास्थळापर्यंत पोचणे कठीण झाले होते. नंतर हवाई पॅराट्रूपर्स या हेलिकॉप्टरजवळ उतरले, त्यावेळी पाच जणांचे आगीत होरपळलेले मृतदेह सापडले. रेड्डी यांच्यासह सर्वांचे मृतदेह नंतर हैदराबाद येथे आणण्यात आले.
मुख्यमंत्री रेड्डी आपल्या कर्नूल जिल्ह्यात असलेल्या मतदारसंघात जाण्यासाठी बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता या हेलिकॉप्टरने निघाले होते . नियोजित वेळेनुसार हे हेलिकॉप्टर सकाळी १० . ४० वाजता कर्नूल इथल्या हेलिपॅडवर उतरणे अपेक्षित होते. मात्र २२ तास या हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नसल्याने चिंता वाढली होती.
दोन इंजीन असलेल्या " बेल ४३०' नावाच्या या हेलिकॉप्टरला दोन वैमानिक चालवतात. हे हेलिकॉप्टर आंध्र प्रदेश सरकारच्या मालकीचे आहे. खराब हवामानामुळे या हेलिकॉप्टरचा साडे नऊ वाजता एअर ट्रॅफिक कन्ट्रोलशी असलेला रेडिओ संपर्क तुटला. बाहेरचे वातावरण प्रचंड खराब असल्याने हेलिकॉप्टर जंगलातच उतरवत असल्याचा अखेरचा संदेश पायलटने दिला होता. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत या हेलिकॉप्टरचा संपर्क होऊ शकला नसल्याने आंध्र प्रदेशातील उच्चस्तरीय अधिकारीवर्ग तसेच राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले होते.
मुख्यमंत्र्यांच्या शोधासाठी ७ हेलिकॉप्टर आणि ५००० सीआरपीएफ जवान
हैदराबाद , बंगळूर आणि दिल्लीतून सात हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र या भागात असलेल्या अतिशय वाईट वातावरणामुळे शोधकार्यासाठी निघालेले सिकंदराबाद येथील एअर कमांड बेसवरून उड्डाण केलेले दोन हेलिकॉप्टर बुधवारी रात्री कर्नूलवरून परत आले होते. तर बंगळूर एअर कमांडचे तीन आणि नेल्लोर येथील एका खाजगी हेलिकॉप्टरने शोध घेणे सुरू होते. संरक्षण मंत्रालयाचे एक मानवविरहित विमानही शोधकार्यात सामील करण्यात आले होते. चित्तूर ते कर्नूल या हेलिकॉप्टरच्या हवाई मार्गावर जंगलादरम्यान मुख्यमंत्र्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ५००० जवान तैनात करून ते या मार्गावर हेलिकॉप्टरचा शोध घेत होते.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा मृतदेह दुपारी हैदराबादला आणण्यात आला. त्यानंतर या मृतदेहांवर पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. दिवंगत मुख्यमंत्री रेड्डी यांचा मृतदेह उद्या हैदराबादच्या लाल बहादूर शास्त्री स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी अंत्यसंस्कारासाठी पुलिवेंदूला या त्यांच्या मतदारसंघात नेण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांचे शोकप्रगटन
पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी गुरुवारी संध्याकाळी हैदराबादला पोचल्या. राजशेखर रेड्डी यांच्या निधनावर सर्व पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केले आहे. राजशेखर रेड्डी हे धडाडीचे नेते आणि व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाला जबर धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी लवकर भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी व्यक्त केली. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या महत्त्वाच्या योजना राबवण्यासाठी ते कार्यरत होते, असंही नटराजन म्हणाल्या.
रेड्डी यांच्या मृत्यूवर डाव्या पक्षांनीही शोक व्यक्त केला आहे. ' ही घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अशी आहे. रेड्डी हे लोकप्रिय नेते होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये त्यांची लोकप्रियता स्थापित झाली होती. देशाचे राजकारण प्रभावित करण्याची त्यांच्यात क्षमता आलेली असताना मृत्यू येणे ही दुर्दैवी घटना आहे.' अशी प्रतिक्रिया सीपीएमचे पॉलिट ब्यूरो सदस्य सीताराम येचुरी यांनी व्यक्त केली. भूमिपुत्र असलेल्या रेड्डींच्या मृत्यूने देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या विकासाबाबत त्यांना विशेष कळवळा होता, अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिली.
रोशय्या कार्यवाहू मुख्यमंत्री
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे आंध्र प्रदेशचे कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचे अर्थमंत्री के. रोशय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. के. रोशय्या हे आंध्र प्रदेश कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
जळलेले हेलिकॉप्टर,
होरपळलेले मृतदेह...
बुधवारी सकाळी बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर अखेर जळलेल्या आणि तुकडे-तुकडे झालेल्या अवस्थेत कर्नूलजवळच्या नल्लामालाच्या घनदाट जंगलातील डोंगर माथ्यावर सापडले आणि आंध ्रप्रदेशात शोककळा पसरली.
प्रचंड पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत या बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध लागू शकला नव्हता. गुरुवारी सकाळी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी परत शोधमोहीम सुरू केली. सकाळी ८.३० वाजता या शोधपथकाला जंगलातील एका उंच डोंगरमाथ्यावर छिन्नविछिन्न झालेले हेलिकॉप्टर दिसले. त्यांनी तिथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र या दुर्गम भागात हवाई दलाच्या वैमानिकाला हेलिकॉप्टर उतरविणे अशक्य झाले होते.
त्यानंतर हवाई दलाचे पॅराशुटर्स घेऊन दुसरे हेलिकॉप्टर कर्नूलवरून जंगलात रवाना झाले. या हेलिकॉप्टरमधील पॅराशुटर्स उड्या टाकून घटनास्थळी उतरले. खाली उतरल्यानंतर त्यांना तुकड्यातुकड्यांमध्ये विखुरलेले हेलिकॉप्टर व आगीत होरपळलेले मृतदेह दिसले. हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांसह पाचही जण जळून ठार झाले होते. तीन मृतदेह हेलिकॉप्टरच्या मलब्यात अडकलेले होते. चौथा मृतदेह घटनास्थळापासून लांब पडलेला आढळला. तर पाचवा मृतदेह खूपच लांब फेकला गेल्याने त्याचा शोध घ्यायला हवाई पॅराट्रूपर्सना थोडा वेळ लागला.

No comments: