
मडगाव येथील प्रचारसभेत बोलताना सोनिया गांधी. अपेक्षेपेक्षा कमी लोक उपस्थित असल्याने अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.
मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी) : कॉंग्रेसने नेहमीच गोव्याच्या प्रश्र्नांना सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे व यापुढेही दिले जाईल, असे आश्र्वासन देतानाच "सीआरझेड' व राज्याला खास दर्जा देण्याच्या मागणीचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची ग्वाही कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज येथील फातोर्डा सराव मैदानावर आयोजित कॉंग्रेसच्या प्रचार सभेत बोलताना दिली.
"सीआरझेड'मुळे सर्वसामान्यांसमोर महासंकट उद्भवल्याची कल्पना सरकारला आहे, त्यांच्या हितरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजले जातील. येथील जनता पर्यावरणाच्या जतनाबद्दल किती दक्ष आहे त्याचे प्रत्यंतर सेझविरोधी चळवळीतून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सेझ रद्द करण्याचा प्रस्ताव आणला तेव्हा कॉंग्रेसने तो तत्परतेने उचलून धरला असे सांगून अशा प्रकारच्या दक्षतेबद्दल त्यांनी गोमंतकीयांचे अभिनंदन केले. भविष्यातही ही जागरूकता कायम ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. गोमंतकीयांच्या आशा आकांक्षांचा कॉंग्रेस पक्ष सदैव आदरच करत आला आहे. जनमत कौल, वेगळा प्रदेश, कोकणीला घटनेची मान्यता, राजभाषा व घटकराज्य आदी मागण्यांची पूर्ती कॉंग्रेसनेच केल्याचे त्यांनी सांगितले.
आपण दोन वर्षांपूर्वी केलेल्या आवाहनाला गोमंतकीयांनी मान दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले व येत्या निवडणुकीतही ती जागरूकता कायम ठेवण्याचा सल्ला दिला. बेरोजगारी दूर करण्यापासून ते महिलांना पंचायतीत आरक्षण देण्यापर्यंत कॉंग्रेसने बजावलेल्या कामगिरीचा त्यांनी आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात आढावा घेतला. सरकारला विविध आघाड्यांवर काम करण्यास भाजपच अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशासमोरील मुख्य प्रश्र्न दहशतवाद व जातीयवाद असल्याचे त्यांनी नमूद केले. दहशतवादाशी मुकाबला करण्याचे काम सुरक्षा दल करत आहेत पण जातीयवादाचे विष मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपच पसरवत असल्याचा आरोप केला. याचा फटका सर्व आघाड्यांवर बसतो व प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. दहशतवादाइतकीच ही भयंकर स्थिती असून ती दूर करण्यासाठी भक्कम व स्थिर सरकाराची गरज आहे, ती क्षमता फक्त कॉंग्रेसपाशीच आहे.
कॉंग्रेसच्या आजवरच्या सिद्धींचा आढावा घेताना सर्व राजकीय पक्षांत कोण उजवे आहे ते ठरवण्याचे काम लोकांवरच सोपवले. त्या म्हणाल्या की कॉंग्रेसला एक संस्कृती आहे, परंपरा आहे जी इतर पक्षांत ते नाही. कॉंग्रेस नेत्यांनी देशासाठी दिलेल्या आत्मबलिदानाचाही त्यांनी उल्लेख केला व अन्य पक्षांत तसे कोणी आहेत का, असा सवाल केला.
प्रथम प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर सोनिया गांधी व्यतिरिक्त मुख्यमंत्री, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, डॉ. विल्फ्रेड डिसोझा व बी. के. हरिप्रसाद होते. शेवटी कॉंग्रेस उमेदवार फ्रान्सिस्क सार्दिन यांनाही व्यासपीठावर आणण्यात आले. सभेला मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार आग्नेल फर्नांडिस वगळता बहुतेक सर्व कॉंग्रेस मंत्री व आमदार हजर होते. यात माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो व माजी मंत्री रमाकांत खलप यांचाही समावेश होता.
मुख्यमंत्र्यांसमवेत सोनिया गांधींचे दाबोेळीहून हेलिकॉप्टरने आगमन झाले व सभा आटोपल्यानंतर तेच हेलिकॉप्टर दाबोळीकडे रवाना झाले.
-------------------------------------------------------------------
फ्रान्सिस्क सार्दिन यांची कुचंबणा!
आज फातोर्डा मैदानावर आयोजित प्रचार सभेत कॉंग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार फ्रान्सिस्क सार्दिन यांची भलतीच कुचंबणा झाली. या घटनेमागे कॉंग्रेसमधील काही शक्तींचा हात आहे व त्यांनी हा प्रकार मुद्दा जाणून बुजून घडवून आणल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी दिली.
या सभेसाठी घातलेल्या उंच व्यासपीठावर वास्तविक इतरांबरोबरच या सभेचे उत्सवमूर्ती असलेले सार्दिन यांना स्थान असायला हवे होते. त्यानुसार ते सोनिया गांधी व इतरांबरोबर तेथे निघालेही होते पण त्यांना व्यासपीठाच्या पायऱ्यांजवळच अडवण्यात आले. यामुळे ते बेचैन होऊन परत फिरले व आपले हात वर करून त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. खास प्रेक्षक वर्गाकडे जाऊन येरझाऱ्या टाकणाऱ्या सार्दिन यांची मनःस्थिती नेमकी लुईझीन फालेरो यांनी ओळखली व त्यांची समजूत घातली. यानंतर स्वतः दोन खुर्च्या आणून त्यावर बसण्याचा सार्दिन यांना आग्रह केला. पण सार्दिन यांची अस्वस्थता कायम होती. दोन - तीनवेळा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला खरा त्यांचा आवाज मात्र पोचला नाही. मुख्यमंत्री बोलण्यासाठी उठले व सार्दिन खुर्चीवर बसले पण त्यांच्या मनांतील चुळबुळ दुरूनही जाणवत होती.
अखेर मुख्यमंत्री बसले व मॅडमचे भाषण सुरू झाले. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील तणाव कमी झाल्याचे पाहून लुईझीन यांनी मोबाईलवरून सार्दिनप्रति घडलेला प्रकार कळवल्यानंतर त्यांनी सार्दिन यांना वर बोलावून घेतले. परंतु, तेथे खुर्ची रिकामी नसल्याने उभे राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.
दुसरी नोंद घेण्याची बाब म्हणजे ही सभा कॉंग्रेसच्या प्रचाराची असताना कुठेच सार्दिन यांच्या प्रचाराचा फलक आढळला नाही की कुठल्याही वक्त्यांनी, खुद्द सोनिया गांधी यांनी देखील त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हा सर्व योगायोग की ते जाणीवपूर्वक घडले याबाबत दबक्या आवाजात चर्चा मात्र झाली.
No comments:
Post a Comment