Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 17 March 2009

कचराप्रश्नी तोडगा काढा; अन्यथा गंभीर परिणाम

सात पालिकांना खंडपीठाने फटकारले

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - कचराप्रश्नी तोडगा काढण्यास अनेकदा मुदतवाढ देऊनही राज्यातील सात नगरपालिकांनी योग्य तो तोडगा न काढल्याने त्यांना त्यासाठी येत्या सोमवारपर्यंत (२३ मार्च) अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीतही संबंधित पालिकांनी तोडगा न काढल्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दिला.
यात कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, सांगे, वाळपई, पेडणे, केपे व साखळी अशा सात पालिकांचा समावेश असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन का होत नाही याविषयी पुढील सुनावणीवेळी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तसे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. तीनदा या पालिकांची पाहणी करण्यात आली असता दरवेळी त्यांच्याकडून न्यायालयीन आदेशांचे पूर्ण पालन झाले नसल्याचेच आढळून आल्याचे या खटल्यात न्यायालयाला सहकार्य करणाऱ्या वकील (ऍम्युकस क्युरी) नॉर्मा आल्वारिस यांनी स्पष्ट केले.
कुडचडे-काकोडा पालिका परिसरात रोज २ टन न कुजणारा तर, ४ टन कुजणारा कचरा तयार होतो. या कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो खरंगटे घाट भागात टाकण्यात आला असून पाहणीवेळी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा काही भाग जळत असल्याचे दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच आवश्यक असलेल्या कचरा विल्हेवाट केंद्राची बांधणीही करण्यात आली नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
सांगे पालिकेत दिवसाला कुजणारा व न कुजणारा असा २ टन कचरा गोळा होतो. त्यापैकी न कुजणारा कचरा एका खाजगी जागेत टाकण्यात येतो. प्लॅस्टिक कचरा पालिकेच्या मागील बाजूस टाकला जातो. कचरा विल्हेवाट केंद्रे अपुरी आहेत. अजून कचरा विल्हेवाट केंद्राची बांधणी करण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. वाळपई पालिका जागा ताब्यात न घेता नाणूस येथे कचरा टाकत आहे. प्लॅस्टिक कचरा एका पिशवीत भरून उद्यानात ठेवल्याचे आढळून आले आहे. नाणूस येथे एका खाजगी जागेत कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली.
कुंकळ्ळी पालिका परिसरात कुजणाऱ्या व न कुजणाऱ्या अशा ५ टन कचऱ्याची निर्मिती रोज होते. पांझरखण येथे या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. पांझरखण येथे कचरा विल्हेवाट केंद्रांची बांधणी करण्यात आली नसून या केंद्रांच्या उभारणीची गरज असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पेडणे पालिका क्षेत्रात कचरा सडण्यासाठी बांधलेले अनेक विभाग वापराविना असल्याचे आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. केपे पालिका क्षेत्रात कुजणारा व न कुजणारा असा ८ टन कचरा रोज गोळा होतो. तेथे व साखळी पालिका क्षेत्रातही कचरा विल्हेवाट केंद्रांची संख्या अपुरी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

No comments: