Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 9 June 2008

'गेटस् १०२' च्या जागी आता 'नमस्ते-१०८'

भाजप सरकारच्या काळातील यशस्वी योजना मोडीत
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली व अत्यंत यशस्वी ठरलेली "गेट्स-१०२' रुग्णवाहिका सेवा रद्द करून तिचे विलीनीकरण "नमस्ते-१०८' सेवेत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मनोहर पर्रीकर सरकारच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजनांना सुरूंग लावण्याचे काम सध्या विद्यमान सरकारने चालवले असून "गेटस १०२" ची इतिश्री हा त्याचे ताजे उदाहरण होय. पर्रीकर सरकार गेल्यानंतर इतर अनेक योजनांप्रमाणे "गेट्स १०२' ची योजनाही हळूहळू थंडावत गेली व गेल्या काही महिन्यांपासून ती पूर्णपणे विस्कळित झाली होती.
सरकारने "इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेशी करार करून रस्ता अपघात किंवा इतर आरोग्य विषयक तात्काळ सेवा बहाल करण्यासाठी "गोमेकॉ' व आरोग्य संचालनालयाच्या मदतीने ही नवी योजना राबवली असल्याचे तसेच तिचा शुभारंभ येत्या १५ ऑगस्ट रोजी केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्य सचिव जे. पी. सिंग या प्रसंगी उपस्थित होते. "गोवा इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट' ही संस्था स्थापन करून तिचा विभाग "गोमेकॉ' किंवा नर्सिंग कॉलेज इमारतीत स्थापन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व यंत्रणांनी सज्ज अशा २१ रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील. "पीपीपी'पद्धतीवर राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अकराही तालुक्यांना प्रत्येकी १ रुग्णवाहिका सेवेसाठी दिली जाईल व उर्वरित रुग्णवाहिका राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तैनात केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षासाठी सुमारे १०.२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत केंद्र सरकारनेही या योजनेच्या कार्यवाहीसाठी आर्थिक साहाय्य देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.
ही योजना राबवण्यासाठी आरोग्य सचिवांच्या नेतृत्वाखाली खास समिती नेमण्यात येणार आहे. योजनेची कार्यवाही ही संस्था करणार असली तरी सर्व यंत्रणेची मालकी सरकारची राहणार आहे. या संस्थेतर्फे विविध ठिकाणी "कॉल सेंटर' उभारली जातील व आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी फोन आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोचून संकटग्रस्तांना इस्पितळात नेण्याची जबाबदारी ही संस्था पार पाडेल. सर्व अद्ययावत यंत्रणांनी सज्ज रुग्णवाहिकेत तातडीच्या सेवेचे खास प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ मंडळी असतील. अपघातग्रस्त किंवा ह्रदयविकार, गरोदरपण किंवा इतर तातडीच्या समयी इस्पितळात पोहोचेपर्यंतचे प्राथमिक उपचार देण्याची सोय या रुग्णवाहिकेत असेल, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
"मेडीक्लेम' योजनेअंतर्गत सरकारशी संलग्न खाजगी इस्पितळांकडेही करार करून अशा तातडीच्या वेळी रुग्णांना सेवा बहाल करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले. रस्ता अपघात किंवा इतर आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या समयी इस्पितळात योग्य वेळी पोहचल्यास जीव वाचवता येणे शक्य असल्याने या सेवेव्दारे नेमकी हीच गोष्ट साध्य केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"इएमआरआय' ही संस्था सत्यम् कॉंप्युटर्सचे संस्थापक बी. आर. रामलिंग व त्यांचे बंधू यांनी स्थापन केली आहे. "सेवाभावी ("नॉन प्राफीट') तत्त्वावर ही संस्था काम करीत आहे. या संस्थेतर्फे सध्या गुजरात, आंध्र प्रदेश व उत्तराखंडात मिळून ६५२ रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य, पोलिस व अग्निदुर्घटना प्रकरणी तात्काळ सेवा देण्याचे काम या रुग्णवाहिकांकडून केले जाते. येत्या जुलै २००८ पर्यंत सुमारे २०० दशलक्ष लोकांच्या सेवेसाठी २ हजार रुग्णवाहिका पुरवण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.

No comments: