पणजी, दि. 2 (प्रतिनिधी)ः सत्तरीतील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ समाजकार्यकर्ते, धडाडीचे ग्रामीण पत्रकार सदानंद ऊर्फ भाई तेंडूलकर (६५) यांचे काल रात्री अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
काल संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने साखळी येथील सरकारी कुटीर इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना तीव्र ह्रदयाचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दै. "गोवादूत" चे सत्तरी प्रतिनिधी म्हणून काम करणारे भाई तेंडुलकर यांचे संपूर्ण कुटुंब गोवा मुक्तीलढ्यात सक्रिय होते. आपल्या नावाप्रमाणे सदा आनंदीत राहणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे जणू चैतन्यच होते. कोकणी भाषा चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. सत्तरी तालुक्यात कोकणी भाषेची चळवळ उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात होते. कृषी व सामाजिक विषयांवर मराठी व कोकणी भाषेत सातत्यपूर्ण लेखणी ही त्यांची ओळख होती. सुरुवातीस दै. "नवप्रभा" त्यानंतर "गोवादूत" व कोकणी दैनिक "सुनापरांत" यातून ते पत्रकारिता करीत होते. एक धडाडीचे ग्रामीण पत्रकार व स्तंभ लेखक म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. सत्तरी तालुक्याची इंत्यभूत माहिती त्यांच्या तोंडावर जणू खेळत होती. सत्तरीतील लोकांच्या समस्या व येथील शेतकऱ्यांच्या अडचणी वृत्तपत्रांतून मांडण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. गरजू लोकांची अडलेली कामे करून देणे व अशिक्षित व पिडीत लोकांना सरकारी कार्यालयात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवणे यासाठी ते नेहमीच तत्पर होते.
पिसुर्ले पंचायतीचे माजी सरपंच, गोवा बागायतदाराचे माजी संचालक, कुडाळदेशकर मंडळाचे माजी अध्यक्ष अशा अनेक संघटनावर त्यांनी सक्रियपणे काम केले आहे. १९८० साली त्यांनी मगोपच्या तिकिटावर सत्तरीतून प्रतापसिंग राणे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती.
भाई तेंडूलकरांच्या निधनाची बातमी कळताच सत्तरीसह राज्यातील अनेक लोकांनी "गोवादूत"शी संपर्क साधून या वृत्तासंबंधी चौकशी केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुहासिनी तेंडुलकर, पुत्र संजय तेंडूलकर (शांतादुर्गा उच्च माध्यमिक, डिचोली, शिक्षक ) सून दया तेंडुलकर व नातू शुभम तेंडुलकर असे त्यांचे कुटुंबीय आहे. त्यांची मुलगी तथा धडाडीच्या समाजकार्यकर्त्या शांती तेंडुलकर यांचे दीड वर्षापूर्वीच अपघाती निधन झाले होते.
भाई तेंडुलकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी खोडये सत्तरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Saturday, 2 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment