Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 30 January 2008

अवजड वाहनांना वेगनियंत्रक सक्तीचा

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - संपूर्ण देशभरात तसेच गोव्यात १ फेब्रुवारीपासून वेग नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) लागू करण्यात येणार असून अखिल गोवा बस मालक संघटनेने व उत्तर गोवा ट्रक मालक संघटनेने या योजनेस विरोध दर्शविला आहे. आज सायंकाळी वाहतूक मंत्री पांडुरंग मडकईकर यांची भेट घेऊन दोन्ही संघटनेच्या अध्यक्षांनी आपली बाजू मांडली. यावेळी गोव्यात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी सरकारने बस, ट्रक, टॅंकर तसेच अन्य अवजड वाहनांना "स्पीड गव्हर्नर' यावेळी सांगितले. यामुळे सकाळ व सायंकाळच्यावेळी खाजगी प्रवासी बसेसची लागणारी जीवघेणी शर्यत थांबणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
परंतु गोव्यात होणारे अपघात हे खराब रस्त्यामुळे होत असल्याचे मत ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष साल्वादोर यांनी व्यक्त केले. फक्त ६० कि.मी. वेगानेच वाहन हाकावे लागणार असल्याने डिझेलही जास्त लागणार असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. रेती व खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना याचा फटका जास्त बसणार असल्याने त्यांचे बॅंकेचे हप्ते भरण्यासही कठीण होणार असल्याचे ते म्हणाले.
स्पीड गव्हर्नरमुळे प्रवाशांना नुकसान होणार नसेल तर बस मालक संघटनेची कोणतीही हरकत नसल्याचे बस मालक संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक म्हणाले. परंतु सरकारने वाहनांची गती आटोक्यात ठेवण्यासाठी लागणारे यंत्र घेण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी श्री. नाईक यांनी यावेळी दिली. हे यंत्र घेण्यासाठी १५ हजार रुपये खर्च असल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments: