तिस्क-उसगाव,दि. २९ (प्रतिनिधी)- उसगाव- गांजे पंचायत क्षेत्रातीलबोंडला अभयारण्यातील बागेत असलेल्या तीन देवतांच्या मूर्तीचे अज्ञात व्यक्तीने २४ जानेवारी रोजी रात्री विद्रुपीकरण केले आहे. यासंबंधी विभागीय वन अधिकाऱ्यांनी फोंडा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे, मात्र कारवाई काहीच झालेली नाही,अशी माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी दिली. या घटनेमुळे या भागात संताप व्यक्त होत आहे.
उद्या ३० जानेवारी रोजी सकाळी वन खात्याचे सचिव व राज्य वनसंवर्धन अधिकारी बोंडला अभयारण्याला भेट देणार आहेत. तेव्हा ते या घटनेची पाहणी करणार आहेत. हिंदू जनजागृती समितीही या घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली.
उसगाव वड येथून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंडला अभयारण्यातील फुलांच्या बागेत असलेल्या प्राचीन श्री वेताळ बेताळ आणि श्री गजांन्त लक्ष्मी या तीन मूर्तीचे गुरुवार २४ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने विद्रुपीकरण केले आहे.या दिवशी हे अभयारण्य पर्यटकांना बंद असते. शुक्रवार २५ जानेवारी रोजी सकाळी त्या देवतांच्या देवळीत स्वच्छता व पुजा करायला आलेल्या बागेतील माळ्यांना तीन देवतांच्या मूर्तीचे विद्रुपीकरण केल्याचे आढळून आले. त्यांनी याची त्वरित माहिती बोंडला वन अधिकारी धाराजीत नाईक यांना दिली. बोंडला वन अधिकाऱ्यांनी या संदर्भात विभागीय वन अधिकारी प्रदीप वेरेकर यांना माहिती दिली. विभागीय वन अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात फोंडा पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांना दूरध्वनीवरून तक्रार केली.या दिवशी सायंकाळी तिस्क उसगाव पोलीस चौकीचे हवालदार श्री. फर्नांडिस व एक पोलीस शिपाई बोंडला अभयारण्यात आले. त्यांनी त्या तीन देवतांच्या विद्रुपीकरण घटनेचा पंचनामा केला.परंतु पुढील काहीच कारवाई करण्यात आली नाही.
त्या तीन देवतांची अभयारण्यातील माळी ,कामगार नित्य पुजा करीत असे. तिथे निरांजन लावले जायचे.आपल्या तीन देवतांचे विद्रुपीकरण केल्याचे पाहून तिथे काम करणारे कामगार,कर्मचारी, व ग्रामस्थ फार दुःखी झाले आहेत. संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
बोंडला अभयारण्यातील बागेत असलेल्या तीन देवतांच्या मूर्तीचे विद्रुपीकरण केल्या संदर्भात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.तपास करणे हे पोलिसांचे काम आहे, असे विभागीय वन अधिकारी प्रदीप वेरेकर यांनी दूरध्वनीवरून आज सकाळी बोलताना सांगितले.
त्या घटनेसंदर्भात तक्रार पोलिसात करण्यात आलेली नाही. त्या तीन देवतांच्या मूर्तीची पूजा केली जात नव्हती, असे फोंडा पोलीस निरीक्षक मंजूनाथ देसाई हे दूरध्वनीवरून बोलताना म्हणाले. फोंडा पोलीस अधिकारी म्हणतात की त्या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही, तर वन अधिकारी म्हणतात की या घटनेची तक्रार केली आहे.
हिंदूंच्या देवतांवर हल्ले केलेल्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याबद्दल या भागातील हिंदू धर्माभिमानी ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे.
बोंडला अभयारण्यातील बागेत असलेल्या गजान्त लक्ष्मी मूर्तीचा चेहरा,छाती, हात,पाय यांचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. वेताळ मूर्तीचा एक हात तोडण्यात आला आहे. चेहऱ्यावर घाव घालण्यात आले आहेत. डोळे विद्रूप करण्यात आले आहेत. बेताळ मूर्तीचा चेहरा विद्रुपीकरण करण्यात आला आहे.
हिंदू समितीकडून निषेध
हिंदूंनो, स्वतःच्या मंदिराचे रक्षण करण्यासाठी आता तरी सज्ज व्हा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोळंकी यांनी केले आहे.
उसगाव गांजे पंचायत क्षेत्रातील बोंडला अभयारण्यातील बागेत असलेल्या श्री वेताळ, श्री बेताळ व श्री गजान्त लक्ष्मी या मूर्तींची तोडफोड केल्याच्या घटनेचा व मंदिरांना संरक्षण पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या गोवा सरकारचा हिंदू जनजागृती समिती तीव्र निषेध करत आहे. हिंदूंनी ही घटना म्हणजे धोक्याचा इशारा समजून स्वतःचे मंदिर, हिंदू धर्म व हिंदू बांधव यांच्या रक्षणासाठी सज्ज व्हायला पाहिजे,कारण पोलिसांनी या पूर्वीच मंदिरांच्या संरक्षणासंबंधी हतबलता जाहीररीत्या व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदूमध्ये धर्माभिमान जागृत करणे, हिंदू संघटन करणे तसेच धर्मावरील आक्रमणांना प्रतिवाद करण्यासाठी हिंदूंनो प्रेरित करणे या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन करत आहेत. वरील घटनेवरून हिंदू धर्मजागृती सभेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येत आहे. हिंदू जनजागृती समितीने १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता फर्मागुडी येथे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. हिंदू धर्म जागृती सभा यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकात करण्यात आले आहे.
Wednesday, 30 January 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment