फुटपाथवर सुलभ शौचालयाचे बांधकाम
पणजी महानगर पालिकेचा अजब कारभार
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)- पणजी कांपाल येथे भर फुटपाथवर महानगरपालिकेतर्फे सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू असल्याने येथील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सध्या पणजीत सार्वजनिक - खाजगी तत्त्वावर सुलभ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. पणजी फेरीबोट धक्क्यावर बांधलेल्या शौचालयाप्रमाणे कांपाल मैदानाला टेकून शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे समोरील फुटपाथचा अर्धा भाग व्यापला असून फुटपाथवरून चालत जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होत आहे. फुटपाथवर अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करणाऱ्या महापालिकेकडूनच अतिक्रमण कसे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर बांधकामाच्या दोन्ही बाजूला झाडे असल्याने ती वाचवण्यासाठी फुटपाथचा थोडा भाग वापरल्याचा खुलासा केला. हे बांधकाम "पीपीपी" तत्त्वावर सुरू असून त्यासाठी जाहिरात फलक लावण्यासाठी ही जागा वापरात आणल्याचे ते म्हणाले. शेजारील झाडांना हात लावल्यास पर्यावरणवाद्यांचा रोष पत्करावा लागणार असल्याने थोडा फुटपाथचाच भाग वापरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून पादचाऱ्यांना काहीही त्रास होणार नाही, असे टोनी यांनी सांगितले.
Tuesday, 29 January 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment