कोळंब खाणी विरूध्द राजधानीत धडक
पोलिस सतावणुकीचा निषेधः राज्यपालांपाशी साकडे
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - कोळंब सांगे येथील हिरालाल कुडीदास यांची खाण स्थानिकांनी बंद पाडल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांची सतावणूक सुरू केल्याचा आरोप करून गावडा, कुणबी, वेळीप व धनगर समाजाच्या महासंघाने आज पणजीत मूक मोर्चा काढून कोळंब ग्रामस्थांना आपला पाठिंबा दर्शविला. मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष दुर्गादास गावकर यांनी केले व त्यात सांगे, केपे व कोळंब गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
मोर्चा नंतर सायंकाळी मोर्चेवाल्यांनी पणजीतील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले राज्यपाल ए.सी.जमीर यांची त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली. "" या सरकारकडून आम्हां शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू'' असे भावनाविवश होऊन या मोर्चात सहभागी झालेल्या श्रीमती. एस्पू फर्नांडिस या महिलेने त्यांना सांगितले.
२१ जानेवारी रोजी सरकारी यंत्रणेला इशारा देऊनही खाण बंद न केल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वरील खाण बंद पाडली होती.त्यासाठी त्यावेळी "गाकुवेद'ने पुढाकार घेतला होता. परंतु आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांवर तक्रार नोंदवून प्रत्येकाची पोलिस सतावणूक करीत असल्याचे गावकर यांनी यावेळी सांगितले. रामा वेळीप या शेतकऱ्याला रात्री अपरात्री शोधण्यासाठी ते घरी जात असतात ,ते म्हणाले. कोळंब गावातील या खाणी बंद न झाल्यास येत्या काही वर्षात कोळंब गाव गोव्याच्या नकाशावरून नष्ट होणार असल्याची भितीही त्यांनी व्यक्त केली.
कोळंब गावचे संपूर्ण क्षेत्रफळ १९२९ हेक्टर आहे. तर त्यातील १५१० हेक्टर जमिनीवर तब्बल २२ खाणींचे साम्राज्य आहे. या उरल्या सुरल्या जागेत या गावातील शेतकरी शेती करून आपले कुटुंब चालवत आहेत. यातील बऱ्याच खाणी बेकायदेशीर असल्याने त्या त्वरित बंद पाडण्याची मागणी गावकर यांनी केली . या खाणींमुळे गावातील शेती तसेच पाण्याचे स्त्रोत नष्ट झाले आहेत. शेती हाच गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. तेाही नष्ट झाल्यास त्यांच्यांवर उपास मारीची वेळ येणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सरकारातील मंत्रीच या खाण व्यवसायात गुंतल्याने दाद कुठे मागावी, असा गंभीर प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. २५ मीटरावर विद्यालय व चर्च असूनही एक मंत्री त्याठिकाणी खाण सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे व त्याची प्रक्रियाही सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. या खाणीवर सुरुंग लावून स्फोट केले जात असून त्यामुळे गावातील अनेकांच्या घराला तडे गेलेले आहेत. त्याचप्रमाणे खाणीवर दिवसरात्र कर्कश आवाज करणारी यंत्रे सुरू असल्याने मुलांना अभ्यास करता येत नसल्याचे देवकी काटू वेळीप हिने सांगितले. या खाणी बंद पाडून गावातील शेतकऱ्यांना न्याय द्या, हीच मागणी या ग्रामस्थांची आहे.
Tuesday, 29 January 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment