"जमीर हटाव, गोवा बचाव"
भाजपचे राज्यव्यापी आंदोलन आजपासून
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षातर्फे उद्या १ फेब्रुवारीपासून "जमीर हटाव, गोवा बचाव" आंदोलनाला सुरुवात होणार आहे. राज्यपाल एस. सी. जमीर यांची पक्षपाती भूमिका व त्यांच्यावर होणारा अवाजवी खर्च यावरून त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी या राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यांना दिल्लीत माघारी बोलवण्याची मागणी करण्यात येणार आहे. पणजी येथील सभेत अन्य नेत्यांसमवेत नामवंत गायिका हेमा सरदेसाई उपस्थित राहणार आहेत.
१ ते १७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या आंदोलनात भाजप युवा मोर्चासह, महिला मोर्चा तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात पक्षाचे केंद्रीय नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता पक्षाकडून देण्यात आली आहे. उद्या सकाळी १० वाजता म्हापसा बाजारात पहिली सभा होणार आहे. त्याचवेळी वाळपई बसस्थानकावरही सभा होईल. संध्याकाळी ४.३० वाजता मोले बाजार, सांगे बसस्थानक, संध्याकाळी ५ वाजता अस्नोडा बसस्थानक, ५.३० वाजता मधलामाज मांद्रे, बोक द वॉक पणजी, माशेल बाजार, सडा वास्को, ६ वाजता पर्वरी बाजार, डिचोली नवे बसस्थानक, केपे बसस्थानक, फातोर्डा, ६.३० वाजता शिवोली जंक्शन, सांव पॉल बाजार आदी ठिकाणी बैठका होतील.
२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होंडा तिस्क, संध्याकाळी ४ वाजता पैंगिण, ४.३० वाजता डोंगरी तिठो, मंडूर, पिंपळकट्टा मडगाव, ५ वाजता साळगाव, शिरोडा बाजार, बेती फेरी धक्का, घानो-करंझाळ, मडकई, जुवारीनगर पेट्रोल पंप, ६ वाजता चावडी काणकोण, गांधी चौक, जुने गोवे, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कुडचडे रेल्वे स्थानक, संध्याकाळी ५.३० वाजता केळबाई मंदिर, मये, ६ वाजता मेरशी बाजार, ६.३० नागझर धारगळ, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता नावेली हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुढील कार्यक्रम आखणी पक्षातर्फे सुरू आहे. देशाच्या घटनेची बूज राखण्याची जबाबदारी सोडून राज्यपाल एस. सी. जमीर उघडपणे कॉंग्रेसचे दलाल म्हणून वावरत असल्याने ते उपस्थित राहणार असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचेही भाजप युवा मोर्चातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनामार्फत होणाऱ्या बैठक व सभेत प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर आदी नेते सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून सह्यांची मोहीमही हाती घेतली जाणार आहे.
Friday, 1 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment