Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 27 April 2010

भोम अपघातात अनेक जखमी

भोम येथे ट्रकची मिनिबसला धडक
फोंडा, दि. २६ (प्रतिनिधी): पणजी ते फोंडा महामार्गावरील भोम पंचायतीजवळील धोकादायक वळणावर आज संध्याकाळी पावणेचारच्या सुमारास प्रवासी मिनिबस (जीए ०१ टी ७२५४) आणि मालवाहू ट्रक (एम.पी. ०७ केबी १७७६) यांच्यात झालेल्या अपघातात मिनिबसच्या चालकासमवेत बारा ते पंधरा जण जखमी झाले आहेत.
या अपघातात मिनिबसचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे फोंडा ते पणजी महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास खोळंबून पडली.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी मिनिबस पणजी येथून फोंड्याला येत होती. तर मालवाहू ट्रक कुंडई येथून बाणस्तारीला जात होता. भोम येथील पंचायतीजवळील धोकादायक वळणावर मालवाहू ट्रकने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मिनिबसला जोरदार धडक दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालवाहू ट्रकची जोरदार धडक बसल्याने प्रवासी मिनिबसचा चालक केबिनमध्ये अडकून पडला. फोंडा अग्निशामक दल, फोंडा पोलिस व ग्रामस्थांनी केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला केबिनमधून बाहेर काढून इस्पितळात दाखल केले. या अपघातात मिनिबसचा क्लीनरही जखमी झाला आहे. त्याचबरोबर मिनी बसमधील बऱ्याच सीट उखडल्या गेल्याने बरेच प्रवासीही जखमी झाले आहेत. यात लहान मुलांचा समावेशही आहे. जखमींना १०८ रुग्णवाहिका व खासगी वाहनांतून वैद्यकीय उपचारांसाठी इस्पितळात नेण्यात आले. मात्र जखमींबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडे उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. जखमी मिनी बसच्या चालकाचे नावही पोलिसांना समजू शकले नव्हते.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले. ट्रकचा क्लीनर मात्र संतप्त लोकांच्या हातात सापडला. त्याला लोकांनी मारहाण केली. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी पंचनामा केला आहे.

आठवीतील मुलाची पर्रा येथे आत्महत्या

म्हापसा दि. २६ (प्रतिनिधी): आठवीच्या परीक्षेत नापास झाला म्हणून सालीसवाडा - पर्रा, म्हापसा येथील सोळा वर्षीय वॉल्टर मार्टिन्स या मुलाने घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा हृदयद्रावक प्रकार आज घडला.
आज दुपारी पोस्टमनने वॉल्टर याचे प्रगतिपुस्तक (रिझल्ट) आणून दिले. आठवीच्या परीक्षेत आपण नापास झालो हे त्याला सहन न झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा कयास आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी वॉल्टरचे वडील विन्सेंट आणि त्यांची पत्नी पाहुण्याला आणायला वास्को येथे विमानतळावर गेली होती तर वॉल्टरच्या एका भावाची परीक्षा सुरू असल्याने त्याचा मोठा भाऊ त्याला सोडण्यासाठी गेला होता. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन वॉल्टरने छताच्या पंख्याला नायलॉन दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. सुमारे चार वाजता विन्सेंट आणि त्यांची पत्नी घरात आली असता सदर प्रकार त्यांच्या नजरेस आला. शेजाऱ्यांनी त्वरित पोलिसांना पाचारण केले. उपनिरीक्षक ब्रॅंडन डिसोझा आणि पथकाने घटनास्थळी पाहणी करून प्रेत खाली उतरवले व पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथे शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे.

कोसळलेल्या स्लॅबप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद

पणजी पोलिसांकडून 'सुओमोटो' दखल
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): मिरामार येथे काल दुपारी "स्लॅब' कोसळून जखमी झालेल्या दुर्घटनेची पणजी पोलिसांनी "सुओमोटो' दखल घेत बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद केला केला आहे. त्याचप्रमाणे, कंत्राटदार बसवराज इरप्पा ईराबेल याला भा. दं. सं. ३३७ कलमानुसार अटक करून नंतर सायंकाळी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली, अशी माहिती पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. मात्र, हे बांधकाम कोणाचे आहे, याची माहिती मिळाली नसून ती पणजी महापालिकेकडून मिळवली जाणार असल्याचे श्री. चोडणकर यांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार, काल दुपारी मिरामार येथे सुरू असलेल्या बांधकामाचा "स्लॅब' कोसळल्याने तीन कामगार जखमी झाले होते. यात मिथुन शेख (२४), हनुमंत गवंडगीर (२०) व हनिफ शेख (२०) हे जखमी झाले होते. सदर दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आज सकाळी वर्तमानपत्रांतून यासंबंधी माहिती छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्याने त्याची "सुओमोटो' दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर बांधकाम हे एका बड्या राजकीय नेत्याचे असल्याची माहिती मिळाली आहे. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रामनाथकर कळंगुटकर करीत आहेत.

कवी पुष्पाग्रज यांची कविता परमतत्त्वाचा शोध घेणारी : डहाके

'शांती अवेदना'चे थाटात प्रकाशन
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): कवी पुष्पाग्रज यांची कविता परमतत्त्वाचा शोध घेणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविवर्य वसंत आबाजी डहाके यांनी केले. "शांती अवेदना' या कवितासंग्रहातून कवीने माणसाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रश्न माणसाच्या जीवनाशी निगडीत असतात पण त्यांचे विश्लेषण करता येत नाही. अशा व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी आपुलकीची असावी लागते. याच आपुलकीने कवी आपल्या चिंतनातून परमतत्त्वाचा शोध घेत असतो, असेही उद्गार श्री. डहाके यांनी काढले.
गोमंतकीय कवी अशोक नाईक तुयेकर ऊर्फ पुष्पाग्रज यांच्या "शांती अवेदना' या तिसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन आज कविवर्य वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, कोकण मराठी परिषद व ग्रंथाली प्रकाशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मिनेझिस ब्रागांझा सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कोकण मराठी परिषदेचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, प्रसिद्ध रंगकर्मी डॉ. अजय वैद्य, कवी विष्णू सूर्या वाघ, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश नाईक व कवी पुष्पाग्रज उपस्थित होते. "चित्रलिपी' या कविता संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार २००९ साली प्राप्त झाल्यानंतर या सोहळ्यानिमित्त खास उपस्थिती लाभलेल्या कविवर्य वसंत आबाजी डहाके यांचा यावेळी ऍड. खलप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री सातेरी देवीच्या मंदिराची खास चित्रकृती प्रदान करून सत्कार करण्यात आला. श्री. डहाके यांच्या हस्ते पुष्पाग्रज यांच्या "शांती अवेदना' या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.
कवी पुष्पाग्रज यांचा हा कविता संग्रह तब्बल पंधरा वर्षानंतर येत आहे व त्यामुळे यापूर्वीचा "कॅलिडोस्कोप' व "नन्रुख' या कविता संग्रहांची चौकट कवीने मोडली आहे हे निश्चित, असेही यावेळी बोलताना श्री. डहाके म्हणाले.
सुरुवातीस सुरेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. कवी विष्णू सूर्या वाघ यांनी सत्कारमूर्ती वसंत आबाजी डहाके यांच्या गौरवपर भाषणात श्री. डहाके हे नवकवींसाठी दीपस्तंभ असल्याचे उद्गार काढले. डॉ. अजय वैद्य यांनी "शांती अवेदना' संग्रहातील काही निवडक कवितांचे आपल्या खास शैलीत सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बोलताना ऍड. खलप म्हणाले की, कवी पुष्पाग्रज यांनी आपल्या कवितांतून सदोदित आपल्या गावच्या व खास करून आपल्या अवतीभवतीच्या गोष्टींचा केलेला उल्लेख प्रकर्षाने जाणवतो व या परिसराशी त्यांचे नाते पटवून देतो. त्यांनी स्वतः आयुष्यात पार केलेल्या खडतर प्रवासाचीही झुळूक त्यांच्या साहित्यातून प्रकट होते, असेही ते म्हणाले.
कवी पुष्पाग्रज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा कवितासंग्रह प्रत्यक्षात येण्यासाठी रामकृष्ण नायक व गं्रथाली प्रकाशन यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करून घेण्यासाठी सुदेश आर्लेकर व उमेश बाणस्तारकर यांनी घेतलेल्या कष्टांचाही त्यांनी खास उल्लेख केला. आपल्या या संग्रहाचे रसिक भरभरून स्वागत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन किशोर नाईक गांवकर यांनी केले.

राज्यात रस्ते अपघातांत युवकांचेच जास्त बळी

वेर्णा व फोंडा अपघातप्रवण क्षेत्र
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): राज्यात रस्ता अपघातात सापडणारे ५७ टक्के हे केवळ २० ते ३५ वयोगटातील युवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्या कुटुंबातील एक युवक बळी जाणे हे केवळ त्या कुटुंबावरील संकट नव्हे तर त्याचे सामाजिक, आर्थिक व इतरही अनेक दूरगामी परिणाम होतात.गेल्या २००९ साली प्रत्येक दिवशी १२ अपघातांची नोंद झाली आहे व प्रत्येक २९ तासांत एकाचा बळी गेला आहे.जानेवारी ते डिसेंबर २००९ यावर्षी एकूण ४१६४ रस्ता अपघात घडले व त्यात ३१० जणांचा मृत्यू झाला.२००८ साली ४१७८ अपघातात ३१८ जण मृत्यू पडले व २००७ साली ३२२ जणांना आपले प्राण घालवावे लागले.२००९ साली झालेल्या अपघातांत ३७ टक्के दुचाकींचा समावेश आहे तर ३० टक्के कार अपघात घडले आहेत.सर्वांत जास्त अपघात वेर्णा येथे घडले असून फोंडा परिसरातील अपघातांत सर्वांत जास्त जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
राज्यात सध्या राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणावरून बराच गदारोळ उडाला आहे. कुणी म्हणतात या रुंदीकरणामुळे अपघात टळतील तर कुणाचे म्हणणे आहे की त्यामुळे अधिक अपघात घडतील. एक गोष्ट मात्र कुणीही नाकारू शकत नाही की गोव्यातील बहुतांश लोकांना रस्त्यावरील मरणाला सामोरे जावे लागत आहे. वर्षाकाठी शेकडो तरुण अपघातांना बळी पडत असताना व त्यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत असताना सर्वांत गंभीर व चिंताजनक बनलेल्या या प्रकाराकडे आपले सरकार अजूनही गंभीर नसल्याचेच दिसून येते. माहिती अधिकाराखाली प्राप्त झालेल्या यासंबंधीच्या माहितीवरून कुणाचीही झोप उडावीच एवढे भीषण हे संकट बनले आहे.
वाढते रस्ता अपघात टाळण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले सर्व प्रयत्न अपुरे पडत आहेत. वाहतूक खाते, पोलिस खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात अजिबात समन्वय नाही. गेल्या २००९ साली वाहतूक पोलिसांकडून एकूण ३९४ जणांचा वाहन चालक परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर १० मार्च २०१० पर्यंत ७९ वाहन चालकांचा परवाना रद्द करण्याची शिफारसही वाहतूक पोलिसांनी वाहतूक खात्याकडे केली आहे. हे सर्व चालक मृत्यूस व भीषण अपघातांस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतूक पोलिसांनी केलेल्या या शिफारशींवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया वाहतूक खात्याकडून होते व त्यामुळे या गोंधळात हे चालक अजूनही बिनधास्तपणे वाहने हाकत असल्याची माहितीही मिळाली आहे. दरम्यान, वाहतूक अधीक्षक अरविंद गावस यांनी वेळोवेळी अपघातप्रवण क्षेत्र व इतर रस्त्यांची दुरुस्ती किंवा अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रस्ताव पाठवले आहेत.गेल्या २००९ साली एकूण २१५ प्रस्ताव वाहतूक अधीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठवले असले तरी त्याची पूर्तता करण्यास सा.बां.खात्याकडून विशेष तत्परता दाखवली जात नाही,असेही कळते.
वाहतुकीत शिस्त येण्यासाठी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याकडेच वाहतूक पोलिसांचे जास्त लक्ष राहिले आहे. गेल्या २००९ साली उत्तर गोव्यात १ कोटी ७६ लाख ३७ हजार ३५० तर दक्षिण गोव्यात १ कोटी २२ लाख ८८ हजार ०५० रुपये विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसूल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने अतिवेगासाठी ८,७९,००० रू.(उत्तरगोवा),४,४८, ३०० रू. (दक्षिणगोवा)हेल्मेटशिवाय प्रवासासाठी ३९,४८,८५० रू.(उत्तरगोवा)३५,२४,७०० रू.(दक्षिणगोवा), नोपार्किंग क्षेत्रात वाहन पार्क करणे- २,६६,४०० रू.(उत्तरगोवा) १,६६,९०० रू. (दक्षिणगोवा), मद्यसेवन करून वाहन चालवणे - २०, ००० रू. (उत्तरगोवा), ९६, २०० रू. (दक्षिणगोवा), बेदरकारपणे वाहन चालवणे - २२, ३०, ३५० रू. (उत्तरगोवा), १२, ३४, ८५० रू. (दक्षिणगोवा) आदी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

Monday, 26 April 2010

चेन्नईच आयपीएलचे राजे!

अंतिम लढतीत मुंबईला २२ धावांनी नमविले
नवी मुंबई, दि. २५ : चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ आज रविवारी मिळाले. पहिल्या आयपीएलमध्ये अंतिम फेरी, दुसऱ्या सत्रात उपांत्य फेरी गाठलेल्या चेन्नईने येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सत्रातील अंतिम लढतीत प्रेक्षकांचा पाठिंबा नसतानाही बलाढ्य मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव करत आपणच आयपीएलचे राजे असल्याचे सिद्ध केले. चेन्नईने विजयासाठी समोर ठेवलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला निर्धारित २० षटकांत ९ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारता आली तीसुद्धा सचिन व पोलार्डच्या फलंदाजीमुळे.
सचिन तेंडुलकर व अंबाती रायडू यांची भागीदारी फुलत असताना गोव्याच्या शदाब जकातीने सचिनला मुरली विजयकरवी डावाच्या १५व्या षटकांत झेलबाद केले. याच षटकात सौरभ तिवारीचा रैनाने डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल घेतला व मुंबईची अवस्था ३ बाद ९९ वरुन ५ बाद १०० अशी केली. किरोन पोलार्डने १० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २७ धावा चोपत प्रेक्षकांचे मनोरंजन केले परंतु, त्याच्या या धावा मुंबईला विजय मिळवून देण्यास अपुऱ्या ठरल्या.

मुंबई इंडियन्स ः शिखर धवन झे. महेंद्रसिंग धोनी गो. डग बोलिंजर ० (८ चेंडू),
सचिन तेंडुलकर झे. मुरली विजय गो. शदाब जकाती ४८ (४५ चेंडू, ७ चौकार), अभिषेक नायर धावबाद(धोनी) २७ (२६ चेंडू, १ चौकार, २ षटकार), हरभजन सिंग पायचीत गो. सुरेश रैना १ (२ चेंडू), अंबाती रायडू धावबाद (मॉर्कल) २१ (१४ चेंडू, १ चौकार, १ षटकार), सौरभ तिवारी झे. सुरेश रैना गो. शदाब जकाती ० (२ चेंडू)
जीन पॉल ड्युमिनी झे. शदाब जकाती गो. मुथय्या मुरलीधरन ६ (७ चेंडू), किरोन पोलार्ड झे. मॅथ्यू हेडन गो. ऍल्बी मॉर्कल २७ (१० चेंडू, ३ चौकार, २ षटकार),
झहीर खान धावबाद (अश्विन )१ (३ चेंडू), लसिथ मलिंगा नाबाद १ (१ चेंडू)
दिलहारा फर्नांडो नाबाद २ (२ चेंडू)
एकूण: १४६/९ (२०.०) धावगती : ७.३०
अवांतर : १२ (बाइज - १, वाइड - ५, नो बॉल - ०, लेग बाइज - ६)
गडी बाद होण्याचा क्रम : १-१(१.४), २-६७(११.२), ३-७३(११.६), ४-९९(१४.२), ५-१००(१४.५), ६-११४(१६.६), ७-१४२(१८.५), ८-१४२(१८.६), ९-१४३(१९.३)
गोलंदाजी ः रवीचंद्रन आश्विन ४/१/२४/०, डग बोलिंजर ४/०/३१/१,
ऍल्बी मॉर्कल ३/०/२०/१, मुथय्या मुरलीधरन ४/०/१७/१, शदाब जकाती ३/०/ २६/२, सुरेश रैना २/०/२१/१

बैठकीपूर्वीच मोदी निलंबित

आजची बैठक केवळ सोपस्कार!
मुंबई, दि. २५ : आयपीएलच्या उद्या होणाऱ्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत आपण सहभागी होऊ, एवढेच नव्हे तर बैठकीची अध्यक्षताही करू , असे ललित मोदी यांनी आज आपल्या ट्विटरवरील संदेशात सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या या आकस्मिक निर्णयाचा धसका घेऊन बीसीसीआयने त्यांना आजच्या अंतिम सामन्यानंतर अर्थात बैठकीपूर्वीच निलंबित करण्याचा निर्णय घेतला,असे रात्री उशिरा सूत्रांनी उघड केले. त्यापूर्वी, आयपीएलचा कमिशनर या नात्याने बैठकीचा अजेंडाही आपण गव्हर्निंग कौन्सिलला पाठवून दिला आहे, असे मोदींनी म्हटले होते. या सर्व बाबींकडे बघितल्यास आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची उद्या सकाळी १० वाजता होणारी बैठक हा केवळ सोपस्कार ठरणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. निलंबन झाल्यास मोदी या बैठकीस उपस्थित राहू शकतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजीनामा देण्यास स्पष्ट नकार देत तसेच मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास काही लोेेकांचे पितळ उघड करण्याची धमकी देणाऱ्या ललित मोदींनी आता उद्याच्या बैठकीत सहभागी होण्यासारखा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. उद्याच्या बैठकीत आपण आयपीएलचे आयुक्त म्हणून सहभागी होऊ; एवढेच नाही तर बैठकीची अध्यक्षताही करू . त्यासाठी आपण आयपीएलच्या गव्हनिर्र्ंग कौन्सिलकडे बैठकीचा अजेंडाही पाठवून दिला आहे, असेही त्यांनी म्हटले होते. मोदींच्या या निर्णयाने बीसीसीआयला अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.
याआधी बीसीसीआयने ललित मोदी यांना त्यांच्या अनुपस्थितीत बरखास्त करण्याची योजना आखली होती. आता मोदी व बीसीसीआय यांच्यात संघर्षाची तयारी झाली आहे, असे दिसते. मोदी बैठकीला हजर राहणार असे समजताच बीसीसीआयच्या येथील मुख्यालयातही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. बीसीसीआयच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर, उपाध्यक्ष अरुण जेटली, प्रसार व अर्थ समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव एन. श्रीनिवासन, मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी, आयपीएलचे उपाध्यक्ष निरंजन शहा उपस्थित होते.
आयपीएलमधील आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने देशभर छापे टाकण्याचे सत्र प्रारंभ केले असून व या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्र स्थानी ललित मोदी आहेत. याशिवाय कमीत कमी तीन संघांत त्यांची अप्रत्यक्ष भागीदारी असल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रो. रत्नाकर शेट्टी आज सकाळी वानखेडे स्टेडियम येथे पोेहोचले व उद्या सकाळी १० वाजता बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यावतीने सचिव श्रीनिवासन यांनी आमंत्रित केलेल्या बैठकीला अंतिम रूप दिले. उद्याच्या बैठकीला आपण उपस्थित राहू, असे स्पष्ट संकेत ललित मोदी यांनी दिल्याने त्यांचा उद्देश स्पष्ट दिसत असला तरी त्यांना पदावरून दूर करणे हेच आमचे धोरण ठरले आहे. भारतीय क्रिकेटला त्यांनी काळिमा फासली आहे, असे बीसीसीआय सूत्रांनी म्हटले आहे.
ललित मोदी यांच्यामागे आर्थिक घोटाळ्याचे झेंगट लागलेले पाहून मोदींनी आपणहून पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आज दुसऱ्या दिवशीही प्रयत्न सुरू होते. बीसीसीआयमधील बहुतांश लोक मोदींच्या विरोधात असले तरी आपल्या मागे आयपीएल संघांतील काही मालक उभे राहतील, अशी अशा मोदींना वाटत आहे.

सांताक्रुझचे दोघे तरूण दूधसागर नदीत बुडाले

कुळे, दि. २५ (प्रतिनिधी): कुळे येथून चारशे मीटर अंतरावरील सिग्नल कोंड या ठिकाणी दूधसागर नदीवर आंघोळ करण्यास गेलेल्या दोघे तरुण बुडून मरण पावले. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वैभव सी. राणे (वय २६) व युवराज अयगळ (वय २६) अशी या तरुणांची नावे असून ते कुजिरा सांताक्रुझ येथील "चामुंडा अपार्टमेंट'मध्ये राहात होते. या दोघांच्या मृत्युमुळे सांताक्रुझ परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.
आज रविवार असल्यामुळे या परिसरात सहलीसाठी अनेक लोक आले होते. वैभव आणि युवराज हे ज्या आंघोळीसाठी नदीत उतरले आणि ज्या ठिकाणी खोल पाणी आहे तेथे जाऊन बुडाले. त्यांना पाण्याचा अंदाजच आला नाही. हे दोघेही अचानकपणे दिसेनासे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. त्यामुळे तेथे असलेल्या अन्य लोकांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला होता.
सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे या परिसरात सहलीसाठी लोकांचे लोंढे सातत्याने येत आहेत. तेथील नदीवर पाणी पुरवण्याचा पंपही उपलब्ध आहे. मात्र तेथे येणाऱ्या मंडळींवर नियंत्रण ठेवणारी कसलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. तसेच नदीमध्ये प्लॅस्टिक, टाकाऊ वस्तू, काचा आदी वस्तू टाकण्यात येत असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. यासंदर्भात पर्यटक आणि स्थानिकांनाही शिस्त लावण्याची गरज असल्याची मागणी केली जात आहे. तथापि, सरकारकडून त्याची दखलच घेतली जात नाही. निदान आता तरी सरकारने या बाबतीत तातडीने हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गोव्यात संपूर्ण राजकीय परिवर्तनाचा निर्धार

स्वयंसेवी संघटनांच्या एकत्रित बैठकीत पुढाकार
मडगाव दि. २५ (प्रतिनिधी): गोव्यातील राजकीय घडामोडी व त्यात जाणारा गोमंतकीयांच्या हिताचा बळी यामुळे व्यथित झालेल्या विविध बिगरसरकारी संघटना व ज्येष्ठ नागरिकांनी आज येथे" पीपल्स फॉर पॉलिटिकल सॅनिटी' च्या झेंड्याखाली एकत्र येऊन राजकारण्यांच्या तावडीतून गोव्याला वाचवायचे असेल तर राज्यात संपूर्ण राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची हाक दिली व त्यासाठी आजपासूनच कार्यरत होण्याचा संकल्प सोडला.
गत आठवड्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोमंतकीय पॉप गायक रेमो फर्नांडिस याने गोव्यातील राजकारण्यांनी राज्याच्या केलेल्या दुर्दशेबद्दल संताप व्यक्त करताना त्यांना एका होडीत बसवून अरबी समुद्रात नेऊन बुडविण्याची गरज प्रतिपादन केली होती, त्यापाठोपाठ विविध बिगर सरकारी संघटनांच्या झालेल्या या बैठकीला राजकीय वर्तुळात महत्त्व दिले जात आहे.
येथील ग्रेस चर्च सभागृहात झालेल्या या बैठकीत येत्या निवडणुकीत सर्व चाळीसही मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. त्यासाठी पंधरवड्याने ९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता याच ठिकाणी पुन्हा जमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीत निश्चित कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.
सत्ता ही कोणाचीच मिरासदारी होऊ नये, मतदारांचे त्यावर संपूर्ण नियंत्रण असावे, प्रशासकीय व राजकीय भ्रष्टाचारावर लोकांचा अंकुश असावा आदी विचार यावेळी व्यक्त करून त्यासाठी काही उपाय सुचविण्यात आले. गोव्याने जनमत कौल व राजभाषा अशा दोन प्रश्र्नांवर विजय मिळविलेला असला तरी आज पन्नास वर्षांनंतरची स्थिती गोव्यासाठी आशादायी नाही असा विषाद यावेळी व्यक्त केला व त्यासाठी काही ठरावही संमत केले गेले.
त्यांत गोव्यासाठी खास दर्जा द्यावा, उच्चपदावरील भ्रष्टाचार तपासण्यासाठी लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, एकदा निवडून आलेल्याला परत विधानसभा निवडणूक लढविण्याची मुभा असू नये, बेकायदा खाणी बंद कराव्यात या मागण्यांचा समावेश आहे.
अन्य ठरावात अकार्यक्षम आमदाराला माघारी बोलावण्याची मुभा असावी, पोलिस सुधारणा कायद्याची त्वरित अंमलबजावणी केली जावी, दक्षता व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागांनी सरकारी कचेऱ्यात आकस्मिक तपासणी करावी, गरजेच्या वस्तूंच्या दरांवर सरकारचे नियंत्रण असावे, नियोजन नसलेल्या विकास प्रकल्पांना परवाने देऊ नये, एका अधिकाऱ्याकडे अनेक पदांचा अतिरिक्त पदभार देण्याचे प्रकार बंद करावेत, डोंगर, टेकड्या, शेती, खाजने, झरे, कोमुनिदाद जमिनी, वाळूच्या टेकड्या यांचे जतन करावे, वाढते रस्ते अपघात टाळण्यासाठी त्यांचे मूळ कारण शोधून काढावे व त्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी यांचा समावेश आहे.
आजच्या बैठकीत गोवा सुराज , भारतीय पोप्युलर फ्रंट, युनायटेड गोवन्स वेल्फेअर फ्रंट, जय दामोदर संघटना, मडगाव सेवा असोसिएशन, गोंयकारांचो अरिष्ट आवाज, कलेक्टीव्ह पीपल्स व्हॉईस ऑफ साऊथ गोवा, माडेल सिटिझन्स फोरम, बायलांचो एकवट, शेतकारांचो एकवट, कोलवा नागरिक व ग्राहक मंच चे प्रतिनिधी उपस्थित होते.
चर्चेत डॉ. धुमे, इंजिनियर एम. कुलासो, दामोदर घाणेकर, फ्लोरियानो लोबो, जुझे डिसोझा, दोलोरोसा डिसिल्वा, इंडिथ आल्मेदा, झिनो कार्व्हालो, सोकोर डिसोझा, लॉरेल आब्रांचिस, महेश नायक, सईद इफ्तिकार, तेरेझिना फर्नांडिस, तिओ फर्नांडिस, क्रॉयडोन आल्मेदा, सोनिया व्हाज, रेसर आल्मेदा, राजेंद्र काकोडकर, जुझे मारिया मिरांदा यांनी भाग घेतला.

राजकारण्याच्या हॉटेल इमारतीचा स्लॅब कोसळला; कामगार जखमी

- काहीच घडले नसल्याचा दावा
- पत्रकारांशी लपवाछपवी
- छायाचित्रकाराला दटावले

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): मिरामार येथे एका बड्या राजकारण्याचे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलचा स्लॅब कोसळल्याने तीन कामगार जखमी झाल्याची माहिती हाती लागली असून सदर राजकारण्याने आपला दबाव वापरून कोणतीही पोलिस तक्रार होणार नाही, याची खबरदारी घेतली. या घटनेची आपल्याला माहिती मिळाली होती, परंतु या बांधकामाच्या मालकाने किंवा कामगार कंत्राटदाराने कोणतीही माहिती पुरवली नसल्याने त्याठिकाणी जाणे योग्य नसल्याने आपण तेथे गेलो नाही, असे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.
आज दुपारी सुमारे १ च्या दरम्यान ही घटना घडली. मिरामार येथील विज्ञान केंद्रापासून काही अंतरावर हे बांधकाम सुरू होते. आज सकाळी या दुमजली इमारतीवर स्लॅब घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. दुपारी जवळ जवळ हे काम पूर्ण होत आले असताना अचानक रस्त्याकडेचा भाग कोसळल्याने तीन कामगार जखमी झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच काही पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी संबंधित राजकारण्याच्या काही लोकांनी या पत्रकारांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केले. तसेच, हा स्लॅब पडलेला नसून तो आम्ही स्वतः पाडलेला आहे, असा दावा केला. मात्र ज्यावेळी काही छायाचित्रकारांनी स्लॅबचे छायाचित्र घेतले असता त्या ठिकाणी असलेल्या गटाने त्या छायाचित्रकारांना फोटो घेण्यास मज्जाव केला. परंतु, त्यांच्याकडून होत असलेल्या कोणत्याही दबावाला बळी न पडता घटनास्थळाचे फोटो घेण्यात आले. त्यामुळे एकाने त्या छायाचित्रकाराचा कॅमेरा हुसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात आपण गोत्यात येऊ, अशी चाहूल लागताच या गटातील एका व्यक्तीने संबंधित राजकीय नेत्याशी दूरध्वनी वरून चर्चा केला आणि त्यानंतर तेथून त्या छायाचित्रकारांना जाण्यास सांगितले.
या प्रकारानंतर, ते राजकीय प्रस्थ आपल्या समर्थकासह सायंकाळपर्यंत घटनास्थळी प्रत्यक्ष उभे होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांची कोणताही माहिती देण्यास त्यांनी यावेळी नकार दिला. तसेच त्यांना कोणत्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, याची माहितीही लपवण्यात आली. इमारतीचा कोसळलेल्या भाग झाकून ठेवण्यात आला आहे.