Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 October 2010

पुन्हा येडियुराप्पाच जिंकले!

विधानसभेत विश्वास प्रस्ताव पारित
आता लक्ष सोमवारच्या निर्णयाकडे

बंगलोर, दि. १४ : देशाच्या इतिहासात प्रथमच चार दिवसांच्या कालावधीत दोन वेळा विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याचा प्रकार कर्नाटकमध्ये घडला. पण, या दोन्ही वेळी विश्वास मत जिंकून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील येडियुराप्पा सरकारने आपले बहुमत सिद्ध केले आणि बंडखोरांसह विरोधी पक्षांना सपशेल तोंडघशी पाडले. असे असले तरी येत्या सोमवारी १६ अपात्र आमदारांविषयी उच्च न्यायालयातून येणाऱ्या निर्णयावर सरकारचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
आज सलग दुसऱ्यांदा येडियुराप्पांना विधानसभेत विश्वास मताला सामोरे जावे लागले. पण, त्यांनी व्यक्त केलेल्या आत्मविश्वासानुसार आजचाही दिवस त्यांच्याच नावे लिहिला गेला. आज सभागृहाचे कामकाज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झाले. तेव्हा लगेचच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी विश्वास मताचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. आज विधानसभेत २०६ सदस्य उपस्थित होते. त्यात सत्ताधारी भाजपला १०६ मते मिळाली, तर १०० जणांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. सत्ताधारी पक्षाला मतदान करण्यात भाजपच्या १०५ आमदारांसह एका अपक्ष आमदाराचा समावेश होता. विश्वास मताच्या विरोधात कॉंग्रेसचे ७३ आणि जद(एस)च्या २७ आमदारांनी मतदान केले. सोमवारी सरकारच्या विरोधात मतदान करणाऱ्या एका अपक्ष आमदाराने आज सरकारच्या बाजूने मतदान केले, हे विशेष. भाजपचे मानप्पा वज्जल आणि जद(एस)चे एम. सी. अश्वथ हे दोघेही अनुपस्थित राहिले. येडियुराप्पा सरकारने विश्वासमत जिंकताक्षणीच अध्यक्ष के. पी. बोपय्या यांनी विधानसभा अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्याची घोषणा केली.
दरम्यान, आज येडियुराप्पांना विश्वासमत मिळाले असले तरी अंतिम निर्णय सोमवारीच होणार आहे. कारण १६ अपात्र आमदारांच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारीच सुनावणी करणार आहे. त्याच दिवशी त्यांच्या अपात्रतेच्या निर्णयासोबतच सरकारच्या भवितव्याबाबतही काही संकेत मिळू शकणार आहेत.
राज्यपालांची भेट घेतली
मागील सोमवारपासून मुख्यमंत्री आपल्याला भेटलेलेच नाहीत, अशी राज्यपाल भारद्वाज यांची तक्रार दूर करीत येडियुराप्पांनी विश्वास मत मिळविल्यानंतर लगेचच त्यांची भेट घेतली. मागील सोमवारी येडियुराप्पांनी प्रचंड गदारोळात विश्वास मत मिळविले होते. त्यावेळी विधानसभेत बराच गोंधळही झाला होता. मार्शलवर हल्ले झाले, पोलिसांना सभागृहात पाचारण करावे लागले होते. यावेळी मात्र येडियुराप्पांनी पोलिसांना सभागृहाबाहेर तैनात राहण्यास सांगितले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाजप गोटात जल्लोष
दोनच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी गुजरात महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसला सपशेल धूळ चारल्यामुळे भाजप गोटात अपूर्व उत्साह पसरला होता. आज कर्नाटकातील भाजप सरकार उलथून पाडण्याचे विरोधी पक्ष आणि राज्यपालांचे प्रयत्न हाणून पाडीत येडियुराप्पांनी पुन्हा एकदा विश्वास मत जिंकल्याने भाजपच्या गोटात तुफान जल्लोषाचे वातावरण होते. दिल्लीसह संपूर्ण देशातील भाजप कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा हा विजय जल्लोषात साजरा केला.

विधासभाध्यक्षांनी भाजपने विश्वासमत जिंकल्याचे जाहीर करताच सत्ताधारी सदस्यांनी जल्लोष करीत निकालाचे स्वागत केले. सर्व मंत्री येडियुराप्पांजवळ आले आणि त्यांचे अभिनंदन केले. एकमेकांचे तोंड गोड करून आनंद साजरा करण्यात आला.
तरीही आमचाच विजय निश्चित : भाजप
येडियुराप्पांच्या आजच्या विश्वास मताच्या विजयावर सोमवारच्या उच्च न्यायालयाच्या निकालाचे सावट कायम असल्याचे बोलले जात असतानाच भारतीय जनता पक्षाने, कोर्टाकडून अपक्ष आमदारांना मतदानाची परवानगी मिळाली तरी आम्हीच विजयी ठरू, असा विश्वास व्यक्त केला आहे. सोबतच राज्यपाल भारद्वाज हे कॉंग्रेसचे एजंट म्हणून काम करीत असल्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी म्हणाले की, आम्ही पुन्हा सत्तेत आलो. हा क्षण कर्नाटक आणि भाजपसाठीही ऐतिहासिक आहे. १६ जणांना अपात्र ठरविल्यानंतर सभागृहाची सदस्यसंख्या २०८ उरली आहे. त्यांपैकी भाजप सरकारला १०६ मते मिळाली आहेत. म्हणजेच त्यांनी १०४ चा "जादूई' आकडा पार केला आहे. आता अपात्र आमदारांपैकी अपक्षांना हायकोर्टाने सोमवारी मतदानाची परवानगी दिली तरीही राज्यात भाजपचे बहुमत सिद्धच असल्याचे रूडी यांनी स्पष्ट केले.
सोबतच कॉंग्रेसचे एजंट म्हणून राज्यात काम करणाऱ्या राज्यपाल भारद्वाज यांना केंद्राने परत बोलवावे, ही मागणीही रूडी यांनी केली.

No comments: