Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 11 October 2010

सभापती-राज्यपाल संघर्ष अटळ

कर्नाटकात आज विश्वासदर्शक ठराव, राजकीय हालचाली टिपेला
बंगलोर, दि. १० : कर्नाटकातील भाजप सरकारच्या उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी सभापतींच्या कामकाजात चालविलेल्या हस्तक्षेपामुळे सध्या राज्यपाल हंसराज भारद्वाज व सभापती के. जी. बोपय्या यांच्यातील वाद चांगलाच भडकला आहे. उद्या विश्वासदर्शक ठरावाचे कामकाज संपल्याशिवाय बंडखोरांविरोधातील अपात्रता याचिकेवरील कोणताही निवाडा सभापतींनी देऊ नये किंबहुना कोणत्याही बंडखोराला अपात्र घोषित करू नये, अशी सूचना राज्यपालांकडून आल्यानंतर हा आपल्या कामकाजातील थेट हस्तक्षेप असल्याचे सांगून सभापती बोपय्या यांनी राज्यपालांवर जोरदार पलटवार केला. परिणामी कर्नाटकातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
उद्या विश्वासदर्शक ठराव येणार असून गोव्यातून बळपूर्वक उचलून नेलेले आमदार चेन्नईमार्गे बंगलोरला दाखल होणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज सभापती के. जी. बोपय्या बंडखोर आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर सुनावणीही सुरू केली. तथापि, निवाडा मात्र त्यांनी उद्या सकाळपर्यंत राखून ठेवला आहे. नेमक्या या पार्श्वभूमीवर राज्यपाल भारद्वाज यांनी ही "वादग्रस्त' सूचना केली होती.
अपात्रता याचिका तसेच सभापतींच्या अखत्यारीतील कोणत्याही कामकाजात राज्यपालांनी हस्तक्षेप करता कामा नये, असा स्पष्ट निवाडा रामेश्वर दयाळ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे सांगून राज्यपालांची ही कृती म्हणजे त्या आदेशाचा भंग आहे, असे प्रतिपादन सभापतींनी केले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही राज्यपालांच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार अस्थिरतेच्या कामात राज्यपाल थेट भाग घेत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. सरकार अस्थिर करण्याच्या कामगिरीतील सक्रिय भागीदार असलेल्या राज्यपालांना ताबडतोब माघारी बोलवा, अशी मागणीही भाजपने केंद्राकडे लावून धरली आहे. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून विश्वासदर्शक ठरावाच्या कामकाजाला आरंभ होणार आहे. त्यापूर्वी काही काळ आधी सभापती बोपय्या हे अपात्रता याचिकांवरील आपला निवाडा घोषित करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राजधानी बंगलोरमध्ये आज सकाळपासून राजकीय घडामोडींना विलक्षण वेग आला होता. बंडखोर आमदार भाजपच्या हाती लागणार नाहीत याची पुरेपूर दक्षता निधर्मी जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी घेतली असून त्यांना याकामी स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून मोठेच सहकार्य लाभले आहे. मात्र असे असले तरी विश्वासदर्शक ठराव जिंकणारच, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व सरकारातील ज्येष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

No comments: