"गोवादूत'च्या "दीपावली २०१०'चे प्रकाशन
पणजी, दि.२७ ( सांस्कृतिक प्रतिनिधी)- आज गोव्यात खाणींचे साम्राज्य वाढत चाललेले असून परकीयांना जमिनी विकण्याचा सपाटा सुरूच आहे. यामुळे गोवा नष्ट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गोवा वाचवण्यासाठी साहित्यिक चळवळ उभारून साहित्याच्या माध्यमातून जागृती होणे आवश्यक आहे. या कामात राजकारण्यांनाही सामील करून घेण्याची गरज आहे. राजकारणी साहित्य चळवळीत नाममात्र सहभाग दाखवत असतात. गोवा वाचवायचा असेल तर राजकारण्यांना चाप घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले.
गेल्या सात वर्षांपासून दर्जेदार दिवाळी अंकाचा नजराणा सर्वांच्या आधी वाचकांसाठी उपलब्ध करण्याचा बाणा कायम राखणाऱ्या "गोवादूत'च्या "दीपावली २०१०' अंकाचे प्रकाशन आज प्रमुख पाहुणे निसर्गतज्ज्ञ प्रा.राजेंद्र केरकर व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या "गोवादूत' कार्यालयात करण्यात आले. यावेळी "गोवादूत दिवाळी अंक कथालेखन स्पर्धे'चे विजेते, कर्मचारी तसेच हितचिंतक उपस्थित होते.
गोव्याचे रक्षण करत असता गलितगात्र झालेल्यांना वर्तमानपत्राचा आधार असतो, "गोवादूत'ने ही भूमिका चोखपणे पार पाडली आहे, असे सांगून प्रा. केरकर यांनी "गोवादूत'ला शुभेच्छा व्यक्त केल्या.
तलवारीचा घाव कुठे घातला जातो हे मनगटावर किंवा तलवारीच्या धारेवर अवलंबून नसते तर ते मनावर अवलंबून असते. यामुळे मन भ्रष्ट झालेल्यांना श्रद्धास्थान वगैरे काही दिसत नाही, त्यांना केवळ आपला फायदा दिसत असतो. अशा एखाददुसऱ्या माणसाला ठेचून काढणे मोठे अवघड नसते; परंतु त्यांना सहकार्य करणारे हे सर्वसामान्य लोकच असतात, असे मनोहर पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
येणाऱ्या पिढीचा विचार करून गोव्याचा सांभाळ करणे आज प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अन्यथा, आमची मुलेबाळे "आमच्यासाठी तुम्ही काय ठेवले' असा प्रश्न विचारून आम्हाला लाथाडायला मागेपुढे पाहणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कथा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यात प्रथम साईदास आपटे, द्वितीय वर्षा धुपकर, तृतीय वेदिका जोशी तसेच इतर उत्तेजनार्थ विजेत्यांचा समावेश होता.
साईदास आपटे यांनी आपले विचार मांडताना, वास्तवातील गोष्टी साहित्यात प्रतिबिंबित झाल्यास साहित्य जिवंत वाटते, असे सांगितले.
संपादक राजेंद्र देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून अंकाच्या निर्मितीप्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्मिक व्यवस्थापक विलास कामत तसेच नितू कळगुटकर यांनी पाहुण्यांना पुष्प गुच्छ प्रदान केले. सूत्रसंचालन "दीपावली २०१०' अंकाचे संपादक अशोक नाईक तुयेकर ऊर्फ पुष्पाग्रज यांनी केले. कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे यांनी आभार मानले.
Thursday, 28 October 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment